दोन्ही पालिकांसाठी 118 उमेदवारी अर्ज

0
9

>> फोंडा व साखळी पालिका निवडणूक; आज अर्जांची छाननी

फोंडा आणि साखळी या दोन नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. काल शेवटच्या दिवशी फोंडा पालिकेसाठी 16, तर साखळी पालिकेसाठी 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले. परिणामी फोंडा पालिकेसाठी एकूण 61 अर्ज, तर साखळी पालिकेसाठी एकूण 57 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती काल निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

दोन्ही पालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 10 ते 18 एप्रिल अशी होती. या मुदतीत दोन्ही पालिकांसाठी एकूण 118 अर्ज दाखल झाले. या सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवार दि. 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर वैध अर्जांची संख्या स्पष्ट होणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख गुरुवार दि. 20 एप्रिल अशी असून, सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही पालिकांसाठी 5 मे रोजी मतदान होणार असून, 7 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, फोंडा पालिकेचे 15 प्रभाग आहेत, तर साखळी पालिकेचे 12 प्रभाग
आहेत.

शस्त्रे जमा करण्याचे आदेश
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फोंडा नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, दारुगोळा, प्राणघातक शस्त्रे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागी नेण्यास मनाई केली आहे. फोंडा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शस्त्रे परवानाधारकांनी 21 एप्रिल रोजी पूर्वी जवळच्या पोलीस स्थानकात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परवानाधारकांना मतमोजणीपासून पाच दिवसांनी म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर जमा केलेली सर्व शस्त्रे परत केली
जातील.

पालिका हद्दीतील मद्यालये रात्री 10 नंतर बंद ठेवा
5 मे रोजी होणाऱ्या साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर झालेल्या आणि निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या नगरपालिका प्रभागांतील सर्व मद्य दुकाने, पब्स, क्लब्स, शॅक्स किंवा कोणतीही दारू विक्रीची आस्थापने आचारसंहिता लागू असलेल्या काळात प्रत्येक दिवशी रात्री 10 नंतर बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अबकारी खात्याच्या भरारी पथकाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साखळी पालिकेसाठी शेवटच्या दिवशी 26 अर्ज दाखल

साखळी पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काल 26 अर्ज दाखल झाले. या पालिकेसाठी एकूण 57 उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती निर्वाचन अधिकारी राजाराम परब यांनी काल दिली.
शेवटच्या दिवशी प्रभाग 1 मधून संतोष हरवळकर, दिप्ती चोपडेकर, उमेश पेडणेकर, भाग्यश्री ब्लेगन यांनी अर्ज सादर केले. प्रभाग 2 मधून प्रवीण ब्लेगन, प्रसादिनी कुडणेकर, आकांक्षा सुतार, ज्योती गोसावी, नूरजहाँ खान, प्रभाग 4 मधून धर्मेश सगलानी, निशा पोकळे, अजित देसाई, गिरीश परब, प्रभाग 5 मधून भाग्यश्री ब्लेगन, सुरज नाईक, प्रभाग 6 मधून मरिकुट्टी हसन, भाग्यश्री ब्लेगन, गीता बोर्येकर, प्रभाग 7 मधून विनोद पेडणेकर, प्रभाग 8 मधून रियाज खान, दिवानी जयेश नानजी, शेख मुंजरीन, अँसिरा खान, शेख अब्दुला, प्रभाग 9 मधून भाग्यश्री ब्लेगन, धर्मेश सगलानी या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

कोणत्या प्रभागातून किती अर्ज?
साखळी पालिकेच्या प्रभाग 1 मधून 8, प्रभाग 2 मधून 8, प्रभाग 3 मधून 2, प्रभाग 4 मधून 6, प्रभाग 5 मधून 4, प्रभाग 6 मधून 6, प्रभाग 7 मधून 5, प्रभाग 8 मधून 7, प्रभाग 9 मधून 3, प्रभाग 10 मधून 3, प्रभाग 11 मधून 2 आणि प्रभाग 12 मधून 3 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. प्रभाग 2 आणि प्रभाग 11 मध्ये केवळ दोनच उमेदवारी अर्ज आल्याने थेट लढत होणार आहे. इतर प्रभागांतील चित्र गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

साखळीच्या प्रभाग 6 मधील 56 मतदारांची नावे गायब

साखळी पालिका क्षेत्रातील प्रभाग 6 मधील मतदार यादीतून 56 जणांची नावे गायब झाल्याने त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवीण ब्लेगन, डॉ. सरोज देसाई आणि मतदानापासून वंचित मतदारांनी केली असून, या संदर्भात मामलेदार व निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदान केले होते; मात्र आता 56 जणांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे मतदारांनी सांगितले. या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे; मात्र सध्या तरी या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार हे निश्चित.