Home बातम्या धेंपोचे अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब

धेंपोचे अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब

0

स्वगृहीच्या सामन्यात ईस्ट बंगाला अनिर्णित रोखून पाचव्यांदा प्रतिष्ठेचे राष्ट्रीय लीग अजिंक्यपद पटकावलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबने या औपचारिकतेच्या सामन्यात बहारदार खेळीत दर्जास साजेसा विजय प्राप्त केला. धेंपोचे हे पाचवे आय लीग अजिंक्यपद होय. याआधी त्यानी २००४-०५, २००६-०७, २००७-०८ आणि २००९-१० साली राष्ट्रीय लीग विजेतेपद मिळविले होेते.पाच वेळा राष्ट्रीय लीग अजिंक्यपद पटकावणारा पहिला संघ बनण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या धेंपोला झळाळत्या चषकासह रु. ७० लाखाचा पुरस्कारही मिळाला.

या अजिंक्यपदासह धेंपो स्पोर्टस क्लब २०१२-१३मधील एएफसी कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करील. धेंपोने प्रारंभापासून सुसुत्रबध्द आणि सुनियंत्रित खेळीत सामन्यावर वर्चस्व गाजविताना मध्यंतराला २-० अशी आघाडी घेतली. स्पधेंत सर्वाधिक गोल नोंदण्याचा मान मिळविलेल्या रँटी मार्टिन्सने १८व्या मिनिटाला धेंपोचे खाते खोलले. डाव्या फळीतून मिळालेल्या क्रॉसवर रँटी मार्टिनने प्रतिस्पर्धी गोलरक्षक अभिजित मंडलला चकवीत धेंपोचा पहिला गोल नोंदला. ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरलेल्या रँटी माटिर्ंन्सचा हा विद्यमान प्रतियोगितेतील ३२वा गोल होय. ३१व्या मिनिटाला अनुभवी मध्यरक्षक क्लायमॅक्स लॉरेन्सने प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीतील गलथानपणाचा लाभ उठवीत धेंपोचा दुसरा गोल नोंदला. रँटी मार्टिन्सच्या जागी राखीव उतरविलेल्या कोको साकिबोने ८७व्या मिनिटाला धेंपोचा तिसरा व विजयावर शिक्कामोर्तब (३-०) करणारा गोल नोंदला. या विजयासह धेंपोने २६सामन्यातील सर्वाधिक ५७ गुणासह आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. प्रयाग युनायटेड संघ २६ सामन्याअखेर ४२ गुणावर राहिला. प. बंगालचे क्रीडामंत्री श्री. मदन मित्रा यानी यांच्याहस्ते विजेत्याना चषक प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस श्री. कुशल दास यावेळी उपस्थित होते. स्थानिक प्रयाग युनायटेडने खिलाडूवृत्तीस साजेशा पध्दतीने प्रारंभास आय लीग विजेत्याना मानवंदना दिली. प्रारंभास क्लायमॅक्स लॉरेन्सच्या नेतृत्वाखालील गोव्याचा धेंपो स्पोर्टस क्लब मैदानात दाखल होत असताना प्रयाग युनायटेडच्या खेळाडूनी टाळ्या वाजवित आय् लीग विजेत्याना अभिवादन केले. भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील विजेत्याना मानवंदना देण्याची ही पहिलीच घटना होय.