गोवा धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आल्तिनो-पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन धनगर-गवळी समाजाला एसटी दर्जा देण्याच्या मागणीचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांच्याकडे काल केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ मागून घ्यावा, अशी विनंती देखील केली.
राज्यातील धनगर समाजाकडून एसटी दर्जा देण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्याने राज्यातील धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविला होता. तथापि, केंद्रीय मंत्रालयाने या प्रस्तावात त्रुटी असल्याने तो मान्य केलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी धनगर समाज संस्थेच्या मडगाव येथे घेण्यात आलेल्या बैठकीत समाजाच्या एसटी दर्जाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना निवेदने सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर, धनगर समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या एसटी दर्जाच्या विषयावर चर्चा केली. तसेच, धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी वेळ मागून घेण्याची मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याच्या विषयावर केंद्रीय आदिवासी मंत्र्याशी चर्चा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी वेळ मागून घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.

