गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांची पत्रकार परिषदेत माहिती; सहाव्या दरोडेखोरालाही लवकरच ताब्यात घेणार
म्हापसा आणि दोनापावल येथील दरोड्यांमागे संशयित आरोपी नूर इस्लाम उर्फ नदीम खान हा मुख्य सूत्रधार आहे. त्याला फोंडा येथील एका प्रकरणात अटक करून कोलवाळ येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याला गोव्याच्या विविध भागांची माहिती आहे. दोनापावल येथील दरोडा टाकण्यासाठी त्याने कळंगुट येथे काम करणाऱ्या परराज्यातील एका व्यक्तीची मदत घेतली होती. त्या दोघांची कोलवाळ कारागृहात मैत्री झाली होती. यानंतर नूर इस्लाम याने दरोड्याचा कट रचून अन्य साथीदारांना गोव्यात आणून दरोडे टाकले, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अन्य एका दरोडेखोराला लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ह्या बांगलादेशी टोळीतील सदस्य दरोडा टाकण्यापूर्वी घरांची रेकी करत होते. ते काही दिवस एकांतात किंवा जंगल भागात थांबून घरातील लोकांची हालचाल, झोपेचे वेळापत्रक आणि घरात प्रवेशाचे मार्ग यांचा अभ्यास करत होते. संशय टाळण्यासाठी ते लहान गटांमध्ये विभागून काम करत होते आणि संपर्कासाठी कोणतीही तांत्रिक साधने वापरत नव्हते, असे राहुल गुप्ता यांनी सांगितले.
20 एप्रिल 2025 रोजी दोनापावला आणि 7 ऑक्टोबर 2025 रोजी गणेशपुरी (म्हापसा) येथे घडलेल्या या दोन घटनांनी राज्यात खळबळ उडाली होती. या दोन्ही प्रकरणांचा गेले कित्येक महिने सखोल तपास करून अखेर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले, असे गुप्ता म्हणाले. दरम्यान, गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 15 एप्रिल 2026 च्या दरम्यान दिल्लीच्या गुन्हा अन्वेषण पथकाने या आरोपींना आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली. त्यानंतर पाच आरोपींना ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणण्यात आले असून, 30 एप्रिल रोजी त्यांना पणजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
म्हापसा आणि दोनापावल येथील दरोड्यांचा तपास लावणे हे एक मोठे आव्हान होते. गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करून दिल्ली पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या साहाय्याने बांगलादेशी दरोडेखोरांना अटक करण्यात यश मिळविले. गोवा पोलिसांच्या पथकाने म्हापसा दरोड्यानंतर दरोडेखोरांचा हैदराबादपर्यंत पाठलाग केला होता, असे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.
देशभरात शोधमोहीम
तपासादरम्यान गोवा पोलिसांच्या उत्तर गोवा जिल्हा पोलीस व गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकांनी देशभरात शोधमोहीम राबवली. बेळगाव, विजापूर, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, त्रिपुरा आणि मेघालय या ठिकाणी जाऊन आरोपींचा मागोवा घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्तचर जाळ्याच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासात ही टोळी बांगलादेशातील बागरहाट जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले, असे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
दोनापावल दरोड्यासाठी स्थानिकाची घेतली मदत
दोनापावला दरोड्याच्या तपासात मुख्य आरोपी नूर इस्लाम उर्फ नदिम खान याला मदत करणाऱ्या महमूद याकूब या स्थानिकाला 30 ऑक्टोबर 2025 रोजी पणजी पोलिसांनी अटक केली होती. दोघेही पूर्वी कोलवाळ कारागृहात एकत्र होते आणि तेथेच त्यांची ओळख झाली होती. म्हापसा प्रकरणात दरोडखोर सैफुल इस्लाम याला आश्रय देणाऱ्या दोन आरोपींना बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये दोन्ही प्रकरणांचा तपास गुन्हा अन्वेषणकडे सोपवण्यात आला होता.
शस्त्रांचा धाक
दाखवून लूटमार
दरोड्याच्या वेळी आरोपी लोखंडी रॉड आणि चाकूंसारख्या शस्त्रांचा वापर करून घरातील सदस्यांना धमकावत, त्यांना बांधून ठेवत आणि त्यानंतर सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लुटत होते. या प्रकरणात वापरलेली शस्त्रे आणि चोरीचा मुद्देमाल शोधण्याचे काम अजून सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मेघालयमार्गे
भारतात प्रवेश
हे सर्व आरोपी बांगलादेशातील असल्यामुळे त्यांच्यावर ‘विदेशी कायदा 2025′ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी भारत-बांगलादेश सीमेवरून मेघालयमार्गे भारतात प्रवेश केल्याचे उघड झाले आहे.