देशातील पहिल्या हरित शाळेचे आज होणार उद््‌घाटन

0
12

300 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या व डिचोली तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलापूर-कारापूर, साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांची प्रतीक्षा आता संपली असून, देशातील पहिल्याच हरित शाळेचे उद्घाटन शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच दत्तप्रसाद खारकांडे व इतरांची उपस्थिती लाभणार आहे. या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जेवढे आतुर झाले आहेत, तेवढीच आतुरता शिक्षकांनाही लागली आहे. या शाळेचे नामकरण श्री विठ्ठल-रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा असे केले आहे.

सरकारी प्राथमिक शाळांतील कमी होणाऱ्या विद्यार्थी संख्येमागे शाळेच्या जीर्ण व जर्जर इमारती हे प्रमुख कारण होते. हा मुद्दा लक्षात घेऊन 2012 साली राज्यात स्थापन झालेल्या भाजप सरकारने गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळामार्फत राज्यातील सर्व शाळांची दुरुस्ती हाती घेतली होती. तसेच शिक्षण क्षेत्रातही बरेच बदल घडवून आणत दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचाच एक भाग म्हणून ज्या सरकारी शाळांमध्ये जास्त विद्यार्थीसंख्या आहेत, अशा जीर्ण शाळा इमारतींच्या ठिकाणी प्रशस्त व शिक्षणासाठी आजच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले वातावरण निर्माण करणाऱ्या इमारती उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

2017 साली भाजप सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर या शाळेच्या कामाला गती देण्यात आली. तत्पूर्वी ही शाळा इमारत प्रशस्त व्हावी यासाठी माजी सभापती स्व. अनंत शेट यांनीही सरकार दरबारी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. मध्यंतरी कोविड महामारीमुळे या इमारतीचे काम रखडले होते. त्यानंतर हळू हळूकरत या इमारतीचे काम आता पूर्ण झाले आहे.

शाळा इमारतीची वैशिष्ट्ये
एकदा पाहिल्यावर नजर खिळवून ठेवणाऱ्या या शाळा इमारतीत एकूण 16 वर्ग आहेत.
तळमजल्यावर एक प्रशस्त सभागृह असून, त्यात एकाचवेळी 600 ते 700 लोक समावू शकतात.
सभागृहाच्या बाजूला एक संगीत कक्ष आणि एक नृत्य कक्ष असे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
तिसऱ्या मजल्यावर प्रशस्त खुला सभागृह त्याला लागूनच मुलांना आपले कार्यक्रम सादर करण्यासाठी खुल्या ऑडिटोरियमची सोय आहे.

प्रवेशद्वाराच्या गोलाकार भागात वरच्या मजल्यावर योग प्रशिक्षण केंद्र तयार केला असून, त्याला तारांगणचे स्वरूप देण्यात आले आहे.
या शाळा इमारतीत सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घेतली आहे.
शाळेतील वर्गांमध्ये समूह शिक्षणाची संकल्पना राबविण्यात आली आहे.
वरच्या मजल्यांवर 40 चौरस मीटरचे वर्ग, त्यात अद्ययावत बाकडे व फळे, एक लहान मुलांसाठी खेळ कक्ष आहे.