धारगळ अपघातात दांपत्य जागीच ठार

0
11

महाखाजन परिसरातील घटना; ट्रकचा टायर फुटल्याने समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडक; पोलिसांकडून ट्रकचालकाला अटक

धारगळ येथील महाखाजन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डिचोली तालुक्यातील मधलावाडा-साळ येथील दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या ह्या अपघातात रामचंद्र चंद्रकांत राऊत (63) आणि त्यांची पत्नी रेश्मा रामचंद्र राऊत (53) यांचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य काही कामानिमित्त पेडणे परिसरात गेले होते. काम आटोपून आपल्या गावी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी ट्रकचालकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी 11 च्या सुमारास जीए-03-व्ही-8773 क्रमांकाचा काँक्रिट पावडरने भरलेला ट्रक आणि जीए-04-एम-8191 क्रमांकाची दुचाकी ही दोन्ही वाहने म्हापशाच्या दिशेने जात होती. त्यावेळी धारगळ महाखाजन परिसरात ट्रकचा मागील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर रामचंद्र राऊत आणि रेश्मा राऊत हे दुचाकीसह ट्रकखाली सापडले. धडकेनंतर दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. तसेच ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर चढून विद्युत खांब उखडून पडला.

या अपघाताची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
जखमी दोघांनाही तातडीने उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे मृत घोषित करण्यात आले. यानंतर दोघांचे मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले, तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
रामचंद्र राऊत हे कदंब परिवहन महामंडळातून वाहक (कंडक्टर) पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित पुत्र, विवाहित भाऊ, भावजय, पुतणे तसेच मोठा परिवार आहे. ते साळ गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होत असल्याने त्यांच्या आकस्मिक निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी ट्रकचालक लक्षदीप चलवादी (23, मूळ रा. कर्नाटक व सध्या पेडे-म्हापसा) याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. पेडणे पोलीस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

कुंकळ्ळी अपघातात जखमी तरुणाचे निधन

देवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना कुंकळ्ळी येथे झालेल्या स्वयंअपघातातील जखमी तरुणाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजय पांढरेकर (31) हा तरुण अंकोला येथे धार्मिक स्थळी भेट देऊन घरी परत होता. तो मित्रांसोबत खासगी वाहनाने देवदर्शनासाठी गेला होता. कुंकळ्ळी येथील पोलीस स्थानकासमोर पोहोचला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला पहिल्यांदा बाळ्ळी आरोग्य केंद्रात, तेथून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले; पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले होते, तेथे उपचार चालू असताना काल त्याचे निधन झाले.