- डॉ. मनाली महेश पवार
अभ्यंगस्नान म्हणजे नुसते सकाळी लवकर उठून- जरासे तेल लावून- मोती साबणाने आंघोळ करणे नव्हे; अभ्यंगस्नान हे शास्त्राला धरून केले पाहिजे. आपले सणवार, आपली संस्कृती ही नेहमीच आपल्या आरोग्याला जोडलेली आहे. आज जागोजागी नुसत्या नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिकृती करून, रात्रभर ढिंगाणा घालून सकाळी जाळल्या जातात. रात्रभर केलेल्या जागरणानंतर पहाटेचे मंगलस्नान इतिहासात जमा झाले आहे म्हणून अभ्यंगाची शास्त्रोक्त पद्धत जाणून घेऊया…
नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. यावेळी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान दिवाळी दिवशी पहाटे करण्याची पद्धत प्रचलित आहे.
अभ्यंगस्नान म्हणजे नुसते सकाळी लवकर उठून- जरासे तेल लावून- मोती साबणाने आंघोळ करणे नव्हे; अभ्यंगस्नान हे शास्त्राला धरून केले पाहिजे. आपले सणवार, आपली संस्कृती ही नेहमीच आपल्या आरोग्याला जोडलेली आहे. आज जागोजागी, खेडोपाडी, शहर-नगरांत नुसत्या नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिकृती करून, रात्रभर ढिंगाणा घालून सकाळी जाळल्या जातात. रात्रभर केलेल्या जागरणानंतर पहाटेचे मंगलस्नान इतिहासात जमा झाले. म्हणून अभ्यंगाची शास्त्रोक्त पद्धत जाणून घेऊया.
साध्या भाषेत ‘अभ्यंग’ म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावणे. दिवाळीचे अभ्यंगस्नान हे केवळ त्या दिवसापुरती मर्यादित नसते. थंडीमध्ये अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. रोज अभ्यंग केल्याने म्हातारपण लवकर येत नाही, तसेच वातदोषाचे शमन होते. त्वचा हे वायुदोषाचे स्थान आहे. वात हा शीत व रुक्ष असतो. त्यामुळे स्निग्ध उष्ण तेल लावल्याने वाताचे शमन होते. थंडीमध्ये रुक्ष, शीत गुणाने वात वाढतो. त्यामुळे अभ्यंग केल्याने वाताचे शमन होते.
आयुर्वेदशास्त्रामध्ये काही विशिष्ट औषधी द्रव्ये तेलामध्ये टाकून, शिजवून तेल तयार करावे व ते तेल अभ्यंगासाठी वापरावे असे सांगितले आहे. काही औषधांचे काढे, काही औषधी द्रव्यांची चटणी तेलात टाकून ते मिश्रण चांगले उकळून आटवावे. असा संस्कार करून औषधांनी सिद्ध केलेले तेल अभ्यंगाला वापरणे इष्ट असते. यालाच आयुर्वेदशास्त्रात ‘मूर्च्छना विधी’ असे म्हणतात. मूर्च्छाना विधीने तेलाचे आम दोष व गंध दोष नाहीसे होतात.
नियमित तेल अभ्यंगामुळे बारीक व्यक्तीची तब्येत सुधारते. बल वाढते, वजन वाढते. यासाठी अश्वगंधा, शतावरी, बलामूळ इत्यादी वनस्पतींनी सिद्ध तेल वापरावे. स्थूल व्यक्तींनी त्रिफला, नागरमोथा, सुंठ, हळद इत्यादी वनस्पतींनी सिद्ध तिळाच्या तेलाने नियमित अभ्यंग करावे.
अभ्यंग कधी करावे? कधी करू नये?
- अभ्यंग करताना आदल्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन झालेले असणे आवश्यक आहे.
- शरीर जड वाटणे, मल-मूत्र आदींचा अवरोध होणे, करपट ढेकर येणे, उलट्या-जुलाब होणे, गुदद्वारातून वायू सरणे, अशी लक्षणे असल्यास आहार पचलेला नाही असे समजावे. अशावेळी अभ्यंग करू नये.
- ताप आला असता अभ्यंग करू नये.
- ढेकर शुद्ध येत असतील, उत्साह वाटत असेल, मल-मूत्र आदी मलांचे योग्य काळी विसर्जन होत असेल, शरीर हलके वाटत असेल, योग्य तऱ्हेने भूक व तहान लागत असेल तर योग्य पचन होत आहे असे समजावे. यावेळी नियमित अभ्यंग करावे.
- शांत झोप येण्यासाठी पायांच्या तळव्यांना गाईच्या तुपाने मालीश करावे.
- केसांच्या चांगल्या वाढीसाठी, तक्रारी दूर करण्यासाठी केसांच्या मुळांना नारळाच्या तेलाने मालिश करावे.
- मलावरोधात, ताण-तणावांमध्ये, जंत झाले असता बेंबीच्या भोवती तेल गोलाकार जिरवावे.
अभ्यंग कसे करावे?
- वजन वाढवायचे असल्यास हात (बोटापासून खांद्यांपर्यंत) व पाय (बोटांपासून खुब्याच्या सांध्यापर्यंत) यांच्या खालच्या भागापासून वरच्या भागांपर्यंत (रोमरंध्र यांच्या विरुद्ध दिशेने) अभ्यंग करावे.
- वजन कमी करायचे असल्यास हात व पाय यांच्या वरील भागांपासून खालच्या भागांपर्यंत अभ्यंग करावे.
- छाती, पोट, पाठ व सांधे येथे घडाळ्याच्या काट्याप्रमाणे हात गोल फिरवून अभ्यंग करावे.
- हलक्या हाताने त्वचेमध्ये तेल जिरवावे.
- अभ्यंग झाल्यावर थोडा वेळ तरी तसेच बसावे. तेल अंगात मुरू द्यावे.
- तेल लावल्यानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
- हेमंत व शिशिर (थंडीचे ऋतू) या दोन ऋतूंमध्ये आपली शारीरिक क्षमता उत्तम असते. त्यावेळी आपल्या अर्ध्यशक्तीने व्यायाम करावा.
- नित्य व्यायाम केल्याने शरीर पिळदार व बलवान होते.
- मेहनतीचे काम करण्याची क्षमता वाढते.
- भूक व पचनशक्ती सुधारते.
- शरीरात वाढलेली चरबी झडून जाते.
- शरीराची अंगप्रत्यंगे प्रमाणबद्ध दिसू लागतात.
- आपला आत्मविश्वास वाढतो.
- शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्थिरता वाढते.
- ताठपणा येतो.
- व्यायाम केल्यानंतर आंघोळ अर्थात स्नान करावे.
- शरीर जोपर्यंत बलवान असते, तोपर्यंत थंड पाण्यानेच स्नान करावे. शरीर दुर्बल असल्यास गरम पाण्याने स्नान करावे.
- आंघोळ करताना अंगाला औषधी वनस्पतींपासून तयार केलेले सुगंधी उटणे लावून आंघोळ करावी.
- उटणे लावण्याने घामाच्या दुर्गंधीचा नाश होतो.
- त्वचेची रोमरंध्रं शुद्ध होतात.
- त्वचेचा मल दूर होतो.
- त्वचेमधील चरबी पातळ होऊन झडते.
सध्याचे जग हे जाहिरातीचे आहे. जाहिरातींचा आपल्या मनावर एवढा पगडा असतो की आपण पारंपरिक गोष्टींचा त्याग करतो. म्हणून दिवाळीत पहिली आंघोळ अर्थात अभ्यंगस्नासाठी सुगंधी तेल, सुगंधी उटणे, सुगंधी साबण, सुगंधी अत्तरे यांची खरेदी करताना ती नैसर्गिक उत्पादने असावीत याचा कटाक्षाने आग्रह धरावा. रासायनिक प्रक्रिया केलेली उत्पादने वापरू नयेत.
दिवाळीला अभ्यंग करण्यासाठी खोबरेल किंवा तीळ तेलांमध्ये भीमसेनी कापूर, वाळा, गुलाब पाकळ्या घालून ते उकळून शरीराला अभ्यंग करा. अंगावर मुरलेले तेल काढण्यासाठी नारळाच्या दुधात कालवलेले उटणे लावून शरीर घासा. उटणे लावून झाल्यावर काळे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचा जो लगदा तयार होतो, त्याने अंगाला चांगले मर्दन करा म्हणजे शरीराचे तेल निघते पण रुक्षता वाढत नाही. साबणाने शरीराला रुक्षता येऊ शकते.
अशाप्रकारे शास्त्रोक्त अभ्यंग करून दिवाळी साजरी करा.

