दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेत् युगपत् उत्थिता…

0
238

– प्रा. रमेश सप्रे
सन एकोणीसशे पंचेचाळीसचा मे महिना. अमेरिकेतील नेवाडा वाळवंट. एका अभूतपूर्व क्षणाच्या प्रतीक्षेत असलेले विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक. मानवाच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या अणुबॉंब स्फोटाच्या चाचणीचा प्रसंग. चाचणी यशस्वी झाली. त्याचवेळी मानवता पराभूत झाली. पण या सार्‍या ऐतिहासिक प्रसंगाचा सूत्रधार काहीशा गोंधळलेल्या मनःस्थितीत, काहीसा सुन्न होऊन उभा होता. त्या कसोटीच्या यशस्वितेचा अर्थच त्याला कळत नव्हता. इतक्यात काही वार्ताहरांनी त्याला गाठलं. त्याचं अभिनंदन केलं नि त्याची प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी त्या वैज्ञानिकानं उत्स्फूर्तपणे हा संस्कृत श्‍लोक म्हटला,
दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेत् युगपदुत्थिता|
यदि भाःसदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः|११|१२
अर्थ – आकाशात सहस्त्रावधी (हजारो) सूर्यांचा एकदम उदय झाला असता जो प्रकाश (जी ऊर्जा) निर्माण होईल तोही क्वचितच त्या विश्‍वरूप परमात्म्याच्या तेजाशी बरोबरी क्वचितच करू शकेल.
त्या अमेरिकन वैज्ञानिकाचं नाव रॉबर्ट ओपन हाइमर. एवढंच म्हणून तो थांबला नाही तर आणखी एक श्‍लोकही त्यानं उच्चारला-
‘कालोऽस्मी लोकक्षयकृत् प्रवृद्धः|
लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्तः|’
म्हणजे लोकांचा विनाश करणारा महाकाल मी आहे अन् यावेळी लोकांना नष्ट करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे.
अर्थात् त्या बॉंबच्या चाचणीतून ज्या ऊर्जेचा स्फोट झाला तो एकाच वेळी असंख्य लोकांचा नाश करायला समर्थ आहे. या ऊर्जेत प्रकाश आहे डोळे दिपवणारा त्याचप्रमाणे प्रचंड उष्णता आहे. कानठळ्या बसवणारा कर्णकर्कश्श आवाज आहे अन् सर्वांत वाईट म्हणजे आरोग्याला सर्व दृष्टींनी आपायकारक असा किरणोत्सर्ग (रेडिएशन) आहे. हाच तो महाकाल सर्व मानवजातीच्या भवितव्यतेच्या दृष्टीनं मोठं संकट बनून राहिलेला! पुढे दोन-तीन महिन्यातच याचा जीवघेणा अनुभव जपानच्या निमित्तानं सर्व जगाला आला, हा इतिहास सर्वांना माहीत आहेच.
विश्‍वरूपाची ही अक्राळविक्राळ बाजू गीतेतील भगवंताच्या विश्‍वरूपाला आहेच. पण विश्‍वरूपाचं दर्शन हे भगवंताच्या कर्तुम् – अकर्तुम् – अन्यथाकर्तुम् (क्रिएशन – डिस्न्ट्रक्शन – ट्रान्स्फॉर्मेशन) शक्तीचा प्रत्यय देणारं असंच आहे.
अर्जुनानं कुतुहलापोटी कृष्णभगवानाला आपलं जगाला व्यापणारं ‘विश्‍वरूप दर्शन’ घडवण्यासाठी विनंती केली. अन् ती प्रेमानं मान्य करून भगवंतानं आपलं सर्वांगीण विश्‍वरूप दर्शन घडवायला सुरवात केली.
प्रथम अर्जुनाचे डोळे दिपून गेले. त्या हजारो सूर्यांचं तेज असलेल्या भगवंताच्या विश्‍वरूपाला पाहण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी साधे डोळे उपयोगी पडत नाहीत तर दिव्य चक्षू म्हणजे दिव्य दृष्टी लागते. भगवंतांनी अशी दृष्टी अर्जुनाला दिली.
विश्‍वरूपाचे एकेक भयावह पदर उलगडत गेल्यावर अर्जुन साहजिकच भयभीत झाला. पण लगेच सावध होऊन, स्वतःला सावरून त्यानं त्या विश्‍वरूपाचं वर्णन किंवा स्तुती (स्तोत्र) केली. नंतर आश्‍चर्याची लाट ओसरल्यावर त्याला भय वाटायला लागलं नि तो भगवंताला ते रूप आवरून घेण्याची प्रार्थना करू लागला व कृष्णाचं एवढं महान रूप असताना आपण त्याला ‘अरे कृष्णा, हे सख्या, यादवा’ अशी हाक मारायचो, त्याच्याशी खेळायचो, एकत्र जेवायचो, भांडायचोसुद्धा या सार्‍याची त्याला लाज वाटली, पश्‍चात्तापही झाला व त्याने कृष्णाची क्षमायाचनाही केली. आपल्यावर प्रसन्न होण्याची प्रार्थनाही केली. असो.
विश्‍वरूपाच्या या असंख्य सूर्यांसारख्या तेजाचा अर्थ काय? एक म्हणजे विश्‍वातील सार्‍या तेजस्वी वस्तूंच्या तेजाचा उगम तिथंच होतो. सार्‍या वस्तूंचं अस्तित्वही त्याच ईश्‍वरीय तेजात असतं. अन् सार्‍या वस्तूंचा प्रवास त्याच ऐश्‍वर्यतेजात महाविलय होण्याच्या दिशेनं चालू असतो.
पण अशा तेजाचंही ग्रहण (स्विकार) नि रसग्रहण (आस्वाद) घेण्याचं सामर्थ्य मानवाच्या डोळ्यात म्हणजे दृष्टीत म्हणजेच तेजाचं तेज ठरवण्याचं सामर्थ्य किंवा क्षमताही मानवाच्या बुद्धीत असते. या संदर्भात एक कथा फार बोलकी आहे.
सप्तर्षींच्या मंडलात वसिष्ठांच्या जवळ जशी अरुंधती तशी चंद्रासवे रोहिणी! एकदा काही मोठी चूक हातून झाल्यामुळे चंद्रानं रोहिणीचा त्याग केला. तिला पृथ्वीवर जाण्याचा शाप दिला. तिनं पश्चात्ताप व्यक्त करून क्षमाप्रार्थना केल्यावर चंद्रानं तिला उःशाप दिला. एक कामगिरी पार पाडली तरच तिचा पुन्हा स्विकार करण्याचं चंद्रानं मान्य केलं.
शापित रोहिणी एका वनात येऊन झाडाखाली बसून रडू लागली. तिनं सूर्य, नक्षत्रं, हिरेमाणकं, सोनंचांदी असे अनेक पदार्थ चंद्राला दाखवले पण प्रत्येक वेळी चंद्रानं नापसंती दाखवून आणखीन तेजस्वी वस्तू दाखवण्यास सांगितलं. रोहिणी आता खूप निराश झाली होती. कायम पृथ्वीवरच राहावं लागणार; आकाशात पुन्हा चंद्राबरोबर आपल्याला स्थान मिळणार नाही या नकारात्मक विचारानं ती पुरती खचून गेली होती.
अशा परिस्थितीत असताना वनाच्या त्याच भागात राहणारी एक मुलगी त्या बाजूनं जात होती. तिला रडणारी रोहिणी दिसली. त्या चिमुरडीनं तिला विचारलं, ‘कोण ग तू? वनराणी की वनदेवी? या भागात मी तुला प्रथमच पाहतेय. अन् तू अशी रडतेयस का? तुझं दुःख मला सांग ना, मी करीन तुला मदत!’ त्या छोटीच्या या मोठ्या माणसासारख्या उद्गारांचं रोहिणीला त्याही अवस्थेत कौतुक वाटलं. तिनं आपली रडकथा तिला सांगितली. ती ऐकून चिमुरडी म्हणते कशी?- ‘एवढंच ना! मग थांब तर. मी जाते नि लगेच येते. माझी झोपडी इथून जवळ तर आहे.’ – अन् ती धावत गेलीसुद्धा. ..काही वेळानं चाचपडत चाचपडत आली. तिच्या हातात एक द्रोण होता. त्यात होते तिचे रक्ताळलेले डोळे! तिनं आपले डोळे काढून रोहिणीला आणून दिले नि म्हणाली, ‘चंद्राला हे डोळे नेऊन दाखव नि सांग की विश्‍वात सर्वांत तेजस्वी वस्तू माणसाचे डोळेच आहेत.’ रोहिणीला आश्‍चर्य वाटलं त्या मुलीचं नि तिच्या कृतीचं. पण तिच्या बोलण्याचा अर्थ मात्र पूर्ण समजला नाही. तिनं पुन्हा आग्रह केला म्हणून ती ते डोळे घेऊन चंद्राकडे गेली. चंद्राला ते दाखवताच त्यानं काही क्षण विचार केला व तो म्हणाला, ‘बरोबर आहे. डोळेच तर ठरवतात चंद्रापेक्षा सूर्य तेजस्वी आहे नि सर्वांत तेजस्वी रत्न कोणतं आहे किंवा सर्वांत तेजस्वी वस्तू कोणती आहे!’
चंद्रानं रोहिणीचा पुन्हा स्विकार केला अन् त्या छोट्या मुलीला पूर्वीपेक्षा सुंदर डोळे दिले. तेजस्वी डोळ्यांपेक्षा तेजस्वी दृष्टी महत्त्वाची असते. विश्‍वरूप पाहण्यासाठी अशा दृष्टीची म्हणजेच बुद्धीची गरज असते.
विश्‍वरूपदर्शनातलं समुपदेशन हेच आहे. अशी दृष्टी केवळ निरनिराळी सौंदर्यस्थळे पाहण्यातून किंवा प्रत्यक्ष वा दूरदर्शनवर विविध चांगल्यावाईट प्रसंगांची दृश्य पाहून तयार होत नाही तर मनन-चिंतनातून निर्माण होते. त्या दृष्टीनं सहचिंतन करुया.
भगवान श्रीकृष्णानं विश्‍वरूपदर्शन केवळ अर्जुनालाच घडवलं असं नाही. तर माता यशोदेला विविध पैलू असलेलं विश्‍वाचं दर्शन आपल्या तोंडात घडवलं. एकदा जांभई देताना तर एकदा ‘मी माती खाल्ली नाही’ हे दाखवण्यासाठी उघडलेल्या तोंडात यशोदेला विश्‍वाचं दर्शन घडलं. पण लगेच विस्मरणही झालं. नाहीतर ती छोट्या कन्हैय्याला लहान मानण्याऐवजी महान मानून नमस्कार करू लागली असती. तिला विश्‍वरूप दर्शन घडवून त्याचं विस्मरणही घडवण्यात भगवंताची मोठी योजना होती.
तिसर्‍या वेळी तर पिलेल्या दुधाचा एक घोट फुर्‌फुर् करत बाहेर सोडताना आलेल्या बुडबुड्यात यशोदेला विश्वरूप दाखवलं. हेतु हा की दिसतं ते सारं बुडबुड्यासारखं असतं. संपूर्ण विश्‍वाचं स्वरूपही असंच क्षणभंगूर आहे. हा संस्कार यशोदा मैय्याच्या मनावर तान्ह्या कान्ह्यानं घडवला. अर्थात जन्मापासूनच भगवंताचं प्रत्येक कृत्य हे दिव्य होतं. आणखी एकदा उत्तंक मुनींना विश्‍वरूप दाखवण्याचा प्रसंग आला.
महाभारताच्या कौरव-पांडव युद्धाला झालेल्या संहाराबद्दल कृष्णाला दोष देऊन तो युद्धातला सर्वनाश टाळू शकत असूनही कृष्णानं असं न केल्याबद्दल त्याला शाप देण्यासाठी सिद्ध झालेला तपस्वी उत्तंकांसमोर आपलं विश्‍वरूप प्रकट केल्यावर शाप देण्यासाठी तयार झालेले हात उत्स्फूर्तपणे जोडले गेले नि उत्तंकांनी अनन्यशरणागतीनं भगवंताना नमस्कार केला. हे सांगण्याचं कारण एकच प्रत्यक्ष विश्‍वरूप भगवंत स्वतःच्या मर्जीनं दाखवतात. अर्जुनाच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे.
अर्जुनानं आग्रह केला म्हणून नव्हे तर भगवंताना अर्जुनासमोर विश्‍वरूप साकार करण्याची इच्छा झाल्यामुळेच विश्‍वरूप हे त्या विश्‍वंभर विश्‍वनाथाचं, त्या विश्‍वाला विष्णूचं स्वरूप आहे हेच खरं आहे अन् असं सतत पाहून, त्यानुसार व्यवहार करायला आपण शिकलं पाहिजे.
* सर्वप्रथम विश्‍वरूपाची अवर्णनीय शक्ती जाणली पाहिजे. मानली पाहिजे. निसर्गातील विविध उद्रेकात, उत्पातात अशा शक्तीचा विध्वंसक प्रत्यय येतो. अन् अशी शक्ती अकस्मातपणे आपल्यासमोर उभी ठाकते नि आपण गडबडून जातो. अलीकडेच समुद्रतळातील भूकंपानं निर्माण झालेल्या त्सुनामी लाटेनं जपानसारख्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अतिप्रगत देशात झालेला फुकुशिमा भागातील अनुभट्‌ट्यांना लाटेचा तडाखा बसून त्यातून किरणोत्सर्ग, दूषित शक्तीला गळती लागून झालेल्या अपघाताची आपली स्मृती ताजी आहे. ही एक प्रकारची महाकालीच आहे.
* चक्रावर्त (सायक्लोन), भरतीच्या प्रचंड लाटा (टाइडल वेव्हज्), भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक आपत्तीत विश्‍वरूपाच्या विनाशक वृत्तीचा प्रत्यय येतो. या आपत्तींची संख्या व तीव्रता सध्या वाढलेली आपल्या अनुभवाला येतेय. विचार करून आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये, सवयी-वर्तनामध्ये आवश्यक ते परिवर्तन घडवायला हवं. नाहीतर विनाश अटळ आहे.
* याउलट निसर्गस्नेही, पर्यावरणप्रेमी जीवनशैली प्रभावी बनवली पाहिजे. विश्‍वरूपाची विधायक, रचनात्मक, सृजनात्मक बाजूही आहे. तिचं पोषण केलं पाहिजे. विश्‍वाच्या भीषण भयानक बाजूची जशी वर्णनं आपण मुलांसमोर करतो, त्याचप्रमाणे सुंदर, दिव्य पैलूंचं दर्शन घडवणार्‍या स्पर्धा व उपक्रमही आयोजित केले पाहिजेत.
* अर्जुनानं जे वर्णन विश्‍वरूपाचं त्याचा अनुभव घेऊन केलंय ते एक प्रभावी स्तोत्रच आहे. अशी स्तोत्र, कविता, गीतं मुलांना शिकवली पाहिजेत. आपणही गुणगुणत राहिलं पाहिजे. जगात भौगोलिक व राजकीय दृष्टीनं जरी राष्ट्रांच्या – खंडांच्या (कॉंटिनंट्‌स) सीमा असल्या तरी पर्यावरणाच्या दृष्टीनं-सृष्टिमातेच्या दृष्टिकोनातून अवघे विश्‍व हे सरहद्द नसलेले एकात्म विश्‍व आहे हे मनावर बिंबवलं पाहिजे.
स्वामी विवेकानंद म्हणत, ‘तरुणांच्या ओठांवरची गाणी मला सांगा. मी त्या राष्ट्राचं किंवा समाजाचं भविष्य सांगेन.’- भगतसिंग-राजगुरुंच्या ओठांवर देशभक्तीची स्फूर्तिगीतं होती. त्याचा अर्थ स्पष्ट होता. ..देशाचं स्वातंत्र्य जवळ आलं होतं.
केवळ सिनेमा-नाटकांतील गाणी दिशाहीन समाजाचं चित्र रंगवतात. अशी स्फूर्ती, प्रेरणा, संदेश देणारी गाणी अर्थात पोटातून ओठावर येतात. त्याला भावना व कृती दोन्ही जोडलेली असतात.
* शेवटी महत्त्वाचा विचार – विश्‍वरूपाची एक शक्ती आहे. एक चैतन्य असते. ही शक्ती केवळ भौतिक म्हणजे इलेक्ट्रॉन-प्रोटॉन स्वरूपाची नसते. तर तिच्यात साक्षात् चैतन्य असतं ज्याला गु. रानडे ‘चिदाणु म्हणजे स्पिरिटॉन’ असा शब्द वापरायचे. आपल्या त्रिविध शक्तीत – विचारशक्तीत – भावशक्तीत व कृतीशक्तीत असे चिदाणु उपासनेतून, आध्यात्मिक साधनेतून आले तर विध्वंसक अणु-परमाणु शक्तीला भिण्याचं कारण नाही.
विश्‍वरुपालाच ‘आता विश्‍वात्मके देवे’ म्हणून प्रार्थना करुया नि हे ‘विश्‍वचि माझे घर’ म्हणून त्या विश्‍वचैतन्याशी समरस होण्याचा संकल्प करुया. नाहीतर भावी काल उज्ज्वल नसेल!