देशभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक

0
12

>> नव्या २७ हजार कोरोना रुग्णांची नोंद; २८४ मृत्यू

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आठवडाभरापूर्वी दैनंदिन अवघे ५ हजार रुग्ण सापडत होते, तो आकडा आता २५ हजारांच्या पार गेला आहे. देशात फक्त कोरोना रुग्णच नाही, तर ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत नवे २७ हजार ५५३ कोरोना रुग्ण आढळले असून, २८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर देशभरातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या १५२५ वर पोहोचली आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णसंख्येत २१ टक्के इतकी वाढ झाली आहे, तर सध्याचा संक्रमण दर २.५५ टक्के एवढा आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल २७ हजार ५५३ नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून, जवळपास गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ८०१ इतकी झाली आहे. २४ तासांत आणखी २८४ रुग्ण दगावले असून, मृतांचा एकूण आकडा आता ४ लाख ८१ हजार ७७० इतका झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३,४८,८९,१३२ एवढी आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता दीड हजारच्या पुढे गेली आहे. देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत १ हजार ५२५ रुग्ण आढळले आहेत, त्यातील ५६० जण उपचारांनंतर बरे झाले असून, अन्य रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ओमिक्रॉनचे सर्वाधिक ४६० रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील १६० रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यानंतर दिल्लीत ३५१ ओमिक्रॉन बाधित आढळले असून, त्यातील ५७ रुग्ण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये १३६, तामिळनाडूत ११७, तर केरळमध्ये ओमिक्रॉनचे १०९ रुग्ण आहेत. आतापर्यंत २३ राज्यांत ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक २१ रुग्ण गुजरातमध्ये आढळले आहेत.

दोन लाटा झेलल्यानंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल याची शक्यता बळावत चालली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने सर्वांचीच झोप उडवली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. सध्याची स्थिती पाहता मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा प्रमुख महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे.