उत्तर गोवा पंचायतीसाठी 111 उमेदवार, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी 115 उमेदवार निवडणूक लढवणार; 94 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे
राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींच्या येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, एकूण 226 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर गोवा पंचायतीच्या 25 मतदारसंघांतून 111 उमेदवार आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 मतदारसंघांतून 115 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. जिल्हा पंचायतीच्या बहुतांश मतदारसंघांत तिरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत.
राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीसाठी 320 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 94 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या पाळी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांत थेट लढत होणार आहे. ताळगाव, होंडा आणि केरी या तीन मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या इतर मतदारसंघात चौरंगी आणि बहुरंगी लढती उपेक्षित आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या कवळे मतदारसंघात मगो आणि आरजीपीच्या उमेदवारांत सरळ लढत होणार आहे. रिवण, खोला आणि कुठ्ठाळी या तीन मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या इतर मतदारसंघांत चौरंगी आणि बहुरंगी लढती अपेक्षित आहेत. सांकवाळ मतदारसंघात 8 उमेदवार, पैंगीण आणि धारबांदोडा या दोन मतदारसंघात प्रत्येकी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मद्यविक्रीवर निर्बंध
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या क्षेत्रात 19 आणि 20 डिसेंबरला मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच, मतमोजणीच्या दिवशी 22 रोजी जिल्हा पंचायत मतदारसंघ क्षेत्रात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पणजी महानगरपालिका आणि राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील मद्यालयांना मद्यविक्रीच्या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

