धेंपोचा रोमिओ ब्राझिलमध्ये खेळणार

0
94
धेंपो हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात रोमिओ फर्नांडिसला क्लब ऍटलेटिको पॅरानाएन्सची जर्सी प्रदान करताना धेंपो उद्योगसमूहाचे चेअरमन श्री. श्रीनिवास धेंपो. बाजूला धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे प्रशिक्षक आर्थुर पापास व सरचिटणीस विल्फ्रेड डिसोझा. (छाया : नंदेश कांबळी)

क्लब ऍटलेटिको पॅरानाएन्स या ब्राझिलच्या अव्वल संघाने रोमिओ फर्नांडिस या आमच्या युवा खेळाडूला ‘लोन’ वर घेणे हा महत्त्वपूर्ण क्षण असून धेंपो स्पोर्ट्‌स क्लबच्या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ठरावे, असे प्रतिपादन धेंपो उद्योगसमूहाचे चेअरमन श्री. श्रीनिवास धेंपो यांनी केले.रोमिओ फर्नांडिस हा धेंपो क्लबचा घटक असून उज्वल भवितव्यासाठी वेगळ्या देशात, वेगळ्या संस्कृतीत जात असल्याने तो सुरक्षित वातावरणात असावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यामुळे ऍटलेटिको पॅरानाएन्सकडून प्रस्ताव आल्यानंतर क्लबच्या उपाध्यक्षांशी आपण संपर्क साधून त्याच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी हमी घेतली. इंग्रजी संभाषण करणारा प्रशिक्षक असावा याचीही खात्री करून घेतली आणि नंतरच त्याच्या पालकांशी बातचित करून हा निर्णय घेतला, असेही धेंपो यांनी सांगितले.
असोळणा येथील रोमिओ फर्नांडिस हा माजी प्रशिक्षक आर्मांद कुलासो यांनी निवडलेला कुशल खेळाडू असून, युवा नैपुण्याला वाव देण्यात स्वारस्य असलेले विद्यमान प्रशिक्षक आर्थुर पापास यांच्या मार्गदर्शनानंतर हिरो इंडियन सुपर लीगमध्ये ब्राझिलचे दिग्गज प्रशिक्षक झिको यांच्या कुशल मार्गदर्शंनाखाली त्याच्या नैपुण्याला नवचैतन्य लाभले. या खेळाडूला अधिक अनुभव मिळवून देण्यासाठी झिको यांनी केलेल्या शिफारसीनंतर क्लब ऍटलेटिको दे पॅरानाएन्सने ‘लोन’वर घेण्याचा प्रस्ताव पाठविला. आवश्यक सर्व सोयीसुविधा व इतर सोपस्कारानंतरच त्याला पाठविण्याचा निर्णय घेतला असून ब्राझिलियन फुटबॉल संस्कृतीत या खेळाडूच्या कौशल्याला नवा बहर येईल, अशी अपेक्षाही धेंपो यांनी प्रगटविली. युवा खेळाडूसाठी हा उत्तम ‘प्लॅटफॉर्म’ असून अन्य फुटबॉलपटूनीही आपले कौशल्य प्रगटवून अधिक अनुभवासाठी प्रयत्नशील रहावे, असेहीे ते म्हणाले.
२२ वर्षीय रोमिओने १५ फेब्रुवारी रोजी करारावर स्वाक्षरी केली असून जूनपर्यंत तेथे असेल. ऍटलेटिको पॅरानाएन्स क्लबची इच्छा असल्यास कराराचे आणखी सहा महिन्यासाठी, डिसेंबरपर्यंत, नूतनीकरण होऊ शकते. त्यानंतर त्याला धेंपो क्लबकडून विकत घ्यावे लागेल. ‘लोन’ कालावधीत रोमिओचा सवर्ं खर्च ब्राझिलियन क्लब करणार असून करार समाप्तीनंतर क्लबने त्याला घेतल्यास धेंपोला ट्रान्सफर फी द्यावी लागेल. ऍटलेटिको पॅरानाएन्स क्लबने त्याला विकतघेतले वा अन्य क्लबने त्याला खरीदल्यास धेंपोला भरपाई द्यावे लागेल.
ब्राझिलियन क्लबतर्फे खेळण्यासाठी जाणारा पहिला गोमंतकीय तथा भारतीय फुटबॉलपटूचा मान रोमिओला मिळालेला असून हा खेळाडू अनुभव समृध्द बनून देशात परतेल, अशा विश्‍वास धेंपो स्पोर्टस क्लबचे प्रशिक्षक अर्थुर पापास यांनी व्यक्तविला. क्लब ऍटलेटिको पॅरानाएन्सने माझी निवड केल्याबद्दल अत्यंत संतुष्ट असून धेंपो स्पोटर्ंस क्लब तसेच क्लबप्रमुख श्रीनिवास धेंपो यांनी दिलेल्या सहयोगाबद्दल ऋणी आहे, असे रोमिओने सांगितले. दरम्यान, भारतात होणार्‍या २०१७ फिफा अंडर-१७ विश्‍व चषकासाठी भारतीय युवा संघ बांधणीत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला सहयोग देण्याचा करार ऍटलेटिको पॅरानाइन्स क्लबने केलेला आहे.