कर्नाटकच्या कुर्ग जिल्ह्यातील मल्लाली धबधबा पाहण्यासाठी गेलेले विद्यार्थी धबधब्याच्या अगदी मधोमध अडकले होते. या विद्यार्थ्यांनी प्रशासनाने लावलेले सुरक्षा बॅरिकेड्स ओलांडून ते तिथे पोहोचले व याचवेळी डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अचानक प्रचंड वाढला व या विद्यार्थ्यांना मागे फिरण्याची संधीच मिळाली नाही. जीव वाचवण्यासाठी ते धबधब्याच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या खडकावर चढले आणि तिथेच अडकून पडले. यानंतर तिथे उपस्थित स्थानिकांनी याची कल्पना अग्निशामक दलाला मिळताच दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिक आणि दोरीच्या मदतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून खडकावर अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक-एक करून सुखरूप बाहेर काढले.

