गुरुवारी पणजीत निदर्शने
केंद्रातील मोदी सरकारने देशातील मोठमोठे उद्योगपती व बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या फायद्यासाठी कामगार व लोकविरोधी धोरणे तयार करण्याचे जे सत्र आरंभिले आहे त्याच्या विरोधात राष्ट्रीय कामगार संघटनांनी येत्या २६ रोजी देशभरात जो सत्याग्रह पुकारला आहे, त्यात राज्यातील सर्व आयटक सदस्य सहभागी होणार असल्याचे आयटकचे महासचिव ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार सत्तेवर असताना त्यांनी कामगारविरोधी धोरणे तयार केली होती. तीच धोरणे आता मोदी सरकार पुढे नेत असल्याचा आरोप यावेळी फोन्सेका यांनी केला. गेल्या ९ महिन्यांच्या काळात मोदी सरकारे मोठमोठे उद्योगपती व बहुराष्ट्रीय कंपन्या यांना जादा अधिकार मिळावेत यासाठी कित्येक नवे कायदे केलेले असून त्यासंबंधीचे अध्यादेशही जारी केले आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाहीचाही अवमान झाला असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या या कृतीचा सामान्य जनतेला मोठा फटका बसणार असल्याचे फोन्सेका यांनी सांगितले.
कामगारांनी कित्येक वर्षे लढा देऊन जे कायदे करण्यास सरकारला भाग पाडले होते त्या सर्व कायद्याना आता कचर्याची टोपली दाखवण्यात येत आहे. सरकारने उद्योग कायदा, लघु उद्योग कायदा दुरुस्ती आणली आहे. तसेच भूसंपादन कायद्यातही दुरुस्ती आणली असून औद्योगिक कामगार व शेतकरी वर्गाचे यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे फोन्सेका म्हणाले. कृषी जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकार करीत असलेल्या कामगार कायद्यातील दुरुस्त्यांमुळे संघटीत कामगारही असंघटीत होण्याचा तसेच कंत्राटी कामगार पध्दतीला चालना मिळून देशभरातील कामगार गुलाम बनण्याचा धोका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर समाज कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला असून २६ रोजी शेकडो कार्यकर्ते कदंब बसस्थानकाजवळील क्रांती मैदानावर जमतील. नंतर तेथून आझाद मैदानावर मोर्चा आणण्यात येईल व तेथे जाहीर सभा होईल, अशी माहिती फोन्सेका यांनी दिली.

