धर्मांतरविरोधी विधेयकास काँग्रेसचा विरोध

0
12

युरी आलेमाव यांच्यासह अन्य नेत्यांनी केले स्पष्ट; नागरिकांत फूट पाडण्याचा प्रयत्न

राज्यातील भाजप सरकार प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकाच्या माध्यमातून फोडा व राज्य करा हे धोरण राबवून हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस अशा प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकाला गोवा विधानसभेत विरोध करणार आहे. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार तसेच गोव्याशी संबंधित मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकाला विरोध केला आहे. राज्यातील सामाजिक सलोख्याची परंपरा पाहता धर्मांतराबाबत नवीन कायद्याची कोणतीही गरज नाही, असे विरोधी पक्षांतील आमदारांनी म्हटले आहे.

राजकीय फायद्यासाठी विधेयक : डिकॉस्टा
भाजपची भूमिका नेहमीच विविध समुदायांच्या विरोधात राहिली आहे. त्यांना आपल्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिचन यांच्यात फूट पाडायची आहे. गोमंतकीयांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने आणल्या जाणाऱ्या या धर्मांतरविरोधी विधेयकाला विरोध केला जाईल, असे केपेचे आमदार आल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले.

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : फेरेरा
गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्यात नवीन धर्मांतरविरोधी कायद्याच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका काँग्रेसचे हळदेोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी केली. आगामी विधानसभा अधिवेशनात हे विधेयक मांडले गेल्यास काँग्रेस त्याला ठामपणे विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधेयकाची गरजच काय?
गोव्यात धर्मांतराची एकही ठोस घटना नोंदलेली नसताना अशा कायद्याची गरज काय, असा प्रश्न आमदार कार्लुस फेरेरा यांनी उपस्थित केला. राज्यात धर्मांतर होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, धर्मांतराच्या प्रकरणांबाबत आकडेवारी मागितल्यानंतर तीन प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला. त्यापैकी एका प्रकरणाचा पोलिसांनी तपास बंद केला, तर अन्य दोन प्रकरणे उच्च न्यायालयाने रद्द केली, असे फेरेरा यांनी सांगितले.

विरियातो फर्नांडिस यांचाही विरोध
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकाला विरोध केला आहे. राज्य सरकारने गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे फर्नांडिस म्हणाले.


आलेक्स रेजिनाल्डही विधेयकाच्या विरोधात
राज्य सरकारला पाठिंबा देणारे कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी देखील प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकाला विरोध केला आहे. गोवा विधानसभेत या विधेयकाला विरोध करणार असून, सदर विधेयक स्थायी समितीकडे पाठविण्याची मागणी करणार आहे, असेही रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे.

विधेयक विधानसभेत मांडू तर द्या : मुख्यमंत्री
राज्यात प्रस्तावित धर्मांतरविरोधी विधेयकाला होणाऱ्या विरोधाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आधी हे विधेयक विधानसभेत मांडू द्या. राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यावर विधेयकावर विधानसभेत चर्चा केली जाणार आहे.