देशाच्या प्रगतीसाठी सीमेवर शांतता गरजेची : उपराष्ट्रपती

0
3

मुरगाव बंदरात विविध प्रकल्पांचे उद्घाटन

गोव्याचे सौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना खुणावत आहे. त्यामुळे गोव्याचे पर्यावरण जपण्यासाठी सौर ऊर्जेसह इको फ्रेंडली प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने प्रकल्पांची उभारणी केली असून त्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करताना मला अत्यंत आनंद होत असल्याचे उद्गार उपराष्ट्रपती धनखड यांनी काढले.

2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनणे हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी दरडोई उत्पन्नात आठपट वाढ होणे आवश्यक आहे. युद्धजन्य परिस्थिती असेल, तर आर्थिक विकास होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या सीमांवर शांतता असणेही गरजेचे आहे. शांतता ही प्रगती आणि विकासाची मूलभूत गरज आहे. सुरक्षेतील सामर्थ्य, अर्थव्यवस्थेतील सामर्थ्य, विकासातील सामर्थ्य आणि राष्ट्रवादाप्रती वचनबद्धता महत्वाची असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले.
मुरगाव बंदरात काल 3 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, दोन हार्बर मोबाईल क्रेनची व्यावसायिक कार्यवाही आणि कोळसा हाताळणीसाठी बंदिस्त डोम यांचे उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी राष्ट्रासाठी महासागरांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी व्यासपीठावर उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, सचिव टी. के. रामचंद्रन, एमपीएचे चेअरमन एन. विनोद कुमार, आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते.

आज जागतिक आर्थिक शक्ती आणि सागरी शक्ती म्हणून उदयास येणारा आपला भारत हा शांतता, शाश्वतता आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. आपण याआधीच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. आपले महासागर आता आपल्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, सुरक्षिततेसाठी, आपल्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
यावेळी जगदीप धनखड यांनी ऑपरेशन सिंदूरची देखील प्रशंसा केली. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या तळांवर अचूक लक्ष्यभेद केला, त्यातून भारताने जगाला एक ठोस संदेश दिला. दहशतवादाला आता शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, हाच तो संदेश होता, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे, शत्रूच्या भूक्षेत्रात दूरपर्यंत हल्ला केला. या कारवाईतही केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याच्या आपल्या नीतीमूल्यांचे आपण पालन केले. आज भारताच्या कारवाईचा कोणीही पुरावा मागत नाही आहे, कारण ज्या दहशतवाद्यांना आपण लक्ष्य केले होते, त्यांनी आणि त्यांच्या देशाच्या लष्करी दलाने, त्या देशाच्या राजकीय वर्गाने मृत दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन संपूर्ण जागतिक समुदायाला स्वतःहून पुरावा दिला, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.