धर्म व विज्ञानात कोणताहीसंघर्ष नाही : मोहन भागवत

0
14

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विज्ञान आणि धर्म यांच्यातील संबंधांसंदर्भात मोठे विधान केले आहे. विज्ञान आणि धर्म यांच्यात कोणताही संघर्ष नाही, दोन्ही वेगवेगळ्या मार्गांनी एकाच सत्याचा शोध घेतात, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. शुक्रवारी आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथे आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात ते बोलत होते.

ऐतिहासिकदृष्ट्‌‍या वैज्ञानिक संशोधनात धर्माचे काहीही स्थान नाही, असे मानून विज्ञानाने धर्मापासून अंतर राखले. मात्र, हा दृष्टिकोन मूलभूतपणे चुकीचा आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात केवळ कार्यपद्धतीचा फरक आहे, दोघांचेही अंतिम ध्येय ‘सत्य शोधणे’ हेच आहे. भारताने केवळ आर्थिक किंवा सामरिक महाशक्ती नव्हे, तर ‘विश्वगुरू’ बनण्याचे ध्येय ठेवावे, असे भागवत म्हणाले.

धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमांनुसार चालते, त्याचे विज्ञान आहे. कुणी मान्य करो अथवा न करो; पण या नियमांच्या बाहेर कोणालाही कार्य करू शकत नाही. एवढेच नाही तर धर्मातील असंतुलन हे विनाशाचे कारण ठरते, असेही भागवत म्हणाले. पर्यावरणासारख्या जागतिक समस्यांचा उल्लेख करत भागवत म्हणाले, वैज्ञानिक ज्ञान जनतेपर्यंत त्यांच्या मातृभाषेतून पोहोचवणे आवश्यक आहे. भारताने केवळ आर्थिक किंवा सामरिक महाशक्ती बनण्याऐवजी ‘विश्वगुरू’ बनण्याचे ध्येय ठेवावे. भारत वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून संपूर्ण मानवतेला नवी दिशा देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.