फोंड्यात उड्डाणपुलावरून कार दरी कोसळली
फोंडा व बागा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. फोंडा येथे उड्डाणपुलावरून कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर चार युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीनंतर घडला. दरम्यान, बागा कळंगुट येथे काल रविवारी पहाटे झालेल्या अपघातात चंदिगड येथील पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला
आहे.
फोंडा येथील उड्डाणपुलावरून शनिवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने धावणारी एक कार (जीए 08 एन 0547) दरीत कोसळून प्रदीप गौडा (36, नागझर- कुर्टी) याचा जागीच मृत्यू झाला.
कदंब बस स्थानकाजवळ घडलेल्या भीषण अपघातात कारमध्ये असलेले अरबाज सनदी (30, नागामशीद – कुर्टी), अदनान सनदी (20, नागामशीद – कुर्टी), इम्रान शेख (48, नागामशीद – कुर्टी) व आफताब सनदी (25,नागामशीद – कुर्टी) यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या सर्व चारही युवकांना फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन बाहेर काढून इस्पितळात दाखल केले.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री सदर कार पणजीहून फोंडा येथे जात होती. सुसाट वेगाने जाणारी ही कार कदंब बसस्थानकाच्या वरच्या बाजूला पोहचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारची उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्याला धडक बसून कार हवेत उडून अंदाजे 30-35 फूट खाली दरीमध्ये कोसळली.

