देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

0
8

>> चाचणीअंती स्पष्ट; तीन दिवसांपूर्वीच युएईतून केरळमध्ये

केरळमध्ये गुरुवारी मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचे देखील समोर आले आहे. या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात दाखल झाली होती. या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात. हा रोग १९५८ मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो.