दुसर्‍या टप्प्यातील मार्गदर्शक तत्त्वे जारी

0
145

>>  लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना केंद्राचा दिलासा

बुधवार दि. १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यासाठी केंद्रिय गृह मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. आहे. त्यात काही क्षेत्रांना सरकारने दिलासा दिला आहे. यात ग्रामीण भागांना दिला देण्याचा प्रयत्न करताना सरकारने दुसरीकडे खाण्यापिण्याचे सामान तयार करण्यार्‍या आणि औषधांच्या कंपन्यांनाही दिलासा दिला आहे. तसेच रोजंदरीवर काम करणारे, प्लंबर, सुतारकाम करणारे, इलेक्ट्रीशिअन आणि मोटर मेकॅनिक्स यांनाही नव्या लॉकडाऊनमधून सवलत देण्यात आली आहे. मात्र या दुसर्‍या टप्प्यात ट्रान्सपोर्ट सेवा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यातून सवलत देण्यात आली आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे निर्देश सरकारने दिले असून ही सवलत २० एप्रिलपासून लागू होणार आहे. ग्रामीण भागात कारखाने सुरू करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार सिंचन आणि जल संरक्षणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

शेतीशी निगडित कामे सुरू राहणार 

लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात कालावधीत शेतीशी निगडित सर्वांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतीशी निगडित सर्व कामे सुरूच राहणार आहेत. शेतकरी आणि मजुरांना हार्वेस्टींगशी निगडीत कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कृषी उपकरणे, त्यांच्या दुरूस्तीची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. पशू खाद्य, बियाणी,  किटकनाशकांची दुकाने, मत्स्यपालनाच्या व्यवसायालाही परवानगी देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे सुरू असलेल्या मंडईंनाही दिलासा देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये बंद

चित्रपटगृहे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल आणि बार ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. याव्यतिरिक्त शैक्षणिक संस्थानं, कोचिंग सेंटर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमान व रेल्वे सेवाही ३ मेपर्यंत बंद राहतील.

बँक, पेट्रोल पंप सुरू राहणार

लॉकडाऊनच्या कालावधीत बँक, विमा कार्यालये, पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. या कालावधीत त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान, किराणामाल, रेशनची दुकाने, फळ, भाज्या, मांस-मासे, पोल्ट्री, खाद्यान्न, डेअरी, दुधाचे केंद्र आणि गुरांच्या खाद्यान्नाची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

औषधांना सवलत

दरम्यान, औषधे, फार्मा, वैद्यकीय उपकरणे यांसह आवश्यक सामानांच्या निर्मितीशी निगडित व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रात फूड प्रोसेसिंग युनिट्सनाही काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सरकारने या दुसर्‍या टप्प्यात आयटी सेक्टरलाही सवलत देण्याचे ठरवले आहे.

रस्ते निर्मितीला सवलत

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या आणि त्यांच्या निर्मितीच्या कामांना सवलत देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प आणि इमारतींच्या उभारणीच्या कामांनाही सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बस आणि मेट्रो बंद

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात, दुसर्‍या जिल्ह्यांत जाणार्‍या बस, मेट्रो सेवा ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक कार्य, धार्मिक स्थळे, पूजा स्थळे ३ मेपर्यंत बंद राहतील.

हॉटस्पॉट विभागात सूट नाही

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या विभागांमध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही. या विभागांमध्ये आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे व जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच नव्या निर्देशांनुसार सर्वच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.