30 C
Panjim
Saturday, April 17, 2021

देशद्रोही ट्वीट

गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या ट्वीटर हँडलवरून मराठ्यांचा – म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा उल्लेख ‘आक्रमणकर्ते’ असा झाल्याने गोव्यात वादळ उठले. निदान गोमंतकाचा स्वाभिमान जागा आहे हे ह्यानिमित्ताने दिसले. पर्यटन खात्याचे प्रस्तुत ट्वीट ही नुसती चूक नव्हे, जाणता – अजाणता घडलेले हे देशद्रोही कृत्य आहे. छत्रपती शिवरायांसारख्या युगपुरुषाचा यातून झालेला घोर अवमान स्वाभिमानी गोमंतकाच्या जिव्हारी लागला आहे. ज्याने स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृतीचा अभिमान अवघ्या देशाला शिकवला अशा छत्रपती शिवरायांच्या सैन्याला ‘आक्रमणकर्ते’ ठरवणार्‍याच्या बुद्धीची कींव करावी तेवढी थोडीच आहे!
साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीची पडछाया गोव्यातील काही पोर्तुगीजधार्जिण्यांच्या आणि त्यांच्या वारसदारांच्या मानसिकतेवर आजही पडलेली आहे. गोवा मुक्तीला साठ वर्षे उलटली तरीही अधूनमधून संधी मिळाली की त्यांचे पोर्तुगालप्रेम डोके वर काढत असते. गोवा मुक्त करणार्‍या भारतीय सैन्याच्या कारवाईलाही ‘आक्रमण’ संबोधणारे आणि मुक्तीनंतरही येथे बॉम्बस्फोटमालिका घडवून आपले अस्तित्व दाखवून देणारे येथे होते. त्यांची पिलावळ आजही आहे. पोर्तुगिजांच्या उरल्यासुरल्या खाणाखुणा ती जिवापाड जपत असते. कधी वास्को द गामाच्या स्वारीचे स्मरणसोहळे साजरे करू पाहते, ‘सांग्रीश’ जहाज गोव्यात येत असल्याचा आनंदोत्सव साजरा करते, मळ्यातील रस्त्यांना पोर्तुगाली पाट्या लावण्यात धन्यता मानते, निर्लज्जपणे वाहनांवर पोर्तुगालचे स्टीकर मिरवते, पोर्तुगालच्या संघाला फुटबॉलमध्ये विजय मिळाला तरी आपणच जिंकल्यागत ‘विवा पोर्तुगाल’ करत मिरवणुका काढते, युरोपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पोर्तुगाली पासपोर्टसाठी दूतावासाबाहेर तळमळते. गोव्याचा इतिहास म्हणजे केवळ पोर्तुगिजांचा साडेचारशे वर्षांचा इतिहास मानणारे आणि त्यातच रमणारे शासनमान्य ‘इतिहासकार’ही येथे निपजले आहेत.
मराठी सैन्याला ‘आक्रमणकर्ते’ संबोधणारा पर्यटन खात्यातील हा जो कोणी महाभाग आहे, त्याचे इंग्रजी कच्चे आहे, इतिहासाचे ज्ञान अपुरे आहे की वर उल्लेखलेल्या पोर्तुगीजधार्जिण्यांचा तो वारसदार आहे हे एवढी नाचक्की झाल्यानंतर तरी सरकारने जरूर शोधावे. ह्या ट्वीटचा स्त्रोत काय? हा विषय केवळ त्या ट्वीटपुरता मर्यादित नाही. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरील आग्वाद किल्ल्यावरची नोंद पाहिली तरी त्यामध्ये पोर्तुगिज वारशाप्रतीचे प्रेम आणि कौतुक कसे उफाळून आलेले दिसते. ज्यांना पोर्तुगीज एवढे जवळचे वाटतात, त्यांना मराठे ‘आक्रमणकर्ते’ वाटणारच!
मुळात आग्वाद किल्ला बांधला गेला तो डचांच्या आक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी. खरे म्हणजे तो बांधला गेला तेव्हा शिवाजी महाराजांचा जन्मही झालेला नव्हता. महाराज जन्मले १६३० साली आणि आग्वाद बांधून पूर्ण झाला १६१२ साली. मोझांबिकहून आलेल्या सात डच गलबतांनी सतराव्या शतकाच्या प्रारंभी मांडवीच्या मुखावर नाकेबंदी केली. वास्तविक त्यापूर्वी पोर्तुगिजांनी काबो, रेईशमागूश आणि गास्पर दिएशचे किल्ले बांधलेले होते, परंतु ते त्यावेळी कुचकामी ठरले. त्यामुळे मांडवी जेथे समुद्राला समर्पित होते तेथे समुद्रमुखाशी किल्ला बांधण्याची जरूरी पोर्तुगिजांना भासली आणि १६०५ मध्ये ज्युलियांव सिमांव द्वारा हा किल्ला बांधण्यास सुरूवात झाली. १६०६ मध्ये डचांनी पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या किल्ल्याच्या उभारणीमुळे तो फसला. आग्वादची उभारणी डच आणि इंग्रजांच्या संभाव्य आक्रमणाचा प्रतिबंध करण्यासाठी झाली होती. मराठा साम्राज्य उभे राहिले ते पुढील काळात.
शिवाजी महाराजांनी गोवा मुक्तीची आस जरूर बाळगली. पोर्तुगिजांनी त्यांच्याशी मिळते घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तह केले, परंतु महाराजांना पोर्तुगीज ही काय चीज आहे त्याची पुरेपूर कल्पना होती. त्यामुळेच तर त्यांनी आरमार उभारले, जलदुर्ग बांधले. बार्देशात धडक दिली, पोर्तुगिजांच्या राजधानीला ललकारत सप्टकोटीश्वराचा जीर्णोद्धार केला, आदिलशाहीतला मर्दनगड काबीज करताना पोर्तुगिजांनाही जरब बसवली. पोर्तुगिजांना शिवरायांचा धाक किती होता हे सांगण्यास येथील व्हाईसरॉयनी पोर्तुगालला पाठवलेली पत्रे पुरेशी आहेत. परंतु शिवाजी महाराजांचे गोमंतकावरील ऋण अमान्य करणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गोव्यात अनेक आहेत हे दुर्दैव.
ह्या ट्वीटसंबंधी राजकारण करण्यासाठी विरोधक पुढे झाले, परंतु कॉंग्रेसची यापूर्वीची शासनेही चुकीचा इतिहास शिकवत आली होती हे जनता विसरलेली नाही. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. हा गोमंतकाच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा, अस्मितेचा विषय आहे. ह्या अशा गोष्टी चुकून होतात की जाणूनबुजून गोव्याचा हा विपर्यस्त ‘वारसा’ पुन्हा पुन्हा जगापुढे प्रस्तुत केला जात असतो हाच यातील सर्वांत महत्त्वाचा सवाल आहे.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

साखळीचे लांच्छन!

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांना अखेर त्या पदावरून काल पायउतार व्हावे लागले. त्यांच्याविरुद्ध माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गटाने दाखल केलेला अविश्वास ठराव...

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध ः मुख्यमंत्री

>> मडगावचे ईएसआय इस्पितळ आजपासून पुन्हा सुरू >> शुक्रवारी कोरोनाने ९२७ बाधित, सहाजणांचा मृत्यू राज्यातील कोरोना...

एक-दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध ः तानावडे

राज्यात वाढू लागलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत आवश्यक ते कडक निर्बंध घालण्यात येतील अशी माहिती काल भाजप प्रदेशाध्यक्ष...

साखळी नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव संमत

>> पालिकेत सगलानी गटाचा विजय >> भाजपचे सहाही नगरसेवक गैरहजर साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात...

न्यायालयाने लोकशाही वाचवली : कामत

साखळी पालिकेत नगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा जो दारुण पराभव शुक्रवारी झाला त्यावरून राज्यात भाजप सरकारचा शेवट जवळ आला असल्याचे संकेत...