26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

धोका भारतालाच

अफगाणिस्तानमधून सैन्यमाघारीची तालिबानने दिलेली निर्वाणीची मुदत अमेरिकेने मुकाट स्वीकारली आहे. जी – सात राष्ट्रांच्या बैठकीमध्ये अमेरिकेने तसे सूचित करणे हे सध्याच्या एकूण परिस्थितीत ही जागतिक महासत्ता कशी कात्रीत सापडली आहे तेच दाखवून देते आहे. तालिबानला विनासायास सत्ता तर मिळाली आहेच, परंतु अमेरिकेने माघार घेताना मागे ठेवलेली अफाट शस्त्रास्त्रे आणि युद्धसामुग्रीही आयती मिळाली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता राखणे हा आपला मक्ता नसल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन सध्या जरी आपण घेतलेली माघार योग्यच असल्याचे ढोल पिटत असले, तरी त्याचे परिणाम भविष्यात काय होतील त्याची चुणूक एव्हानाच दिसू लागली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानात घरोघरी चालवलेली शोधाशोध, सुरू केलेली बेफाम लुटालूट, अपहरणे, खंडणीखोरी हे सगळे आपल्याला ‘अल जझिरा’वर दिसणार नाही, परंतु संपूर्ण अफगाणिस्तानात हेच चित्र आज आहे आणि त्यामुळेच तर दिवसागणिक हजारो अफगाणी नागरिक जीव वाचवण्यासाठी सगळे काही मागे ठेवून काबूल विमानतळावर कोणीतरी आपल्याला देशाबाहेर काढील ह्या आशेने अहोरात्र ठाण मांडून बसत आहेत. तेथे पहार्‍यावर असलेल्या अमेरिकी सैनिकांच्या विनवण्या करीत आहेत.
तालिबानने दोहा करारामध्ये कितीही सलोखापूर्ण सरकारस्थापनेची आश्वासने दिलेली असली तरी ज्या भाषेत त्यांनी अमेरिकेला ३१ ऑगस्टपर्यंत देशातून काढता पाय घेण्यास फर्मावले, त्यातूनच सध्या त्यांचा शिगेला पोहोचलेला अहंकार दिसून येतो. या क्षणी तरी केवळ पंजशीर खोरे सोडले तर कोठेही तालिबानला अटकाव करणारे कोणी दिसत नाही.
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून पळून जाताच आता घटनेनुसार आपण राष्ट्राध्यक्ष आहोत असे सांगून तालिबानकडे सत्ता सुपूर्द करण्यास नकार दर्शवणारे अमरुल्ला सालेह यांनी परिस्थितीचे योग्य विश्लेषण वृत्तवाहिन्यांना काल दिलेल्या मुलाखतीत केले आहे. आजवर संपूर्ण पाकिस्तान तालिबानच्या सेवेत होते. अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत देऊन अफगाणिस्तानसंदर्भात त्या देशाचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शेवटी पाकिस्तानच्या माध्यमातून तालिबानी दहशतवाद्यांच्याच पथ्थ्यावर पडल्याचे अमरुल्ला यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दोहा कराराचा वापर तालिबानने स्वतःला अधिकृती मिळवण्यासाठी करून घेतला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला मूर्ख बनवले हे त्यांचे म्हणणे पूर्णतः पटण्याजोगे आहे.
अमरुल्ला सध्या अफगाणिस्तानातच सुरक्षित पंजशीर खोर्‍यात आहेत. परंतु पंजशीरचा सलणारा काटा काढून टाकण्यासाठी तालिबान आकाशपाताळ एक केल्याविना राहणार नाही. त्या दिशेने त्यांनी पावले टाकायला सुरूवात केलेली दिसते. नुकतेच तालिबानचे चाळीस सदस्यांचे एक पथक पंजशीरमधील मंडळींशी वाटाघाटी करण्यासाठी धडकले. वाटाघाटी फसल्या तर खोर्‍यात हल्ला चढवण्यात येणार आहे. पंजशीर खोर्‍यातील तालिबान रेसिस्टन्स फोर्सेसपाशी तालिबान्यांच्या तुलनेत मनुष्य आणि शस्त्रास्त्र बळ अपुरे आहे. पण त्यांना पाठबळ आहे ते हिंदुकुश पर्वताच्या नैसर्गिक संरक्षणाचे. त्यामुळेच तर हा प्रदेश आजवर अजेय राहिला. तालिबानविरुद्धच्या लढ्याचा सध्या केंद्रबिंदू बनलेल्या पंजशीरवर आज जगाचे लक्ष लागले आहे. पंजशीर पडता कामा नये. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांना उघडपणे देता येत नसेल तरी छुपे पाठबळ मिळाले पाहिजे. तालिबानला विरोध व्हायला हवा. अमेरिका स्वतःच्या पळपुटेपणातून तालिबानपुढे नांगी टाकून राहिली आहे, तर चीन, रशिया तेथील लिथियमसारख्या प्रचंड मोठ्या नैसर्गिक संसाधनांवर डोळे लावून तालिबानशी हातमिळवणी करू पाहात आहेत. अशा परिस्थितीत भारतासारख्या देशाने अफगाणिस्तानचा विषय गांभीर्याने घेतलाच पाहिजे. तालिबान आता आपली प्रतिमा सुधारण्यासाठी सर्व जातीजमातींना सोबत घेत असल्याचा देखावा करील. मानवतावादाची जपणूक करीत असल्याची सोंगे वठवील, परंतु त्याच्या आड हक्कानी दडले आहेत, कंदहार प्रकरणातील बारादर दडले आहेत हे विसरून कसे चालेल? तालिबान्यांच्या शब्दांवर विसंबून चालणारे नाही. त्यांच्या कृतीचा लेखाजोखा घेतला गेला पाहिजे. अफगाण लोकांच्या आजच्या पळापळीकडे हतबलपणे बघत बसलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायांना जागविण्याची जबाबदारी भारतासारख्या जबाबदार राष्ट्राची आहे, कारण उद्या अफगाणिस्तानच्या तालिबानीकरणाचा पहिला धोका भारतालाच असेल.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

फडणवीस आजपासून गोवा दौर्‍यावर

>> निवडणूक सहप्रभारी रेड्डी व प्रभारी सी. टी. रवीही येणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते...

गोव्याला येत्या १९ डिसेंबरपूर्वी स्वयंपूर्ण बनवणार ः मुख्यमंत्री

>> ‘सरकार आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ येत्या १९ डिसेंबरपूर्वी म्हणजेच गोवा मुक्तिदिनाच्या ६० व्या वर्धापनदिनापूर्वी गोवा स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट...

आजपासून ५० टक्के क्षमतेने कॅसिनो, मसाज पार्लर्स सुरू

>> सरकारचा आदेश जारी कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असलेले कॅसिनो, स्पा, जलक्रीडा व जलसफरी, मसाज पार्लर्स, वॉटर पार्कस्,...

राज्यात सर्दी व तापाची साथ

>> लहान मुलांसह प्रौढांनाही बाधा राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असतानाच आता राज्यातील लहान मुलांसह प्रौढांमध्येही सर्दी व तापाची साथ...