गोवा राज्य निवडणूक आयोगाने साखळी आणि फोंडा नगरपालिकेच्या प्रभाग फेररचनेसाठीचा मसुदा प्रसिद्ध केला असून, तो संबंधित पालिका आणि मामलेदार कार्यालयांत सूचना व हरकतींसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
या मसुद्यावरील सूचना व हरकती बुधवार दि. 1 मार्चपासून स्वीकारल्या जाणार आहेत. त्या स्वीकारण्याची शेवटची तारीख 13 मार्च अशी आहे. या दोन्ही पालिकांची मुदत 20 मे 2023 रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी फोंडा व साखळीचे मामलेदार यांची निवडणूक निर्वाचन अधिकारी, तर त्याच कार्यालयातील अव्वल कारकून यांची सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग फेररचना मसुद्धामध्ये सूचना, दुरुस्ती, बदल करायचा असल्यास 1 ते 13 मार्च (रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळून) या काळात कार्यालयीन वेळेत त्या सादर करता येतील, असे आयोगाच्या सचिव दर्शना नारुलकर यांनी कळवले आहे.