28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

दोषी कोण?

विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांना ते जे नऊ हजार कोटींचे देणे लागतात, त्यापैकी आयडीबीआयने दिलेल्या ९५० कोटींच्या कर्जातून विदेशात मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा आदेश दिला आहे. म्हणजे हिमनगाचे हे केवळ टोक आहे. ही तर केवळ सुरूवात आहे. स्वतः मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये दडून बसले आहेत. आपण फरारी झालेलो नाही व पुन्हा भारतात परतणार आहोत, असे त्यांनी भारतातून गायब झाल्यावर जाहीर केले होते, परंतु न्यायालयाने आजवर तीन समन्स जारी करूनही ते परतलेले नाहीत. न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटमुळे आता अंमलबजावणी संचालनालयाला सीबीआयमार्फत इंटरपोलशी संपर्क साधून त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ललित मोदींविरुद्ध असे प्रयत्न झाले होते, परंतु आजवर निष्फळ ठरले आहेत हे लक्षात घेता मल्ल्यांसंदर्भात हे अस्त्र कितपत लागू होईल साशंकता आहे. ललित मोदीविरुद्ध आधी ‘फेमा’ कायद्याखाली गुन्हे नोंदवले गेले होते, म्हणजेच ते दिवाणी स्वरुपाचे होते. नंतर ते फौजदारी स्वरूपाचे केले गेले. त्यामागे राजकीय कारणे असल्याचे इंटरपोलला सांगत ललित मोदींनी भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा दिला. मल्ल्याही त्याच वाटेने जाऊ शकतात. हे कर्ज आपले वैयक्तिक कर्ज नाही हा बचाव ते करीत आहेतच. बोफोर्स प्रकरणातील क्वात्रोचीला शेवटपर्यंत भारतात परत आणता आले नव्हते. मल्ल्यांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी झाली आणि त्यांच्या विदेशात जेथे असतील तेथे मुसक्या आवळल्या गेल्या, तर त्यांना भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावे लागतील. तेही यशस्वी झाले तरीही त्यातून बुडीत खात्यात गेलेल्या बँकांचे कर्ज काही फिटणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मनमानीपणे कर्जांची खिरापत वाटलेले विजय मल्ल्या हे काही एकमेव उद्योगपती नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बुडीत खात्यात गेलेली एकूण कर्जे चार लाख कोटींच्या घरात आहेत. बँकांचे ताळेबंद नीट तपासले गेले आणि पुनर्रचित कर्जांच्या आकडेवारीच्या मुळाशी गेले, तर ती त्याहून अधिक असू शकतात. मल्ल्यांच्या मागून अशा कर्जबुडव्यांची फार मोठी रांग आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणामुळे हजारो कोटींची कर्जे त्यांनी बुडविली आहेत. हा शेवटी तुमचा – आमचा पैसा आहे. या बँकांपुढे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची भरपाई सरकार करणार आहे. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पंचवीस हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहेच. म्हणजेच धनदांडग्या कर्जबुडव्या ठकसेनांच्या आणि बँकांच्या व्यवस्थापनांच्या आणि त्यांच्या राजकीय आश्रयदात्यांच्या संगनमताचा खरा फटका आम जनतेला बसला आहे. ज्या १७ बँकांच्या समुदायाने मल्ल्यांचे बुडते तारू न पाहता आंधळेपणाने कर्जवाटप केले, त्यांच्या बड्या अधिकार्‍यांना यातून नामानिराळे राहता येता कामा नये. एक तर कंपनीची बुडती स्थिती न पाहता त्यांनी कर्जपुरवठा चालू ठेवला आणि दुसरे म्हणजे कंपनी गाळात गेल्यावर त्या कर्जाच्या वसुलीसंदर्भातही अक्षम्य दिरंगाई केली. दुसरीकडे मल्ल्यांच्या ऐषारामात कुठेही कमी आल्याचे दिसत नाही. उद्या ते कोण्या तिसर्‍या देशाचे नागरिकत्व मिळवून या सगळ्या शुक्लकाष्ठातून पळवाटा काढू शकतात. किंगफिशर एअरलाइन्स गाळात गेली, त्याला गैरव्यवस्थापनच कारणीभूत ठरले आहे हे तर उघड आहे, कारण इतर सर्व विमान कंपन्या आपल्या नुकसानातून सावरून आता नफ्यात आल्या आहेत. इंडिगोने तर प्रचंड नफा मिळवला आहे. जवळजवळ बुडू लागलेली स्पाईसजेट नव्या गुंतवणुकीनंतर नफ्यात आली आहे. हे सगळे पाहिले तर विजय मल्ल्या हवाई क्षेत्रावर आपल्या गैरव्यवस्थापनाचे खापर फोडून नामानिराळे होऊ शकत नाहीत. व्यवसायात चढउतार हे येतच असतात. पोलाद, ऊर्जा, कापड उद्योग अशी अनेक क्षेत्रे आज आर्थिक संकटात आहेत. परंतु त्या आव्हानांवर मात करण्यात त्या त्या क्षेत्रातील उद्योगपती व्यस्त आहेत. मल्ल्या मात्र मौजमजेत दंग राहिले. आता तरी त्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी आणि भारतात परतून कायदेशीर बाबींना स्वतः सामोरे जायला हवे. ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आजवर ते राष्ट्राभिमानाची बात करीत आले. टिपू सुलतानाची तलवार परत मिळवण्यापासून महात्मा गांधीजींची पत्रे लिलावात जाण्यापासून वाचवण्यापर्यंत अनेक वेळा मल्ल्यांनी आपली देशभक्ती दाखवली. आता त्यांच्या देशभक्तीची खरी कसोटी आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...