>> दुचाकी खांबाला धडकून अपघात; रक्तस्त्रावामुळे मृत्यू
धारगळ-पेडणे येथे झालेल्या दुचाकी अपघातात निरवडे-सावंतवाडी येथील 25 वर्षीय युवक जागीच ठार झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर काल दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. वासुदेव पेडणेकर (रा. झरबाजार-निरवडे) असे मृत युवकाचे नाव आहे. दुचाकी सिमेंटच्या खांबाला धडकून ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी गोव्यात धाव घेतली. दरम्यान, अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे संबंधित युवकाचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव पेडणेकर हा कोलवाळ येथे कामाला होता. तो आपल्या ताब्यातील दुचाकीने कामावरून घरी परतत होता. यावेळी धारगळ ग्रामपंचायत परिसरात तो आला असता मुंबई-गोवा महामार्गावर दुभाजकाजवळील सिमेंट खांबाला त्याच्या दुचकीची जोरदार धडक बसली. त्यात तो रस्त्यावर आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती दिल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप परिसरातील स्थानिकांनी केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचमामा केला.
या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रेती आणि माती साचलेली आहे, त्यावर दुचाकी घसरली आणि समोरील सिमेंटच्या खराब झालेल्या खांबाला दुचाकी आदळली. या अपघातानंतर एकीकडे हेल्मेट, दोन बाजूला त्याची चप्पल आणि तिसऱ्या बाजूला मोटरसायकल पडल्याचे चित्र दिसत होते. वासुदेव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.