दुबईतील एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमान कोसळले

0
12

वैमानिकाचा मृत्यू; चौकशीचे आदेश

दुबईमध्ये एअर शो प्रात्यक्षिकात भाग घेतलेल्या भारतीय हवार्ह दलाच्या तेजस विमानाचा अपघात झाला. काल दुपारी दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर शो सुरू असताना हे तेजस लढाऊ विमान कोसळले. त्यात वैमानिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती हवाई दलाने दिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) तयार केलेले हे विमान शुक्रवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार 2.10 वाजता हवाई कसरती करत असताना कोसळले. यावेळी हवाई प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली होती.

भारतीय हवाई दलाने सदर अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. हवाई दलाच्या एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात, एअर शोदरम्यान तेजसचा अपघात झाला. त्यात वैमानिक गंभीर जखमी झाला होता. ज्यात त्याचा मृत्यू झाला. सदर जीवितहानीबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे. शोकाकुल कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करतो, असे म्हटले आहे. याचबरोबर अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
व्हायरल व्हिडिओतून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. आकाशातून वेगात येणारे तेजस जमिनीवर कोसळल्यानंतर लगेचच आगीचा लोळ वर उडाल्याचे आणि त्यानंतर काळा धूर वर आल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातानंतर एअर शो पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.