देरसे आये, दुरुस्त आये

0
146

यंदा भारतात आणि विशेषतः काही सामने गोव्यात होणार असलेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या आंतरराष्ट्रीय ‘फिफा’ फुटबॉल स्पर्धेमुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा पहिल्या सहामाहीचा अभ्यास आठवडाभर आधी पूर्ण करण्याचा फतवा काढणार्‍या शिक्षण खात्याला शेवटी एकदाची आपली चूक उमगली हे बरे झाले. या फतव्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांची पार तारांबळ उडवून दिली होती. या परिपत्रकामुळे सहामाही परीक्षा आठवडाभर आधी घ्याव्या लागणार असल्याने शिक्षकांपुढे पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आठ दिवस आधीच पूर्ण कसा करावा हा पेच निर्माण झाला होता. परिणामी, अनेक शिक्षकांनी आपली शिकवण्याची गाडी भरधाव सोडली होती. विद्यार्थ्यांना आपण जे शिकवतो आहोत त्याचे नीट आकलन होते आहे की नाही याची तमा न बाळगता केवळ नेमून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यामागे अनेक शिक्षक मंडळी लागल्याचे स्पष्ट दिसत होते. विद्यार्थ्यांवर त्यामुळे प्रचंड ताण आला. काही शाळांनी यावर जादा वर्गांचा तोडगा काढला, परंतु आधीच सहामाही परीक्षेचा ताण आणि त्यात हे जादा वर्ग यामुळे बिचारी शालेय मुले हवालदिल होऊन गेली. सर्वांत जास्त फटका बसला तो दहावीच्या विद्यार्थ्यांना. काही शाळांना तर दहावीसाठीची अतिरिक्त पूर्वपरीक्षा रद्द करणे भाग पडले. आता चहुबाजूंनी गदारोळ सुरू झाल्यावर शिक्षण खाते जागे झाले आहे आणि त्यांनी नवे परिपत्रक काढून जेवढा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, त्याच्या आधारेच सहामाही परीक्षा घ्या अशी सारवासारव केलेली दिसते. शिक्षण खात्याला हेच जर अभिप्रेत होते, तर आधीच्याच परिपत्रकात तसे स्पष्टीकरण का दिले गेले नव्हते? शाळांना सहामाही परीक्षा आठवडाभर आधी घ्या असे सांगतानाच जेवढा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल, त्याच्या आधारेच ती परीक्षा घ्या असे मूळ परिपत्रकातच सांगता आले असते. परंतु तसे घडले नाही. म्हणजेच आता सुधारलेली चूक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा आरडाओरडा सुरू झाल्यावर भानावर आल्यावर झालेली पश्‍चात्‌बुद्धी आहे. आपल्या या ढिसाळपणातून हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी आपण खेळ मांडत आहोत याचे भान शिक्षणक्षेत्राशी संबंधित फतवे काढताना ठेवले गेले पाहिजे. दुर्दैवाने आले सत्ताधीशांच्या मना, तेथे कोणाचे चालेना असा सारा प्रकार येथे चालला आहे. यापूर्वी राज्यातील शाळांच्या वेळा मनमानीपणे बदलल्या गेल्या. परिणाम काय झाला? शिक्षणाची गुणवत्ता तीळमात्र वाढली नाही. खेड्यापाड्यांतील मुलांचे मात्र हाल झाले. पालकांपुढेही समस्या उभ्या राहिल्या. हा असला पोरखेळ थांबायला हवा. प्रस्तुत फुटबॉल स्पर्धेचे केवळ तीन सामने गोव्यात होणार आहेत. ते पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी परीक्षा आधी उरका अशी सूचना आयोजकांनी सरकारला केली, त्यामागील उद्देश स्तुत्य होता, परंतु त्यासाठी परीक्षा आठवडाभर आधी घेत असताना त्यातून शालेय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कोलमडेल, शिक्षकांवर त्याचा परिणाम होईल आणि परिणामी विद्यार्थ्यांना फटका बसेल याचे पूर्वानुमान शिक्षण खात्याकडून व्हायला हवे होते. परंतु त्याचा काहीही विचार न करता परिपत्रक काढले गेले आणि बिचार्‍या मुलांचा फुटबॉल झाला! शाळांच्या अभ्यासक्रमाची आखणी शालेय वर्षाच्या प्रारंभीच झालेली असते. शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर अलीकडे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचा आधीच प्रचंड ताण असतो. त्यात वेळोवेळी येणार्‍या उदंड सुट्यांमुळे वेळापत्रक अधिकच कोलमडून जाते. अमूक जत्रेची सुटी, तमूक काल्याची सुटी, पोटनिवडणुकीची सुटी, कुठला तरी कार्यक्रम आहे म्हणून सुटी, शिक्षकांची बैठक आहे म्हणून सुटी अशा सार्‍या सुट्यांच्या सुकाळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. आपल्याकडून झालेली चूक मान्य न करता उलट ‘पहिल्या सहामाहीचा ठरवलेला आखून दिलेला अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे असे नाही. जेवढा झाला असेल तेवढ्यावरच परीक्षा घ्या’ अशी वर सारवासारव करणे म्हणजे ‘पडलो तरी नाक वर’ असा प्रकार आहे. शब्दांचे खेळ केल्याने प्रश्न सुटत नसतात. चूक झाली असेल तर ती निमूट मान्य करायला हवी आणि चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु चूक झालेली असताना आपणच कसे बरोबर आहोत अशी मल्लीनाथी करणे शेवटी जनतेच्या लेखी हास्यास्पद ठरते. शिक्षण हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. उद्याचा नागरिक आजच्या शिक्षणातून घडत असतो. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित निर्णय घेताना पूर्ण विचारांती घेतले जावेत अशी अपेक्षा आहे. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून, सल्लामसलत करून निर्णय घेतले गेले तर अशा प्रकारची विसंवादाची स्थिती उद्भवणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबाही टळेल! झाल्या प्रकाराने एवढे शहाणपण संबंधितांना आले तरी पुरे!