दोन पक्षांमध्ये अडकली केरळची जनता

0
4

>> पंतप्रधानांचा हल्लाबोल; एकासाठी कुटुंब आणि दुसऱ्यासाठी विचारधारा सर्वोच्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केरळचा दौरा केला. कोची येथे मोदी यांनी सुरुवातीला रोड शो करून लोकांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर त्यांनी ‘युवाम कॉन्क्लेव्ह’ला संबोधित केले. यावेळी मोदींनी केरळमधील सीपीआयएम आणि काँग्रेसवर निशाणा साधला. या दोन्ही पक्षांच्या विचारधारेमुळे केरळमधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सीपीआयएमसाठी सर्वात मोठी त्यांची विचारधारा आहे, तर काँग्रेससाठी एक कुटुंब सर्वोच्च आहे, अशी टीका मोदींनी केली.

सीपीआयएम आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष हिंसा आणि भ्रष्टाचाराला चालना देतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांना हरवण्यासाठी परिश्रम करण्याची गरज आहे. जोपर्यंत युवकांचा सहभाग एखाद्या मिशनमध्ये नसतो तोपर्यंत ते मिशन व्हाटब्रंट होत नसते. एखादे मिशन व्हायब्रंट होण्यासाठी युवकांची ऊर्जा गरजेची असते. केरळमधील भव्यता आणि सुंदरता मला ऊर्जा प्रदान करते, असेही मोदी म्हणाले. केरळमधील युवक जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आल्याबद्दल त्यांचे मोदींनी कौतुक केले.

चर्चा स्टार्ट अप, डिजीटल इंडियाची
21 वे शतक हे भारताचे शतक आहे. आधीच्या काळात असे समजले जात होती की, भारतात काही बदल होणार नाही; परंतु आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. देशात आज अनेक लोक स्टार्ट अप आणि डिजीटल इंडियाच्या चर्चा करत आहेत. देशातील जनता आणि युवक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, असेही मोदी म्हणाले.