Home Featured दैव बलवत्तर

दैव बलवत्तर

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या एका रात्रीभोजनावेळी एका माथेफिरूने केलेला हल्ल्याचा प्रयत्न धक्कादायक आहे. अमेरिकेसारख्या जगातील सर्वांत प्रबळ महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमामध्ये एखादी व्यक्ती सशस्त्र स्वरूपात एवढ्या सहजतेने पोहोचू शकते हेच मुळात धक्कादायक आहे. आणि विशेष म्हणजे ट्रम्प यांच्यावरील हा काही हल्ल्याचा पहिलाच प्रयत्न नाही. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच्या प्रचारसभेत पेनेसिल्वेनियातील बटलर येथे एका तरुण हल्लेखोराने त्यांच्या दिशेने गोळी झाडली होती, जी त्यांच्या कानाला चाटून गेली होती व रक्ताचे शिंतोडेही त्यांच्या चेहऱ्यावर उडाले होते. परंतु तेव्हा निदान ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले नव्हते, परंतु राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यावरही त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होतो हे धक्कादायक आहे. यापूर्वी वेस्ट पाम बीच गोल्फ कोर्सवर एका झाडीतून त्यांच्या दिशेने रायफल रोखली गेल्याचे सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटांना कळून चुकताच त्यांनी त्या हल्लेखोराचा खात्मा केला होता. सध्याच्या प्रकरणात कोल थॉमस ॲलन हा 31 वर्षांचा हल्लेखोर पकडला गेला आहे. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे तो उच्चशिक्षित आहे. मॅकॅनिकल इंजिनिअर असलेला हा हल्लेखोर शिक्षकही होता. हल्ल्याच्या काही मिनिटांआधी त्याने एक ट्रम्पविरोधी जाहीरनामा आपल्या नातेवाईकांना मोबाईलवरून पाठवला होता आणि त्यामध्ये ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची हिटलिस्ट होती असेही आढळून आले आहे. अर्थात हा हल्लेखोर केवळ त्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवण्यासाठीच तेथे गेला होता असे म्हणता येत नाही. परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे दोघेही ह्या रात्रीभोजनास हजर असताना हा हल्लेखोर वेगाने धावत ज्या ठिकाणी तो कार्यक्रम सुरू होता, त्यापासून काही अंतरापर्यंत पोहोचू शकला. ही अत्यंत गंभीर बाब आहे, कारण अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षाकवच एवढ्या सोपेपणाने एखाद्याकडून काही अंतरापर्यंत तरी भेदले जाणे ही फार अजब घटना आहे. त्यांच्यापाशी हँडगन आणि शॉटगन होती आणि तो त्या हॉटेलात आधीच येऊन राहिला होता असेही उघड झाले आहे. यदाकदाचित त्याच्याजवळ हातबॉम्ब किंवा एके 47 सारखे अत्याधुनिक शस्त्र असते तर? त्याने कितीजणांचा खात्मा केला असता ह्याची कल्पनाही करवत नाही. अडीच हजार लोक त्या भोजनसमयी खालच्या सभागृहात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षांसमवेत उपस्थित होते. ह्यावरून ही सुरक्षेतील किती गंभीर त्रुटी आहे हे ध्यानी येते. जी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाली आहे, ती पाहिली, तर खाली कार्यक्रम सुरू झालेला असल्याने सिक्रेट सर्व्हिसचे एजंट निवांत होते असे दिसते. हल्लेखोर अचानक वेगाने धावत आत घुसताच ते त्यांना असलेल्या प्रशिक्षणानुरूप सतर्क झाले व त्यांनी त्याच्यावर नेम धरला हे खरे, परंतु तोवर हल्लेखोराने एका एजंटवर गोळी झाडली होती व केवळ त्याच्या चिलखतामुळे तो बचावला. आपल्या हल्ल्यामागचा हेतू ह्या हल्लेखोराने स्पष्ट केला आहे. मुलांचे लैंगीक शोषण करणारे, बलात्कारी, गद्दार यांच्या गुन्ह्यांनी मी माझे हात बरबटू देऊ इच्छित नाही असे त्याने म्हटले आहे. सध्याच्या अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर तर हल्ल्याचे गांभीर्य आणखी वाढते. एखाद्या अमेरिकाविरोधी शक्तीने ह्या हल्लेखोराला पाठबळ दिले असते, तर हा हल्ला कितीतरी गंभीर स्वरूप धारण करू शकला असता. त्यामुळे निश्चितपणे ही सुरक्षात्मक त्रुटी आहे. अमेरिकेने अशा प्रकारच्या गोळीबारात यापूर्वीही अब्राहम लिंकनपासून जॉन एफ. केनेडींपर्यंत आपले किमान चार राष्ट्राध्यक्ष हल्लेखोरांच्या गोळीबारात गमावले आहेत, तर ट्रम्प वगळता दोघे जखमांवर निभावले आहेत. ज्या हॉटेलमधील कार्यक्रमावेळी हा हल्ला झाला, त्याच हॉटेलच्या परिसरात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यावर गोळीबार झाला होता. व्हाईट हाऊस पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात शेकडो पत्रकारांच्या साक्षीने झालेला हा हल्ला अमेरिकेच्या बलाढ्यतेच्या आणि कडेकोट सुरक्षेच्या गमजांचा फोलपणा जगाला दाखवून गेला आहे. हा हल्लेखोर एकटाच होता, त्याचे कोणी साथीदार नव्हते, त्याच्यापाशी अधिक घातक शस्त्रास्त्रे नव्हती, म्हणून हा हल्ला विफल ठरला. कोणी सांगावे, त्याच्यासमवेत त्याचे आणखी साथीदार असते, प्रशिक्षित दहशतवादी हल्ल्यात सामील असते तर काय घडले असते कल्पनाही करवत नाही. अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्ध सर्वतोपरी सज्जतेच्या फुशारक्यांतली हवा ह्या हल्ल्याने नक्कीच काढली आहे. जगातील सर्वांत सामर्थ्यवान सुरक्षा यंत्रणा पार कुचकामी ठरली. केवळ दैव बलवत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे ह्या हल्ल्यातून वाचले आहेत.