महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनानंतर मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांच्या प्रकरणांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध कदापि दिले जाऊ नये. पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सुरक्षित नाहीत. इतकेच नाही, तर पाच वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य कालावधीसाठीच याचा वापर केला गेला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
खोकला आणि सर्दीच्या प्रकरणात आधी आराम, पुरेसे पाणी आणि इतर सहाय्यक उपाय करणे गरजेचे आहे. सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांनी फक्त गुणवत्तापूर्ण औषधेच द्यावीत आणि राज्य आरोग्य विभागाने हे सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य केंद्रात लागू करावे. भारत सरकारने कफ सिरप आणि सर्दी-खोकल्याच्या औषधांचा सुरक्षित आणि तर्कसंगत वापर व्हावा यासाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
दोन वर्षांहून लहान मुलांना कफ सिरप आणि सर्दीचे औषध कदापि दिले जाऊ नये. पाच वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी ही औषधे सामान्यतः सुरक्षित मानली जात नाहीत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सिरप देण्याच्या आधी हे उपाय करा
पाच वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांसाठी वापर हा फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली, योग्य प्रमाणात आणि मर्यादित काळासाठी केला गेला पाहिजे. सर्दी आणि खोकला या आजारांसाठी औषधांएवजी इतर उपाय जसे की पुरेसे पाणी पिणे, आराम करणे आणि इतर सहायक उपाय केले पाहिजेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

