धोकादायक चिंबल जंक्शनवर उड्डाणपूल उभारणार

0
7

>> सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची माहिती; येत्या वर्षभरात काम मार्गी लावणार

चिंबल येथील धोकादायक जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम येत्या वर्षभरात मार्गी लावले जाणार आहे. या ठिकाणच्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा कंत्राटदाराला आदेश जारी करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

पणजी ते जुने गोवे बगल मार्गावरील चिंबल येथील धोकादायक जंक्शनवर अपघातांचे सत्र सुरू आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या अपघातात एका स्थानिक नागरिकाचे निधन झाले होते. त्यानंतर या धोकादायक जंक्शनच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मेणबत्ती फेरीचे आयोजन केले होते.

यासंबंधीच्या एका प्रश्‍नावर बोलताना मंत्री काब्राल म्हणाले की, चिंबल येथील धोकादायक जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला चालना देण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामाचा आदेश कंत्राटदाराला देण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३६५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, तरीही या मुदतीच्या पूर्वी उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर पाच हजारांच्यावर खड्डे आढळून आले होते. पावसाळ्यात जेट पॅचर मशीनच्या साहाय्याने खड्‌ड्यांची दुरुस्ती करण्यात आली, असेही काब्राल यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ अभियंत्यांच्या नोकरभरतीसंबंधी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. या नोकरभरतीमध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारीमुळे दक्षता खात्याकडून चौकशी करण्यात आली आहे. या नोकरभरतीमध्ये सहभाग घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाऊ शकते, असेही काब्राल यांनी सांगितले.

पुढील आठवड्यापासून खड्‌ड्यांच्या तक्रारी थेट ऍपवर नोंदवता येणार

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यांवरील खड्‌ड्यांच्या तक्रारींसाठी तयार केलेला खास ऍप पुढील आठवड्यात जनतेसाठी खुला केला जाणार आहे. हा ऍप जनतेसाठी खुला केल्यानंतर खड्‌ड्यांची माहिती थेट ऍपवर पाठविली जाऊ शकते. त्यानंतर, संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविले जातील. निर्धारित वेळेत रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास संबंधित कनिष्ठ अभियंता, साहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना जबाबदार धरले जाणार आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.