देव भेटला

0
12
  • भाग्यश्री गोविंद रायकर
    सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,
    साखळी- गोवा.

कातरवेळची भयाण, गूढ शांतता… आज तुळशीपुढे दिवाही लागला नव्हता. रोज ओसरीवर बसून पेट्रोमॅक्सचा दिवा घेऊन येणाऱ्या बाबांची वाट पाहणारी चारही कोवळी मुलं नियतीच्या आघातानं बिथरली होती. जीवनाच्या भयाण सत्याला ती सामोरी जात होती. आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांना कळून चुकलं होतं की आता परत काही पेट्रोमॅक्सचा दिवा घेऊन येणारे बाबा दिसणार नाहीत…
अंत्यसंस्कार आटोपून सगळे पाहुणे आपापल्या वाटेने पांगले होते. भेदरलेली ती मुले आईला बिलगून बसली होती. चार वर्षांच्या पोरीला तर आई, दादा, भाई आणि ताई का रडताहेत हेही कळत नव्हते. ती आईला सारखे विचारत होती, ‘आई, बाबा कुठे आहेत?’ पतीच्या आकस्मिक निधनाने हादरून गेलेली बिचारी आई काय म्हणून उत्तर देईल आणि कसं?
सूर्यास्तापूर्वी सगळी कामं आवरून लवकर झोपी जायचा तो काळ. घरात विजेचा दिवा नाही की मिणमिणती चिमणीही नाही. आज तर या लेकरांना बापाचा आधारही नव्हता आणि घरात पेट्रोमॅक्स दिवाही मिणमिणत नव्हता. त्याला वारा देण्याचीही कोणाला सुद्धी नव्हती. सगळ्यांच्या मनात केवळ होती ती भीती आणि अशा परिस्थितीत आधाराची आस. मध्येच आठ-नऊ वर्षांच्या ताईने रडत-रडत प्रश्न केला, ‘आई, देवानं आमच्याबरोबर असं का केलं गं? कुणीच नाही आमच्याबरोबर. मला खूप भीती वाटतेय गं.’ असं म्हणत तिने आईला कवटाळलं. दादा आणि भाई त्यांना धीर देत होते; पण त्या जेमतेम 10-12 वर्षांच्या पोरांना आपुलकीने धीर देणारं कुणीच नव्हतं. आई म्हणाली, ‘देव आपल्याला एकटं नाही सोडायचा. त्याच्यावर विश्वास ठेवा.’ हे सांगत असताना आईचे डोळे डबडबले. तिने आपल्या भावाला अंत्यसंस्कार झाल्यावर तेथून निघताना विचारले होते, ‘दादा, राहशील का रे आजची रात्र इथे? मुलांना जरा बरं वाटेल.’ ‘असं राहतात का कधी, आज राहिलो तर पुढचे 11 दिवस इथेच राहावे लागेल. मला काही राहता येणार नाही.’ किती सहज म्हणून गेला होता तो हे शब्द.
रात्रीचे नऊ वाजले असतील. त्या गूढ काळोखात, नीरव शांततेत एकमेकांना धीर देत ती बसली होती. एवढ्यात दारावर टक्‌‍टक्‌‍ असा आवाज झाला. सगळी एकदम दचकली. भीतीने त्यांची काळीजं धडधडू लागली. आईने धीर करून ‘कोण?’ असा प्रश्न विचारताच ‘बायऽऽ’ अशी हाक ऐकू आली. आवाज ओळखीचा होता. ‘मी तुकाराम गं’ असा आवाज आला. बाबांचे मित्र तुकाराम काका असावेत म्हणून त्यांनी दार उघडले तर तुकाराम काका एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात पेजेची किटली व त्यावर एक वाटी धरून उभे होते. तिथे ओसरीवर ते बसले. पोरांना पेज वाढून जेवायला लावले. काही वेळ ते त्यांच्याशी बोलले, त्यांना आधार दिला. थोड्या वेळाने आई म्हणाली, ‘बरीच रात्र झालीय भाऊजी, तुम्ही घरी जा. आता आमची काळजी करू नका. तुम्ही एवढ्या आपुलकीने आलात, खूप मदत झाली.’ आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ‘बाय, अशी काय करतेस, आभार कसले मानतेस. आणि इतक्या रात्री तुम्हा सगळ्यांना असं एकटं सोडून गेलो तर माझा मित्र मला काय म्हणेल?’ तुकाराम काकांच्या डोळ्यांतून आसवे टपकत होती. त्यांचा कंठ दाटला होता. ‘ते काही नाही, तुम्ही चला आत आणि झोपा आता. मी इथे ओसरीवर झोपेन’ असे म्हणत काकांनी पोरांना कवटाळले.
सगळी मुले एकमेकांना कवटाळून झोपली होती. अधेमधे काकांच्या खोकण्याचा आवाज येत होता. दुःखाने क्षीण झालेल्या मनाला त्यांच्या सोबत असण्याचा दिलासा मिळत होता. ताईला तिने आईला विचारलेला प्रश्न आठवला आणि ती हळूच आईला म्हणाली, ‘आई, तू म्हणत होतीस ते खरं होतं. देव आपल्याला एकटं नाही सोडायचा. तुकाराम काकांच्या रूपात आज आम्हाला देवच भेटला की गं!’ ‘हो गं बाळा, खरंच देवासारखे पावले ते आज’ असे म्हणत आईने तिला घट्ट मिठी मारली. ताईच्या डोळ्यांपुढे केवळ तुकाराम काकांचा तो कंदिलाच्या मंद उजेडात दिसणारा चेहरा भरून राहिला होता. अंधश्रद्धा, रूढी, परंपरांच्या नावाखाली माणुसकी विसरलेले तेथून कधीच सटकले होते. तेथे थांबला होता तो माणसांतला ‘माणूस’! होय, देवच होता तो त्यांच्यासाठी, देवच होता तो!!