दुर्दैवी अपघातात चौघांना जलसमाधी

0
21

भरधाव कार कोसळली झुआरी नदीत

>> पदपथावर चढत कारची कठड्याला धडक
>> ओव्हरटेकच्या नादात गमावला जीव
>> वाढदिवसानंतर परतताना काळाचा घाला
>> उंचावरून कोसळल्याने कारचा चेंदामेंदा
>> १२ तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह हाती
>> कारमध्येच आढळले चौघांचे मृतदेह

झुआरी पुलावरून आगशीच्या दिशेने जाणारी एक कार बुधवारी मध्यरात्री झुआरी नदीत कोसळली. या दुर्घटनेत चौघांना जलसमाधी मिळाली. ही कार पुलावरून भरधाव वेगाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. त्यानंतर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेला अखेर गुरुवारी दुपारी यश आले. १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कार नदीत सापडली. त्यानंतर पाण्यातून कार व कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. कारचालक प्रिसिला क्रूझ, तिचे पती हेन्री आरावजो, ऑल्विन आरावजो, (तिघेही रा. वाशे-लोटली) व ऑस्टिन फर्नांडिस (रा. आगशी) अशी मृतांची नावे आहेत.

बुधवारी मध्यरात्री वाशे-लोटली येथील मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून आगशी येथील ऑस्टिन फर्नांडिस याला घरी सोडण्यासाठी आरावजो कुटुंबीय आगशी येथे निघाले होते. बुधवारी मध्यरात्री १२.४५ च्या दरम्यान सदर डस्टर कार (क्र. जीए-०८-के-८३३४) झुआरी पुलावर पोहोचली. ही कार प्रिसिला क्रूझ चालवत होत्या.

ओव्हरटेक भोवले
भरधाव वेगाने निघालेल्या सदर कारने झुआरी पुलावर अन्य एका वाहनाला ओव्हरटेक केले. त्यानंतर आणखी एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालक प्रिसिला क्रूझ यांचा कार (क्र. जीए-०८-के-८३३४) वरील ताबा सुटला आणि त्यानंतर कारने पदपथावर चढत पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली. तेवढ्यावरच न थांबता भरधाव वेगामुळे कठड्याला धडक देऊन कार नदीत कोसळली.

बचावाची संधी मिळालीच नाही
यावेळी कारमध्ये प्रिसिला क्रूझ यांच्यासह ऑल्विन आरावजो, हेन्री आरावजो व ऑस्टिन फर्नांडिस हे होते. कार पुलावरून थेट नदीत कोसळल्याने त्यांना बचावाची कोणतीच संधी मिळाली नाही आणि पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

प्रत्यक्षदर्शींकडून पोलिसांना माहिती
हा प्रकार त्याचवेळी झुआरी पुलावरून जाणार्‍या अन्य वाहनचालकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच आगशी व वेर्णा पोलीस घटनास्थळी दखल झाले. तसेच अग्नीशामक दल, कोस्टल पोलीस, नौदल, तटरक्षक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले.
अन् अखेर कार सापडली
गुरुवारी पहाटेपर्यंत शोधकार्य राबवूनही कारचा थांगपत्ता लागत नव्हता. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि गाळ यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर काल दुपारी १२.३० च्या सुमारास कार सापडली. जवळपास १२ तास शोधकार्य राबवण्यात आले. या अथक प्रयत्नानंतर ज्या ठिकाणी कार कोसळली होती, ती जागा सापडली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ती कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. त्यात चौघांचेही मृतदेह आढळून आले.
कारचा पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर
उंचावरून थेट नदीत कोसळल्याने दर्शनी भागासह संपूर्ण कारचाच चेंदामेंदा झाला होता. क्रेनच्या सहाय्याने कार फेरीबोटीत घेण्यात आली. त्यानंतर कारचा काही भाग कापून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

नातेवाईकांचा आक्रोश;
उपस्थितांचेही डोळे पाणावले

काल पहाटेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत लोकांची घटनास्थळी गर्दी दिसून आली. शोधकार्य सुरू असल्याने बघ्यांच्या गर्दीमुळे या ठिकाणची वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. ज्या व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला, त्यांचे नातेवाईक घटनास्थळी हजर होते. कारमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. या घटनेबद्दल आगशी व लोटली येथील लोकांनी हळहळ व्यक्त केली. त्यानंतर मृतदेह लगेचच शवचिकित्सेसाठी हॉस्पिटलात नेण्यात आले. या भीषण घटनेने संपूर्ण गोवा हादरला असून, आरावजो कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिघे एकाच कुटुंबातील असल्याने आरावजो कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले. वाशे-लोटली येथील त्यांच्या घरी शोकाकुल वातावरण मन सुन्न करणारे होते.

लोकप्रतिनिधींची घटनास्थळी हजेरी
सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आम आदमी पक्षाचे ऍड. अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, गोवा अग्निशमन दलाचे संचालक निखिल रायकर, दक्षिण व उत्तर गोव्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला.

कसा झाला अपघात?
हा अपघात घडण्यापूर्वी सदर कारच्या पुढे असलेल्या अन्य एका टॅक्सीचालकाने त्याच्या वाहनाच्या आरशात मागून भरधाव वेगाने येणारी एक कार पाहिली होती. सदर कारने अन्य एका कारला ओव्हरटेक केले; मात्र दुसर्‍या कारला ओव्हरटेक करताना कारचालक प्रिसिला क्रूझ यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार नदीत कोसळली. ज्या ठिकाणी कठड्याला धडक देऊन कार नदीत कोसळली, त्या ठिकाणच्या पुलावरील रस्त्यावर कारचालकाने तात्काळ ब्रेक मारल्याने टायरच्या खुणा उमटल्या होत्या. तसेच तात्काळ बे्रक लावल्याने कार उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा दिसून आल्या.

एक जण सुदैवाने बचावला
वाशे-लोटली येथील मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर परतत असताना कारमध्ये पाच जण होते, त्यातील एकजण कुठ्ठाळी येथील रहिवासी असून, तो कुठ्ठाळीत उतरल्याने त्याचा जीव वाचला. मात्र इतर चौघांना आपला प्राण गमवावा लागला.

शोध आणि बचाव पथकांच्या अथक प्रयत्नांनंतर कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यासाठी जवळपास बारा तास लागले. पोलीस व अन्य यंत्रणांनी शोधमोहिमेला सुरवात केली; मात्र अंधार असल्याने त्यांना शोधकार्यात अडचणी येऊ लागल्या. गुरुवारी पहाटे नौदलाच्या आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी जहाजासह घटनास्थळावर दाखल होत इतर सुरक्षा यंत्रणेच्या सहाय्याने कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल १२ तासानंतर सुरक्षा यंत्रणांना कार खोल नदीत कुठे आहे, याचा पत्ता लागल्यानंतर त्यांनी त्वरित कार नदीतून बाहेर काढली.