दोन्ही मतदारसंघांतून भाजप किमान पाच लाख मते मिळविल : पर्रीकर

0
58
केंद्रात भाजपचे म्हणजे एन्‌डीए सरकार स्थापन होईल, यात संशय नाही. गोव्यातील दोन्ही उमेदवार निवडून आल्यास केंद्रातील सरकारवर दबाव आणून गोव्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची असलेली कामे करून घेणे सोपे होईल, हा मुद्दा प्रचार काळात जनतेला पटविण्याचा प्रयत्न केला आहे व त्यास मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

उमेदवारांनी प्रत्येक घराला भेटी दिल्याचे सांगून कार्यकर्ते एका घरात दोनवेळा भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सासष्टीत भाजपचे दोनच आमदार होते. आता कॉंग्रेसचे फक्त दोन आमदार आहेत. त्यामुळे सासष्टीतील मतदार भाजपकडेच राहतील यात संशय नाही. त्यामुळे दक्षिण गोव्यातील उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसने दक्षिण गोव्याचा उमेदवार म्हणून फ्रान्सिस सार्दिन यांचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर पक्षात जी बंडाळी झाली त्याचे परिणाम निवडणूक निकालानंतर कळतील, असे पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. चर्चने जारी केलेल्या पत्रकांवर आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्यास तयार नाही. भारतीय घटनेनुसार सर्वधर्म समभावाचे तत्व न मानणार्‍या पक्षाला निवडणूक लढविण्यास मान्यता नाही. भाजप हा शंभर टक्के धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचा दावा पर्रीकर यांनी केला. कॉंग्रेस केवळ सर्व धर्मसमभावाचे तत्व मानणारा पक्ष असल्याचे भासवित आहे. प्रत्यक्षाच वेगळेच असते, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक कारणामुळे कर्नाटकात श्रीरामसेनेचे नेते प्रमोद मुतालिक यांना भाजपमध्ये प्रवेश दिला व चार ते पाच तासांच्या आत चूक सुधारण्याचे काम केंद्रीय नेत्यांनी केले. त्यामुळे भाजपमध्ये लोकशाही भिनल्याचे स्पष्ट झाले असे ते म्हणाले.
आपचे उमेदवार डॉ. दत्ताराम देसाई हे एकेकाळचे भाजपचे सदस्य होते. हल्लीच्या काळात ते सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, असे पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. गोव्याला विशेष राज्याचा दर्जा, खास आर्थिक पॅकेज, खाण व्यवसाय आदी विषयांचा भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात समावेश असेल, असे सांगून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीरनामा जाहीर होईल, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.