दुसरे ‘पुलवामा’ फसले

0
170

काश्मीर खोर्‍यातील पुलवामा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा फार मोठा कार बॉम्बस्फोट घडवून सुरक्षा दलांच्या काफिल्यावर हल्ला चढवण्याचा बेत जवानांच्या जागरूकतेमुळे काल फसला. मात्र, आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी नाकाबंदीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी गोळीबार करताच रात्रीच्या अंधारात पलायन करण्यात यशस्वी ठरले. सुरक्षादलांवर अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला होणार आहे याची चाहुल काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणांना आधीच लागलेली होती, त्यामुळे हा हल्ला यशस्वीपणे विफल करणे त्यांना शक्य झाले. या हल्ल्याच्या प्रयत्नातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे गेल्या वर्षीच्या पुलवाम्यातील अशाच प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर एवढे मोठे बालाकोटचे प्रकरण घडले, त्या हल्ल्याच्या सूत्रधारांच्या पाकिस्तानातील अड्‌ड्यापर्यंत भारतीय हवाई दलाने थेट धडक मारली, तरी देखील त्यांची अथवा त्यांच्या पाकिस्तानस्थित सूत्रधारांची भारतविरोधी खुमखुमी अद्याप कमी झालेली दिसत नाही.
काश्मीरचे विशेषाधिकार हटवून त्याच्या भारतातील संपूर्ण सामीलीकरणानंतर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना एखाद्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची मनोरथे केव्हापासून रचीत आहेत, परंतु ठोशास ठोसा न्यायाने भारतीय लष्कर आता कार्यरत असल्याने त्यांचा हा डाव अद्याप सफल होऊ शकलेला नाही. काश्मीर खोर्‍यातील परिस्थितीमध्ये आमूलाग्र फरक पडत चालला आहे. तेथील आम जनता भारताशी एकरूप होण्याच्या दिशेेने वाटचाल करीत आहे हे या दहशतवाद्यांच्या सारखे डोळ्यांत खुपत असते. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारा एखादा हल्ला चढवून काश्मीर प्रश्न पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. काल सापडलेल्या कारमध्ये तब्बल चाळीस ते पन्नास किलो स्फोटके ठासून भरलेली होती. सुरक्षा दलांनी ती उद्ध्वस्त करतानाचा जो द्रोन व्हिडिओ जारी केला आहे, तो पाहिला तर झालेला स्फोट किती प्रचंड होता हे दिसते. याच भागातून चारशे जवानांना घेऊन वीस ते पंचवीस वाहने जाणार होती, त्यांना लक्ष्य करण्याचा हा महाभयंकर कट होता असे दिसते. जवानांचे सुदैव म्हणून हा प्रयत्न फसला, परंतु यापुढे अधिक काटेकोर खबरदारी घेणे आता गरजेचे असेल.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियॉं, अनंतनाग आणि कुलगाम हे जिल्हे पूर्वीपासून दहशतवाद्यांचे बालेकिल्ले आहेत. लष्कराने जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने सातत्यपूर्ण मोहिमा राबवून काश्मीर खोरे दहशतवादमुक्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. बारामुल्लासारखा जिल्हा दहशतवादमुक्त करण्यात लष्कराला मध्यंतरी यशही आले, परंतु आजही काश्मीरमध्ये पाकिस्तानातून घुसखोरी चालते आणि दहशतवादी कारवाया पूर्ववत सुरू झाल्या आहेत हे या हल्ल्याच्या प्रयत्नातून सिद्ध झाले आहे. गेले जवळजवळ दोन महिने काश्मीरमधील हा दहशतवादी उत्पात शिगेला पोहोचलेला आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा करण्यात लष्कराला मोठे यश प्राप्त झाले होते. त्यानंतर हिज्बुल आणि जैश ए महंमद या दोन्हीही दहशतवादी संघटना एकत्र येऊन सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे बेत रचीत आहेत. गेल्या काही दिवसांत याच पुलवामा जिल्ह्यामध्ये जे छापे टाकले गेले, त्यात काही दहशतवादी मारलेही गेले, काहींचे अड्डेही सापडले. एक दहशतवादी अड्डा तर अगदी एका नायब तहसिलदाराच्या दुकानामध्येच थाटण्यात आलेला होता. सरकारी अधिकार्‍याचे लागेबांधेच जर दहशतवाद्यांशी असतील, तर मग पुलवामासारख्या घटना घडल्या तर त्यात आश्चर्य ते काय? त्यामुळे काश्मीरमध्ये विश्वास कोणावर ठेवायचा हा सुरक्षा दलांसाठी आजही मोठा प्रश्नच असतो.
कालच्या मार्गावरून जवानांचा मोठा काफिला जाणार होता याची आगाऊ कल्पना असल्याखेरीज या कारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके बसवली जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे या सार्‍यामागे कोण होते आणि त्यांना या जवानांच्या प्रवासमार्गाची माहिती कोणी पुरवली याचा शोध जम्मू काश्मीर पोलिसांनी आता घ्यायला हवा.
गेल्या वर्षी अगदी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ‘पुलवामा’ घडले होते. त्या घटनेच्या आजवरच्या तपासामध्ये आढळून आले आहे की त्या हल्ल्यासाठी लष्करी दर्जाचे आरडीएक्स पाकिस्तानच्या सीमेमधून चोरट्या मार्गाने आणले गेले होते. स्फोटासाठी लागणारी बाकीची रसायने, अमोनियम नायट्रेट, अमोनियम पावडर, नायट्रोग्लिसरीनयुक्त जिलेटीन कांड्या वगैरे अगदी छोट्या छोट्या प्रमाणात जमा करण्यात आलेली होती. त्या सगळ्याची जुळवणी करून स्फोटके बनवण्यासाठी आयईडी तज्ज्ञ पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता. यावेळी देखील अशाच प्रकारे पाकिस्तानी दहशतवाद्याच्या पाठबळानिशीच हा हल्ला घडवण्याचा प्रयत्न असावा. खरे आरडीएक्स वगळता अशी इतर स्फोटके ही भूगर्भशास्त्र विभागाची परवानगी असल्याविना कोणत्याही कंपनीला अथवा सरकारी खात्याला मिळवता येत नाहीत. खुल्या बाजारात तर विकलीच जात नाहीत. तरी देखील दहशतवाद्यांना हवी तेव्हा हव्या त्या प्रमाणात ती मिळतात आणि मग अशा हल्ल्याची तयारी सुरू होते. काश्मीर खोर्‍यातील हिंसाचारामध्ये गेल्या दोन महिन्यांत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे. सुरक्षा दलांचे किमान तीस जवान मारले गेलेले आहेत. ३८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अवघे जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्तान मात्र आपला काश्मीर कार्यक्रम सुरूच ठेवण्यात स्वारस्य राखते आहे. कोरोनाची संधी साधून तेथे उत्पात घडविण्याचे बेत आखते आहे.
गेल्या वर्षीच्या पुलवामा हल्ल्यानंतर ज्या प्रकारे केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आणि प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली, तशी यावेळी कदाचित होणार नाही, कारण लोकसभेच्या निवडणुका तोंडावर नाहीत हे पाकिस्तान जाणून आहे. त्यामुळेच हे धाडस त्यांच्या प्याद्यांनी दाखवले आहे. गुप्तचर माहिती आणि सुरक्षा दलांची जागरूकता यामुळे सुदैवाने हा कट उधळला गेला, परंतु खरोखरच आपले चारशे जवान त्या मार्गाने जात असताना हा स्फोट झाला असता तर? या हल्ल्याच्या प्रयत्नालाही अत्यंत गांभीर्याने घेतले घ्यावे लागेल आणि त्याच्या सूत्रधारांवर सूड उगवावा लागेल.