>> सहा राज्यांत रुग्णसंख्येत वाढ
>> महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता
देशातील बर्याच राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. देशात गेल्या ६ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १४,२६४ नवीन रुग्ण आढळले असून ९० जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांत केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने या राज्यांना आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासह आरोग्य मंत्रालयाने सर्व निगेटिव्ह रॅपिड टेस्ट रिपोर्ट आलेल्यांची आरटी-पीसीआर टेस्ट घेण्याचे निर्देश दिले आहेत. देश पातळीवर कोरोनातून बरे होण्याचा दर ९७.२५ टक्के असून मृत्यूदर १.४२ टक्के आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या १.०९ कोटी
देशात आतापर्यंत करोना व्हायरसचे एकूण १ कोटी ९ लाख ९१ हजार ६५१ रुग्ण असून त्यातील १ कोटी ६ लाख ८९ हजार ७१५ जण बरे झाले आहेत. आतापर्यंत भारतात करोनाने एकूण १ लाख ५६ हजार ३०२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संखअया वाढत असून याविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, जनतेला १० दिवसांची मुदत दिली आहे. राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली असून जर राज्यात लॉकडाउन नको असेल, तर लोकांनी मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या महत्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील, असे आवाहन केले. तसेच या नियमांचे पालन न केल्यास राज्यात पुन्हा लॉकडाउन घोषित करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यक्रमांवर बंदी
येत्या काही दिवस गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची अत्यंत गरज असून कोरोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी उद्यापासून काही दिवसांसाठी राज्यात गर्दी जमवणार्या सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येत आहे अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
पुण्यात रात्रीची संचारबंदी
पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात कोरोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात रात्री ११ वाजेनंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.