अभयारण्ये व अन्य वन्य क्षेत्रात प्रदूषण होऊ नये यासाठी राज्यातील धबधब्यांवर प्लास्टिक तसेच मद्य नेण्यावर आता कडक बंदी घालण्यात आली असल्याची माहिती काल गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिली. पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच वन क्षेत्रात कचरा होऊ नये व प्रदूषण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. धबधब्यांवर कचऱ्याच्या पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच प्लास्टिकसह अन्य कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळाची सोयही करण्यात आलेली आहे. मात्र, असे असताना काही पर्यटक धबधब्यांवर प्लास्टिकच्या बाटल्या तसेच प्लास्टिक पिशव्या जंगलात टाकून देत असल्याचे दिसून आले असल्याचे दिव्या राणे म्हणाल्या. या कचऱ्यामुळे जंगल परिसरात प्रदूषण होते. तसेच या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. त्याचबरोबर वन्य प्राण्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो, अशी भीती राणे यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर धबधब्यांवर प्लास्टिकच्या वस्तू व बाटल्या नेण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या. काल कांपाल येथे गोवा वन विकास महामंडळाच्या काजू विक्री केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. या केंद्राचा काजू उत्पादकांना फायदा होणार असल्याचे सांगताना महामंडळ त्यांच्याकडून काजू विकत घेणार असल्याने काजू दलालांकडून त्यांची होणारी फसवणूक बंद होणार असल्याचे त्या म्हणाल्या.