दोन्ही विमानतळांवर होणार कोरोना चाचणी

0
8

जी-20 बैठकांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयाचा निर्णय; 20 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी

दाबोळी विमानतळ आणि मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा दोन्ही विमानतळांवर अँटिजेन चाचणी सुरू करण्याचा निर्णय आरोग्य सेवा संचालनालयाकडून घेण्यात आला आहे. ही चाचणी अनिवार्य करण्यात आलेली नसली, तरी जी-20 बैठकांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ही चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘लक्षण नाही, चाचणी नाही’ हे धोरण यंत्रणांनी स्वीकारल्यामुळे केवळ लक्षणे आढळून येणाऱ्या निमंत्रित प्रतिनिधींचीच चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही विमानतळांवर कोरोना चाचणी सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अनुभवी डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह निमवैद्यकीय कर्मचारी व रुग्णवाहिका सेवा तैनात करण्यात आली आहे. ही चाचणी सेवा 20 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती जी-20 साठीचे (आरोग्य सेवा) विशेष अधिकारी डॉ. केदार रायकर यांनी दिली. हॉटेल ग्रँड हयात गोवा येथेही ही चाचणी सुरू केली जाणार आहे.
आगामी सोमवार ते बुधवार या काळात आरोग्य सेवाविषयक कार्यगटाची दुसरी बैठक ज्या रिसॉर्टमध्ये होणार आहे, तेथेही अँटिजन चाचणी सुविधा सुरू केली जाणार आहे. प्रतिनिधींच्या आगमनाच्या दिवसापासून चाचणी केंद्र पूर्ण दिवस चालू राहणार आहेत. दोन्ही विमानतळांवर आणि हॉटलमध्ये चोवीस तास नियुक्त आरोग्य पथक कार्यरत राहणार आहे, असे राजशिष्टाचार सचिव आणि जी-20 साठीचे नोडल अधिकारी रंजित रॉड्रिग्स यांनी सांगितले.

हॉटेल ग्रँड हयात गोवा येथे राज्यातील डिजिटल आरोग्य सेवाविषयक पहिली बैठक होणार असल्याने तेथे आपत्कालीन कक्ष उभारण्यात येणार असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सेवा संचालनालयातील डॉक्टरांचे पथक कोणतीही आरोग्य स्थिती हाताळण्यास सज्ज असेल.

पोलिसांशी चर्चा करून ग्रीन कॉरिडॉर तयार करणार
मोप येथे थेट उड्डाणसेवा सुरू झालेली नसल्यामुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन हे दाबोळी विमानतळावर होणार आहे. त्यामुळे एक विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याबाबत आरोग्य सेवा अधिकारी गोवा पोलिसांशी चर्चा करीत आहेत. त्याद्वारे एखादा प्रतिनिधी आजारी पडल्यास त्याला तातडीने गोमेकॉत हलवणे शक्य होणार आहे.