छत्तिसगढ राज्यात दोन जिल्ह्यांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफच्या कोबरा बटालियनचे दोन कमांडो शहीद झाले तर अन्य पाच जण जखमी झाले. आज छत्तिसगढमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी खास कोबरा बटालियन गठीत करण्यात आले आहे.
सुकमा जिल्ह्यातील पहिल्या घटनेत कोब्रा बटालियनच्या पथकावर १०० सशस्त्र नक्षलवाद्यांनी चारही बाजूंनी बेधूंद गोळीबार सुरू केला. हे पथक आजच्या निवडणुकीसाठी मतदान सामग्री नक्षल प्रभावित भागातील मतदान केंद्रावर पोचवून परतले होते. या हल्ल्यात दोन कमांडो मृत्युमुखी पडले तर तीन जखमी झाले. दुसर्या घटनेत नजीकच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी दोन शक्तीशाली स्फोट केले. यात दोन सीआरपीएफ जवान जखमी झाले. हे जवान माओवादीबहुल भागात निवडणूक गस्तीवर होते.

