राज्यात कर्करोग, मूत्रपिंड, मधुमेह तसेच इतर दुर्धर आजारांबाबत संशोधनासाठी राज्यातील 1 लाख लोकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या अभ्यासानंतर वरील आजारांचे प्रमाण, त्यांची कारणे याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच, या संशोधनानंतर राज्याचे आरोग्यविषयक धोरण आखण्यासह निधीची तरतूद करण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. पर्वरी येथे मंत्रालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटल व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या अभ्यास व संशोधनासंबंधीच्या लाँजिट्युडीनल कोहोर्ट स्टडी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
गोव्यात कर्करोग, मधुमेह तसेच इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. गोव्यात काहींना कमी वयात मधुमेह व इतर आजार जडावत आहेत. हे आजार होण्यामागची कारणे कोणती आहेत? आजाराचे नेमके प्रमाण किती आहे? प्रमाण कमी करण्यासाठी उपाय कोणते? यावर अभ्यास होण्याची गरज आहे. लाँजिट्युडीनल कोहोर्ट स्टडी उपक्रमांतर्गत अभ्यास, तसेच संशोधन होणार आहे. यामुळे सरकारला पुढील उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारचा प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी साधनसुविधा तयार करण्यासह कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींसाठी हा उपक्रम पूरक ठरणार आहे. ‘गोवा केअर्स 2025′ उपक्रम टाटा हॉस्पिटल, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि आरोग्य खाते संयुक्तपणे राबविणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. हा व्यापक अभ्यास आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास मदत करू शकतो, असे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू यांनी सांगितले. यावेळी टाटा मेमोरियलचे डॉ. राजेश दीक्षित, शरयू म्हात्रे, ऑक्सफर्डच्या प्रा. सारा लेविंग्टन, आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रुपा नाईक, डॉ. शेखर साळकर व इतरांची उपस्थिती होती.
गोवा केअर्स अंतर्गत वाळपई, साखळी, काणकोण आणि मडगाव या चार ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे. नऊ वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायत, आरोग्य केंद्रे व इतर संपर्क कार्यक्रमातून 25-70 वयोगटातील 1,20,000 लोकांची तपासणी केली जाणार आहे. या अभ्यासात बेसलाइन आरोग्य तपासणी, अनुवांशिक आणि बायोमार्कर विश्लेषणासाठी रक्त नमुना संकलन आणि एनसीडी घटना, जीवनशैलीतील बदल आणि रोगप्रगतीचा मागोवा घेण्यासाठी नियमित पाठपुरावा यांचा समावेश असणार आहे. शेवटच्या दहाव्या वर्षात डेटा विश्लेषण आणि प्रकाशनावर लक्ष केंद्रित केले जाणार असून, धोरणात्मक शिफारशी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा धोरणांसाठी मौल्यवान सूचना करण्यात येणार आहेत.

