धनाची पूजा, अर्थात ‘धनत्रयोदशी’

0
11
  • अंजली आमोणकर

धनत्रयोदशी आश्‍विन महिन्याच्या त्रयोदशीला असते. देवांचे वैद्य ‘धन्वंतरी’ यांचा जन्म याच दिवशी झाला, त्यामुळे या दिवशी धन्वंतरीपूजन केले जाते. इंद्रदेव व असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन चालले असताना, मंथनातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली, तसेच धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. त्यामुळे या दोघांचाही पूजेचा मान या दिवशी असतो.

दिवाळी हा सण कृषीसह कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषतः स्पष्ट करतो. धनत्रयोदशी आश्‍विन महिन्याच्या त्रयोदशीला असते. देवांचे वैद्य ‘धन्वंतरी’ यांचा जन्म याच दिवशी झाला, त्यामुळे या दिवशी धन्वंतरीपूजन केले जाते. धन्वंतरी हे वेदांत निष्णात होते, तसेच ते मांत्रिक व तांत्रिक विद्या जाणत होते. त्यांच्यापायी सर्व देवांना अनेक उत्तमोत्तम औषधींचा लाभ झाला. इंद्रदेव व असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन चालले असताना, मंथनातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली, तसेच धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. त्यामुळे या दोघांचाही पूजेचा मान या दिवशी असतो. यामध्ये उपजीविकेसाठी उपयोगी असलेल्या सर्व वस्तूंचे पूजन केले जाते. व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशेबाच्या वह्या, दुकाने- त्यामधील सर्व साहित्य, तिजोरी यांची पूजा करतात. तसेच या दिवसापासून हिशेबाची नवी वही सुरू करण्याची प्रथा आहे.
या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन पोशाख परिधान केला जातो. घराबाहेर पणत्या व आकाशकंदील पेटवले जातात. खास दिवाळीसाठी केलेल्या फराळाचा अस्वाद घेतला जातो. संध्याकाळी आतषबाजी होते. या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्त्व आहे.
कार्तिकस्यासिते पक्षे त्रयोदश्यां निशामुखे|
यमदीपं बहिर्दद्यादपमृत्युर्विनिश्यती॥

  • याचा अर्थ, या दिवशी संध्याकाळी यमाकरिता जर दीप पेटवून ठेवला तर अपमृत्यूचे निवारण होते. तसेच यमाच्या नावानं दीपदान केल्यास अकाली मृत्यू येत नाही.

या दिवशी धातूची नवीन भांडी (पात्रं) विकत घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे क्रय-विक्रयाद्वारे लक्ष्मीतत्त्वाला गतिमानता प्राप्त होते व धनकोषात वाढ होते. या दिवशी अनेक लोक उपास करताना दिसतात.
धनत्रयोदशी या सणामागे काही दंतकथाही आहेत. असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखं उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्याचांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागं ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशाप्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणूनच या दिवसास ‘यमदीपदान’ असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात व प्रसादरूपाने कडुलिंबाच्या पानांचे बारीक तुकडे व साखर वाटतात. यात मोठा अर्थ आहे. कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृततत्त्व देणारा आहे हे यातून प्रतीत होते. कडुलिंबाची पाचसहा पानं जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नसतो.

धनत्रयोदशीबद्दल दुसरी एक कथाही कथन करण्यात येते. तिचं नाव आहे समुद्रमंथन. महर्षी दुर्वास यांनी दिलेल्या शापापासून मुक्त होण्यासाठी असुर म्हणजेच राक्षस आणि सूर म्हणजेच देव यांनी मिळून समुद्रमंथन केले. त्यातूनच लक्ष्मी-कुबेर व धन्वंतरीची उत्पत्ती झाली. श्रीसूक्तात वासू म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी व सूर्य यांनाही धन म्हटले आहे.
या दिवसाबद्दल आणखीही काही प्रथा/समज आहेत. या दिवशी तेरा दिवे घरात व तेरा दिवे घराबाहेर लावल्याने घरातील दारिद्य्र, अंधःकार व नकारात्मक ऊर्जा दूर होते. या दिवशी किन्नरांना दान करावे व त्यांच्याकडून एक नाणे मागून घ्यावे. ते नाणे पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवणार नाही. जर आपल्याकडे धन येत असेल पण टिकत नसेल तर देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्यात. या दिवशी पांढर्‍या वस्तूचे (साखर, बत्तासे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे, पांढर्‍या वस्तू) दान केल्याने जमापुंजी वाढते व कामात येणारे अडथळे दूर होतात, असा समज आहे. या दिवशी दारावर येणार्‍या भिकार्‍यांना विन्मुख केले जात नाही. तसेच वटवाघळं बसत असलेली डहाळी तोडून बैठकीत ठेवल्यास समाजात प्रतिष्ठा वाढते व धनात वृद्धी होते असे मानले जाते. धनत्रयोदशीच्या पूजेआधी व नंतर शंखात पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे. याने लक्ष्मीचं आगमन होतं. या दिवशी मंदिरात जाऊन आल्यानंतर केळीचं वा सुवासिक फुलांचं झाड लावावं. जसजसं ते झाड वाढत जाईल तसतसं यश व पैसा वाढत जाईल अशी लोकांची भावना आहे.

‘धनत्रयोदशी’ ज्या दिवाळीचा एक भाग आहे, ती दिवाळी साजरी करण्यामागे फक्त राम वनवासातून परत आले तेव्हा अयोध्यावासीयांनी आनंदाच्या भरात दिवे उजळवून त्यांचे स्वागत केले (तीच ही दिवाळी) हे एकच कारण नाहीय, तर हा लक्ष्मीदेवीचा जन्मदिवसही आहे. तसेच भगवान विष्णूने वामनावतार घेऊन देवी लक्ष्मीला बळीराजाच्या कचाट्यातून सोडवल्याचा दिवस, नरकासुराचा वध, पांडव अज्ञातवासातून परतल्याचा दिवस, समुद्रमंथनातून लक्ष्मी-कुबेर व धन्वंतरी प्रकट होण्याचा दिवस, विक्रम संवतचे प्रवर्तक चक्रवर्ती राजा विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवस, जैन गुरू महावीर यांचा निर्वाण दिवस, शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद यांचे बादशहा जहांगीर याच्या कैदेतून सुटण्याचा दिवस, देवी महाकालीचा शांत होण्याचा दिवस… अशी अनेक कारणे आहेत.

भारताशिवाय दिवाळी इंडोनेशिया, जपान, म्यानमार, बर्मा, सिंगापूर, श्रीलंका, गुयाना, मॉरिशस, नेपाळ, मलेशिया या देशांमध्येही साजरी केली जाते.

आपले सण मनुष्याला जगण्याचे उद्दिष्ट म्हणजे ‘पर्पज ऑफ लाईफ’ देतात, ज्यामुळे नैराश्य येत नाही. जिथे संस्कृतीची कमतरता असते तिथे आत्मघातकी, हिंसक विचार उदयास येतात.

स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत एका विद्वानाने भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य विचारले असता ते म्हणाले, ‘आमची कुटुंबव्यवस्था हेच आमचे वैशिष्ट्य आणि आपले सण ही कुटुंबव्यवस्था जपण्यास मदत करतात.’ जर शास्त्र समजून घेऊन आपण हा सण साजरा केला तर त्याचा आपल्याला शारिरिक, आध्यात्मिकदृष्ट्या लाभच होणार.
आपल्या संस्कृतीने एवढा नयनरम्य आणि डोळे दिपवणारा दिलेला दीपोत्सव केवळ आवाज व धूर यांच्या अतिरेकात वाया न घालवता, अधिकाधिक साधना (म्हणजेच नामजप, प्रार्थना, सत्सेवा, दान इत्यादी) करण्याचा प्रयत्न करावा.

धनत्रयोदशीच्या दिवशी यमराज व धन्वंतरीची पूजा करण्यामागे सुदृढ प्रकृतीची आकांक्षा (जेणेकरून आयुष्याचा उपभोग नीटपणे घेता येईल) असते. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
आज कोरोनासारख्या महामारीतून बाहेर पडत असता हिंदू संस्कृतीमध्ये सणांच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची किती काळजी घेतली जाते हे प्रकर्षाने लक्षात येते. वाराणसी हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे दिवाळी एकदा नव्हे दोनदा साजरी करतात. यातील एक दिवाळी माणसांशी संबंधित आहे, तर दुसरी दिवाळी देवतांशी संबंधित आहे, ज्याला लोक ‘देवदिवाळी’ असं म्हणतात.