29 C
Panjim
Sunday, October 25, 2020

दुहेरी परवड

एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची परवड, तर दुसरीकडे कोरोनाच्या या कहरामध्ये इतर रुग्णांची परवड अशी सध्या जनतेची दुहेरी परवड चालली आहे. कोविड निगा केंद्रांमधील असुविधांबाबत सातत्याने तक्रारी येत असतानाच, कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांनाही केवळ कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून अपमानास्पद पद्धतीने वागविले जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. कोरोनाबाधित नसतानाही अशा व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा समज करून घेऊन त्यांच्याशी गैरवर्तन होते आहे. बाधित नसतानाही बाधित असल्याचा समज करून घेऊन त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी तपासण्या करायला धावपळ करायला लावले जाते आहे. एकीकडे राज्यामध्ये कोरोनाबाधितांची वाढत चाललेली संख्या पाहता समाजामध्येही अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील प्रत्येक रुग्णाला जणू तो कोरोनाबाधित असल्यागत वागवले जाणे हा प्रकार चुकीचा आहे आणि संबंधितांनी थोडे भानावर राहणे गरजेचे आहे. कोरोनाने एखादी व्यक्ती बाधित होते तेव्हा त्यात तिचा दोष असतोच असे नाही. त्यामुळे एक सामाजिक कलंक या दृष्टीने त्याकडे पाहणे सर्वस्वी चुकीचे आहे. ही वेळ कोणावरही कधीही येऊ शकते. अगदी पुरेपूर खबरदारी घेऊनही कोरोना चंचुप्रवेश करू शकतो. बाधित व्यक्ती आधीच प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. त्यांचे सारे कौटुंबिक व्यवस्थापन बिघडलेले असते. अशावेळी गरज आहे त्यांना धीर देण्याची. त्यांच्यात सकारात्मकता जागवण्याची.
एखादी व्यक्ती कोरोनाबाधित नसताना तिला तसे गृहित धरून तिच्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर त्यातून हकनाक बळी जाऊ शकतात. रुग्ण मृत पावल्यानंतर झालेल्या चाचणीत ती व्यक्ती कोरोनाबाधित नव्हतीच असे उघड झाल्याचीही उदाहरणे राज्यामध्ये घडली आहेत. ‘को-मॉर्बिड’ म्हणून सगळे मृत्यू निकाली काढले जात असले, तरी इतर आजार असलेल्या व्यक्तींच्या इतर व्याधींकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तर हे बळी जात नाहीत ना हा प्रश्न जनतेला अजूनही पडलेला आहे. राज्यपालांनी हाच प्रश्न काही दिवसांपूर्वी विचारला होता.
अर्थात सर्वच दोष वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना देणेही योग्य होणार नाही. स्वतःला कोरोनासदृश्य लक्षणे असताना वा आपल्या परिसरामध्ये बाधित व्यक्ती सापडलेल्या असताना आपली ही पार्श्वभूमी डॉक्टरांना न सांगणे हा प्रकारही सर्रास घडताना दिसतो. अनेक डॉक्टर अशा लपवाछपवीमुळे नाहक बाधित झाले आहेत. अशाने आपण स्वतःबरोबरच आपल्यावर उपचार करणार्‍या व्यक्तींचा जीवही धोक्यात आणतो आहोत याची जाणीवही ठेवली जात नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तेथील रुग्ण हाताळणी योग्य रीतीने होत नाही असाच त्याचा अर्थ होतो. अशा गंभीर त्रुटींवर तत्पर इलाज गरजेचा आहे, कारण अशाने वैद्यकीय क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाची चणचण भासू शकते आणि त्याचा परिणाम राज्याच्या आरोग्यसेवेवर होऊ शकतो.
राज्यातील कोरोनाने चाललेल्या बळींची संख्या वाढती का राहिली आहे त्यावर भारतीय वैद्यक संघटनेने नुकतेच आपले मत व्यक्त केलेले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्यामुळेच कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढवतो आहे. कोविड इस्पितळामध्ये सिटी स्कॅन, एमआरआय आदी आवश्यक सुविधा नसल्याने वेळीच तपासणीअभावी आजार बळावत आहेत असे आयएमएचे म्हणणे आहे. वैद्यकीय क्षेत्रामधील मंडळीच जेव्हा हा संशय व्यक्त करीत आहेत, तेव्हा सरकारने त्यावर आपले म्हणणे काय हे मांडणे आवश्यक आहे. बुधवारपर्यंत राज्यातील कोरोनाने मृत पावलेल्यांची संख्या ६४ वर पोहोचली होती. काल त्यात आणखी भर पडली. गोव्याच्या लोकसंख्येचा विचार करता बळींचे हे प्रमाण मोठे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वैद्यकीय जगतातील जाणकार मंडळीच जेव्हा हे सांगतात तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात डोकावणार्‍या शंकेलाच दुजोरा मिळतो हे सरकारने लक्षात घ्यावे. को-मॉर्बिड म्हणून यच्चयावत मृत्यूंवर पांघरूण टाकणे योग्य नाही. कोविड इस्पितळातील त्रुटी आजवर अनेकदा चव्हाट्यावर आल्या. कोविड निगा केंद्रांमध्ये तर रुग्णांची आबाळ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या रुग्णांना तेथे पंचतारांकित सुविधा मिळतील अशी अपेक्षा जरी नसली, तरी स्वच्छता, आहार, उपचार यासंदर्भात हलगर्जी होता कामा नये एवढी किमान अपेक्षा आहे. अशा गोष्टींकडे सरकारचे लक्ष वेधूनही आडमुठेपणाचा कारभार चालला आहे. आपले म्हणणेच खरे करण्याची ही वृत्ती अविश्वासाला जन्म देते आहे. जनतेचा विश्वास प्राप्त केल्याखेरीज आणि सत्य परिस्थिती तिच्यापुढे ठेवल्याखेरीज कोरोनाविरुद्धचा लढा जिंकता येणार नाही हे सत्य सरकारला उमगेल तो सुदिन म्हणायचा!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मनिर्भर भारत

प्रदीप गोविंद मसुरकर(मुख्याध्यापक) प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते,...

रंग पत्रांचे…

सौ. प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव-वाळपई) पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी...

थोडं मुक्त.. थोडं बद्ध..

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर(फोंडा) स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. जुन्या चालीरीती झुगारून देऊ...

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

ALSO IN THIS SECTION

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

पंतप्रधानांचा इशारा

पक्की खेत देखिके, गरब किया किसान | अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान ॥ हा कबिराचा दोहा उद्धृत करीत पंतप्रधान...

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

कोरोनाची घसरण

गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून गेले काही दिवस कोरोनाच्या फैलावाने गोव्यासह देशामध्ये थोडी उसंत घेतल्याचे पाहायला मिळते आहे. मागील...