केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांच्याविरोधात विविध कामगार संघटनांनी आयोजित देशव्यापी संपाला गोव्यातूनही पाठिंबा लाभला. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या झेंड्याखाली राज्यातील कामगारांच्या विविध संघटनांनी देशव्यापी संपात सहभागी होत येथील आझाद मैदानावर निदर्शने करून कामगारविरोधी कायदे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी कामगारांच्या हिताचे रक्षण, समान वेतन लागू करण्याची मागणी करण्यात आली. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ॲड. राजू मंगेशकर, प्रसन्न उटगी, गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर व इतरांची उपस्थिती होती.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने मागील दहा वर्षांत अनेक कामगारविरोधी नवे कायदे लागू करून कामगारांची सतावणूक केली जात आहे, असा आरोप ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतरांची भाषणे झाली. कामगारविरोधी कायदे रद्द करा, अकुशल कामगारांना किमान वेतन 24 हजार रुपये द्यावे, खासगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा व नियमित सेवा देण्याची हमी द्यावी, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशा मागणी सभेत करण्यात आली.
देशव्यापी संपानिमित्त येथील कदंब बसस्थानक ते आझाद मैदान दरम्यान कामगारांनी रॅली काढण्यात आली. त्यात अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना, बँक कर्मचारी असोसिएशन, विविध कामगार संघटना, हॉटेल असोसिएशन कर्मचारी व इतरांनी संपात सहभाग घेतला.