देवभाषेचे नंदनवन

0
5
  • मीना समुद्र

दि. 6 जुलै 2024- आषाढस्य प्रथम दिवस. कालिदास दिन. साहित्याची आणि माणसाची मनोभूमी अंकुरण्यासाठी बीजारोपणाचा जणू हा दिवस! कालिदासासारखी प्रतिभा, कल्पना, चातुर्य, आचार-विचार, सत्य-शिव-सुंदराची कास आणि भलेपणाची आस, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा-भक्ती, संयम, विनम्रता यांचा ध्यास घेण्याचा हा दिवस.

पुरा कवीनाम्‌‍ गणनाप्रसंगे कनिष्ठिकाघिष्ठित कालिदासः।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात्‌‍ अनामिका सार्थवती बभूव॥
(पूर्वी) एकदा कवींची गणना करताना कालिदासाच्या नावाने कनिष्ठिकेची करांगुली मोडल्यानंतर त्याच्या तोडीचे दुसऱ्या कवीचे नाव सापडेना म्हणून ‘अनामिका’ हे त्या बोटाचे नाव सार्थ ठरले. (हे बोट म्हणजे कनिष्ठिकेजवळचे- अंगठी घातली जाते ते बोट!)
खरोखरच, कालिदास हा भारतातील अत्यंत श्रेष्ठ असा महाकवी होऊन गेला. त्याचा काळ निश्चित नसला तरी ख्रिस्त शकापूर्वी 57 व्या वर्षी विक्रमसंवत्‌‍ सुरू करणारा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्याच्या दरबारी तो होता अशी सर्वसाधारणपणे लोकधारणा आहे. काहीजण गुप्तवंशातील दुसऱ्या चंद्रगुप्ताला ‘विक्रमादित्य’ ही पदवी असल्याने त्याच्या पदरी कालिदास होता असे मानतात. म्हणजेच एकूण दीड-दोन हजार वर्षांपूर्वी तो होऊन गेला असा सर्वांचा अंदाज धरला तर कालिदासाचे काव्य आणि त्याच्या एकूण साहित्यविश्वाचा प्रभाव आजही तितकाच टिकून आहे आणि तो ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ असाच राहणार आहे.
महान विभूतींच्या बाबतीत अनेक दंतकथा प्रचलित असतात आणि त्यावरून त्यांचे महत्त्व ठसविले जाते. कालिदासाच्या बाबतीतही हेच झाले. गोपाळांबरोबर रानावनात भटकणारा तो एक अडाणी माणूस होता; इतका की ज्या फांदीवर तो बसला तीच कुऱ्हाडीने तोडू लागला! राजाबद्दल मनात काही कारणाने राग आणि सूडबुद्धी असलेल्या प्रधानाने सुंदर, सुविद्य राजकन्येसाठी हाच अडाणी माणूस निवडला आणि त्यांच्या विवाहानंतर राजकन्येने त्याला ‘अस्ति कश्चित्‌‍ वाग्विशेषः?’ असा प्रश्न करून त्याला अपमानीत करून हाकलून दिले. तेव्हा कालिदासाने कालिमातेच्या उपासनेने आणि वरप्रसादाने सर्वविद्यापारंगत होऊन ‘अस्ति’ शब्दापासून सुरू होणारे ‘रघुवंश’ हे महाकाव्य लिहिले. ‘कश्चित्‌‍’ शब्दापासून आरंभ केलेले ‘मेघदूत’ हे खंडकाव्य लिहिले आणि ‘वाक्‌‍’पासून सुरू होणारे ‘कुमारसंभव’ हे महाकाव्य लिहिले. याशिवाय ‘अभिज्ञान शाकुन्तलम्‌‍’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘मालविकाग्निमित्र’ आणि ‘ऋतुसंहार’ ही नाटके लिहिली. त्याच्या या सात साहित्यकृतींतून त्याने कल्पनेचे सप्तस्वर्ग उभारले, भावभावनांचे सप्तरंगी इंद्रधनू साकारले आणि सप्तसूर लयतालात अवतरले. त्याचे ‘अभिज्ञान शातुन्तलम्‌‍’ डोक्यावर घेऊन ‘गटे’सारखा परकीय विद्वान नाचला. आणि त्याच्या ‘मेघदूता’सारख्या छोटेखानी काव्याने तर दिग्गज विद्वान पंडितांपासून तो सर्वसामान्य रसिकवाचकांपर्यंत सर्वांनाच मोहिनी घातली; नव्हे, अक्षरशः वेडे केले. महाकवी रवींद्रनाथ टागोरांचे ते अत्यंत आवडते काव्य आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, शांता शेळके आदी अनेकांनी त्याची भाषांतरे केली आहेत. श्री योगी अरविंद यांनी म्हटले आहे की, ‘वाल्मीकी, व्यास आणि कालिदासाव्यतिरिक्त भारतातले सारे वाङ्मय नष्ट झाले तरी भारतीय संस्कृतीची हानी होणार नाही.’ हिमालय, गंगा, काश्मीर, अजिंठा यांचे दर्शन ज्यांनी घेतले नाही, त्यांचे भारतीयत्व ज्याप्रमाणे अपूर्ण मानले जाते, त्याप्रमाणे कालिदासाचे ‘मेघदूत’ किंवा ‘शाकुंतल’ ज्याने वाचले नसेल त्याच्या भारतीयत्वात फार मोठा उणेपणा राहिला आहे असे समजायला हरकत नाही. भारतीय जीवनात कालिदासाचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे; कारण वाङ्मयाचा अमर सिद्धान्त त्याने सांगून ठेवला आहे की- ‘भाषेची पार्वती नि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्यावाचून चिरंतन साहित्य मुळी निर्माणच होत नाही!’ तो श्लोक असा-
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ॥
कालिदासाच्या वाङ्मयात भारतीय संस्कृतीतले सारे सत्य, शिव आणि सुंदर यांचा संगम झाला आहे. भारतीय जीवनातील सौंदर्याच्या विविध विलासांचा देदीप्यमान साक्षात्कार त्याच्या काव्यनाटकात होतो. आनंद, मनःशांती, तृप्तता यासाठीच त्याचे वाङ्मय आहे. पुरुष-स्त्री चित्रणात शृंगारभावना व्यक्त करतानाही अतिशय पवित्र विनम्रतेची भावना त्याच्या मनात आहे. कालिदासाच्या एकूणच साहित्यात भावनांचे आवर्त आहेत. कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या आहेत. संवेदनांचे झरे आहेत. सहवेदनेचे किनारे आहेत. विलक्षण बुद्धिमत्तेचे चमकारे आहेत. सौंदर्याचे अनंत अफाट सागर आहेत. सुविचारांचे आगार आहे. सुभाषितांचे भांडार आहे. सृष्टीचे, ऋतुचक्राचे आणि त्यानुसार चालणाऱ्या मानवी व्यवहारांचे भान आहे. मानवी भावभावनांचे सूक्ष्म निरीक्षण आहे. स्वभाववैशिष्ट्यांचे परीक्षण आहे. भाषेचे अलंकरण आहे. रत्नपारखी नजर आहे आणि नवरसांचे पाझर आहेत. माणसाच्या मनोभूमीचे मार्दव ओळखून अतिशय सहजतेने पेरलेले त्याचे विचार आणि त्याच्या दृष्टीतले हे सौंदर्य त्याच्या साऱ्या साहित्यकृतींच्या वारंवार वाचनाने अंकुरून ‘कोंभांची लसलस’ सांगेल अशी प्रेरणा, अशी चेतना, अशी उत्तेजना कालिदासाच्या समग्र वाङ्मयात आहे.
वेदशास्त्र, पुराणे, इतिहास-भूगोल, राजनीती, शिष्टाचार, खगोल, गणित, हवामान, रसायन ही शास्त्रे तसेच सृष्टिज्ञान, विज्ञान यांचे केवळ ज्ञानच नाही तर यावर त्याचे प्रभुत्व होते. याबरोबरच मानवी स्वभावाचे बारीकसारीक कंगोरे दाखवणारे मानसशास्त्रही तो जाणून होता. ‘उपमा कालिदासस्य’ असे आपण म्हणतो तेव्हा त्यातही तो पारंगत होता. इतका की त्याचा हात धरणारा दुसरा कोणी झाला नाही. माणसाला एका जन्मात किती किती नि काय काय साध्य करता येते हे कालिदासाकडून शिकावे. त्यासाठी कालिदास दिन साजरा करावा आणि अनेक ठिकाणी तो साजरा होतोही. तो आषाढस्य प्रथम दिवस आहे या वर्षीचा येणारा 6 जुलै 2024!
आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा होतो तो मेघदूतातील त्या पंक्तीमुळे. आषाढमेघ आणि आषाढधारा पिकासाठी अत्यंत आवश्यक. तसेच साहित्याची आणि माणसाची मनोभूमी अंकुरण्यासाठी बीजारोपणाचा जणू हा दिवस! कालिदासासारखी प्रतिभा, कल्पना, चातुर्य, आचार-विचार, सत्य-शिव-सुंदराची कास आणि भलेपणाची आस, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा-भक्ती, संयम, विनम्रता यांचा ध्यास घेण्याचा हा दिवस.
आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीवरून कालिदासाला पर्वतशिखराला ढुसण्या देणारा श्यामवर्ण जलपूर्ण मेघ दिसला आणि त्याच्याच विरही मनाचे प्रतिबिंब असे ‘मेघदूत’ साकार झाले. मेघाला दूत बनवून पाठविण्याची त्याची कल्पना आणि त्याला स्फुरलेल्या काव्यातील सृष्टीचे मानवीकरण हे केवळ अद्भुत आहे. याची पारायणे व्हायला हवीत. यातल्या मंदाक्रांता वृत्तासारखी त्याने सर्वांची मनोभूमी सौम्यपणाने आक्रांत करायला हवी. मेघातून स्रवणाऱ्या संजीवनामुळे भूमी अंकुरित आणि पुष्पपल्लवांकित होते तशी आपली मनोभूमी ‘मेघदूता’च्या सिंचनाने सुफलसंपूर्णही व्हायला हवी. या छोट्याशा काव्यमेघाने आणि एकूण वाङ्मयाने ‘कालिदासाने या पृथ्वीतलावर देवभाषेचे नंदनवन उभारले आहे’ हे रसिकवर आ. अत्र्यांचे शब्द सार्थ वाटतात.