दोन राज्यांतील वेगवेगळ्या अपघातांत 43 ठार

0
8

तेलंगणातील अपघातात 24 प्रवासी ठार, तर राजस्थानमध्ये 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये काल झालेल्या अपघातांमध्ये 43 जणांना आपला प्राण गमवावा लागला.
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात मिरजगुडा-खाणापूर मार्गावर काल सकाळी एका टीआरटीसी बसला खडीने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये काल दुपारी भरधाव वेगाने निघालेल्या एका डंपर ट्रकने एकामागून एक 17 वाहनांना धडक दिली. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. सदर डंपरचालक मद्यधुंद अवस्थेत होता.
रंगारेड्डी जिल्ह्यातील अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. विकाराबाद-हैदराबाद दिशेने जाणारा ट्रक एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या टीआरटीसी बसवर आदळला. धडकेनंतर ट्रकचा भार बसवर कोसळला आणि खडी बसमधील प्रवाशांच्या अंगावर पडली. त्यामुळे बसमधील अनेक प्रवासी जागीच ठार झाले. तसेच ट्रकमधील चालकाचाही मृत्यू झाला. त्यावेळी बसमध्ये सुमारे 70 प्रवासी होते. तसेच अनेक प्रवासी जखमी झाले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, बस तंदूरहून हैदराबादला जात होती. प्रवाशांमध्ये बहुतांश विद्यार्थी होते. ते रविवारच्या सुट्टीसाठी घरी गेले होते आणि महाविद्यालयात जाण्यासाठी हैदराबादला परतत होते.
मद्यधुंद चालकाने 17 वाहने उडवली
जयपूरमध्ये एका भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर ट्रकने एकामागून एक 17 वाहनांना धडक दिली. हा अपघात सोमवारी दुपारी हरमारा येथील लोहा मंडी येथे झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास डंपर महामार्गावर जाण्यासाठी रोड क्रमांक 14 वरून लोहा मंडी पेट्रोल पंपाकडे जात होता. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेकांचे हातपाय तुटून ते जायबंदी झाले. याशिवाय हा रस्ता रक्ताने माखला होता. या अपघातात 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तिघांना गंभीर अवस्थेत एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.