दोन्ही जागांवर भाजपला विजयी करा : शहा

0
10

>> फर्मागुडीतील सभेतून फुंकले आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग; मोदींच्या कार्यकाळात गोव्यात विकासगंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गोव्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे हात पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला गोव्यातील दोन्ही जागांवर बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केले. फर्मागुडी-फोंडा येथे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित भाजपच्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपला थोड्याशा मतांनी पराभव पत्करावा लागला. उत्तर गोव्यात भाजप मजबूत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा मतदारसंघात प्रचार कार्याला प्रारंभ करण्यात आला असून, दक्षिण गोव्यात कमळ फुलविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे, असे अमित शहा म्हणाले.
आता गोव्याला दरवर्षी
3 हजार कोटींचा निधी
गोवा हे लहान राज्य आहे. केंद्र सरकाने गोवा राज्याच्या विकासासाठी सर्वप्रकारचे साहाय्य केले आहे. कॉँग्रेस पक्षाच्या राजवटीत गोव्याला विकास कामासाठी वर्षाला केवळ 432 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जात होता. आता पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात गोव्याच्या विकासासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जात आहे. त्यामुळेच नवीन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवीन झुआरी पूल, दाबोळी विमानतळाचा विकास, आयुष इस्पितळ आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागू शकले, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यावर अधिक भर
देशातील सर्वच भागात भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत अवघ्या मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा मतदारसंघावर भर दिला जात आहे. पक्षाचे कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला विजयी करून मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन शहा यांनी केले.
कर्नाटकात भाजपला बहुमत

देशात आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काहीच परिणाम दिसून येत नाही. देशाच्या ईशान्येकडील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला, तर भाजपने ईशान्येतील तीन राज्यांत चांगले यश संपादन केले आहे. आगामी कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत निश्चितपणे मिळणार आहे, असे विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
भाजपने महत्त्वाचे प्रश्न सोडवले
काँग्रेस पक्षाने कुटुंब, जाती, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टींना प्राधानक्रम दिला होता, तर भाजपने विकासाच्या मुद्याला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. जागतिक पातळीवर आर्थिक बाबतीत भारताने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सीएए, राम मंदिर, काश्मीरमधील 370 कलम यासारखे प्रश्न सोडविले आहेत. देशाच्या विकास आणि सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले आहे, असेही शहा म्हणाले.
कर्नाटक भाजपला स्पष्ट
बहुमत मिळेल : मुख्यमंत्री

कर्नाटक राज्यातील आगामी निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. तसेच, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. राज्यातील विरोधी 7 आमदारांना विकासाचे काहीच देणेघेणे नाही. विरोधी पक्षाचे आमदार केवळ स्वार्थ साधत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
तानावडे यांची सार्दिन यांच्यावर टीका
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन हे मतदारसंघात फिरताना दिसून येत नाहीत. दक्षिणेत विकासकामे होत नाहीत. तसेच खासदार नागरिकांना भेटत नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली.
भाजप विकासासाठी बांधील
केवळ निवडणुकीच्या काळात आप, टीएमसी यासारखे पक्ष लोकांसमोर येतात आणि निवडणूक झाल्यावर गायब होतात. भाजप हा पक्ष विकासासाठी बांधील आहे. डबल इंजिनाच्या सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. भाजपने विकास, सुरक्षा यांना प्राधान्य दिले आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
दक्षिणेतील राजकीय
स्थिती बदलली : नाईक

दक्षिण गोव्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. भाजपच्या विरोधात असलेले दिग्गज नेते आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, माविन गुदिन्हो, भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर, चंद्रकात कवळेकर यांचीही भाषणे झाली.
या सभेला मंत्री विश्वजीत राणे, रोहन खंवटे, नीलेश काब्राल, सुभाष फळदेसाई, नीळकंठ हर्ळणकर, बाबूश मोन्सेरात, आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात, डिलायला लोबो, उल्हास तुयेकर, गणेश गावकर, मनोहर आजगावकर, तसेच मगोपचे नेते आणि वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी देखील उपस्थिती लावली. तसेच, मगोपचे जीत आरोलकर, अपक्ष आन्तोन वाझ, रेजिनाल्ड लॉरेन्स, सभापती रमेश तवडकर यांचीही उपस्थिती होती.

अमित शहांनी म्हादईवर भाष्य टाळले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच्या आपल्या भाषणात म्हादईप्रश्नी भाष्य करण्याचे टाळले. बेळगाव-कर्नाटक येथील भाजपच्या प्रचारसभेत शहा यांनी म्हादईप्रश्नी भाष्य केले होते. त्यामुळे फर्मागुडीतील भाजपच्या प्रचारसभेत गोव्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असलेल्या म्हादईच्या विषयावर शहा भाष्य करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र त्यांनी म्हादई प्रश्नावर बोलणे टाळले.

‘एसटीं’च्या आरक्षणावरून केवळ राजकारण : मुख्यमंत्री
गोव्यातील काही जणांनी अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाच्या विषयावरून राजकारण सुरू केले आहे. केंद्र सरकार गोवा विधानसभेच्या आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुसूचित जमातीला 12 टक्के आरक्षण देण्यावर निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या कार्याची अमित शहांकडून प्रशंसा
अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्याची प्रशंसा केली. डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रिपदी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांनी राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने चर्चेच्या माध्यमातून कित्येक वर्षे प्रलंबित असलेला खाण प्रश्न सोडविला. खाणपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करून लिलावाची पहिला फेरी पूर्ण करत, आता दुसऱ्या फेरीला सुरुवात केली आहे. आगामी वर्षापासून खनिज उद्योगाला प्रारंभ होणार आहे. राज्यातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, गृहनिर्माण, ऑनलाइन सेवा उपलब्ध करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. स्वयंपूर्ण गोवा यासारखा अनोखा उपक्रम राबविण्याचे धाडस दाखविणारे डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, असे गौरवोद्गारही शहा यांनी काढले.