देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा

0
13

अनेक राज्यांतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

अमेरिका-इस्रायल, इराण युद्धाच्या भारताला झळा

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम भारतासह देशातील अनेक राज्यांवर होताना दिसून येत आहे. या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दृश्य दिसून येत आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर बंदी घातल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवता येत नसल्याची स्थिती आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबल्याने सर्वात जास्त संकट हॉटेल-रेस्टॉरंटवर आहे. तर, घरगुती स्वयंपाकाचा गॅस घेण्यासाठी गॅस एजन्सींच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबईत 20 टक्के हॉटेल्स बंद
गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे. मुंबईतील सद्यस्थितीत दहा ते वीस टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार (असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट) संघटनेकडून देण्यात आली आहे. पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल बंद करण्याची वेळ आहार संघटनेवर येईल, असे संघटनेच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस
संरक्षणात सिलेंडर वाटप

उत्तर प्रदेशमध्ये बुकिंग केल्याच्या 4 ते 5 दिवसांनंतरही सिलेंडर मिळत नसल्याचे वृत्त असून गॅस एजन्सींच्या बाहेर रांगा लागू लागल्या आहेत. गोरखपूर-सिद्धार्थनगरमध्ये पोलीस संरक्षणात सिलेंडर दिले जात आहेत. गॅस एजन्सींवर पहाटे 3 वाजल्यापासूनच लोक रांगा लावण्यासाठी पोहोचत आहेत. तासनतास वाट पाहत आहेत, पण सिलेंडर कमी आहेत आणि घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे सिलेंडर मिळत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे.

बिहारमध्ये पहाटेपासून रांगा
बिहार राज्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दुकानात गेल्या 2 दिवसांपासून बुकिंग बंद करण्यात आले आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटवर परिणाम झाला आहे. घरगुती गॅससाठीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोक सकाळपासूनच गॅस एजन्सीमध्ये पोहोचू लागले मात्र अनेक एजन्सींना कुलूप लावलेले दिसून येत आहे. तसेच येथे कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले.

राजस्थानात सुरू झाला
सिलेंडरचा काळाबाजार

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या एजन्सी ठरलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत सिलेंडरची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. जयपूरमध्ये 1911 रुपयांना मिळणारा सिलिंडर 2500 रुपयांपर्यंत विकला जात आहे. अनेक गॅस एजन्सींवर नागरिकांनी काळाबाजार होत असल्याचा आरोप केला आहे.

पंजाबात घरगुती गॅस
सिलेंडरचे बुकिंग बंद

पंजाब राज्यातील लुधियाना आणि फरीदकोटमध्ये सर्व्हर डाउन झाल्यामुळे घरगुती सिलेंडरची बुकिंगही करता येत नाही. याशिवाय, फरीदकोट, होशियारपूर आणि पटियालासह अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद आहे.

लघुउद्योग कंपन्यांना झळ
आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघुउद्योग कंपन्यांना बसणार आहे. युद्धामुळं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यातील व्यत्यय आणि एलपीजी पुरवठ्यातील निर्बंध लक्षात घेता, मंत्रालयाने तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे आणि त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजीसाठी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
सरकारची पावले
सध्या देशभरात सुरू असलेल्या गॅस संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने तीन तेल कंपन्यांच्या कार्यकारी संचालकांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी पुरवठ्याचा आढावा घेईल. गॅसचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955′ लागू केला आहे. घरगुती सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ग्राहकाला एक सिलेंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलेंडर 25 दिवसांनंतरच बुक करता येईल असे म्हटले आहे. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी प्रयत्न कठोर प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने सर्व ऑइल रिफायनरीजना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले होते. सूत्रांनुसार, आता उत्पादन 10% नी वाढले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद
भारतासाठी सर्वात मोठे आव्हान होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणे हे आहे. हा सुमारे 167 किमी लांबीचा जलमार्ग आहे, जो पर्शियन आखातला अरबी समुद्राशी जोडतो. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही. जगातील एकूण पेट्रोलियमपैकी 20% भाग येथूनच जातो. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देश देखील आपल्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत. भारत आपल्या गरजेपैकी 50% कच्चे तेल आणि 54% एलएनजी याच मार्गाने आयात करतो. इराण स्वतः याच मार्गाने निर्यात करतो. मात्र हा मार्ग सध्या जवळजवळ बंद झाल्यामुळे बारतासह जगातील अनेक देशांवर इंधनाचे संकट उभे ठाकले आहे.

ड्रोन हल्ल्यामुळे उत्पादन थांबले
गेल्या आठवड्यात अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार, कुवेत, युएई आणि सौदीसारख्या देशांमधील अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताला गॅस पुरवठा करणारा सर्वात मोठा देश कतारने आपल्या एलएनजी प्लांटचे उत्पादन थांबवले आहे. यामुळे भारतात गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या 40% (सुमारे 2.7 कोटी टन वार्षिक) एलएनजी कतारमधूनच आयात करतो.

परिस्थिती कधीपर्यंत सुधारेल?
इंडियन ऑइलचे मुख्य महाव्यवस्थापक (एलपीजी) के. एम. ठाकूर यांनी, ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही आणि पॅनिक बुकिंग करू नये. सरकार आता अमेरिकेसारख्या देशांकडून पर्यायी कार्गो मागवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर जी 7 देश त्यांच्या आपत्कालीन तेल साठ्यातून पुरवठा सुरू करण्यावर चर्चा करत आहेत, जेणेकरून जागतिक बाजारातील ऊर्जा संकट कमी करता येईल. रशिया आणि अल्जेरियाकडूनही अतिरिक्त कच्च्या तेलाची आवक होण्याची अपेक्षा आहे.

तेल कंपन्या करणार रेस्टॉरंट असोसिएशनशी वाटाघाटी
सरकारने रेस्टॉरंट असोसिएशनच्या तक्रारी ऐकण्यासाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती असोसिएशनच्या व्यावसायिक गॅस पुरवठ्याशी संबंधित वाजवी गरजा पूर्ण करेल. गरजेनुसार पुरवठ्याची प्राथमिकता देखील पुन्हा निश्चित करेल.