26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

दिवसभरात पाणी किती प्यावे?

  • डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

पाणी नेहमी घोट-घोट, गरम दूध पिताना जसे पितो तसे व बसूनच प्यावे. घोट-घोट पाणी प्यायल्याने लाळेतील क्षार पोटातील अम्लामध्ये मिसळते व पाण्यामुळे पोटात न्युट्रल धर्म येतो व ऍसिडिटी होत नाही. तेच घटाघट पाणी प्यायल्याने लाळेसकट पाणी पोटात जात नाही म्हणून व्याधी उत्पन्न होतात.

पाणी कधी प्यावे – याचे उत्तर अगदी सोपे आहे. तहान लागल्यावर पाणी प्यावे व किती प्यावे – तहान भागेपर्यंत! त्याला असे नेमके मोजमाप नाही. प्रत्येकाची जेवढी तहान असेल तेवढे पाणी प्यावे.

बदलत्या जीवनशैलीमुळे बरेच आजार उदयास आले हे सगळ्यांनाच माहीत आहे. बदललेली जीवनशैली म्हणजे विशेष करून सर्वांच्या आहारामध्ये झालेला बदल, हेही आपण सगळे जाणतो. पण आहाराबरोबर पाणीही आजार वाढवायला, निर्माण करायला कारणीभूत आहे… हे किती जणांना माहीत आहे?
आजकाल सगळेच २ ते ३ लीटर किंवा ८ ते १० ग्लास पाणी दररोज प्यावे, असाच सल्ला देतात. खरंच, प्रत्येकाला एवढे पाणी पिण्याची गरज भासते का? ए.सी.मध्ये बसून बैठे काम करणारी व्यक्ती २-३ लीटर पाणी पिते. तसेच मेहनतीचे काम करणारी, घाम गाळून काम करणारा कामगारही तेवढेच पाणी? वात-पित्त प्रकृती असणाराही २-३ लीटर पाणी व कफ-वात प्रकृती असलेलाही तेवढेच पाणी? उन्हाळ्यात २-३ लीटर पाणी व पावसाळ्यातही तेवढेच? म्हणजे व्यवसाय बदलला, प्रकृती बदलली, ऋतू बदलला तरी पाणी पिण्याचे प्रमाण हे तेवढेच! भूक नसताना खाल्ले तर अपचन होते. अतिप्रमाणात खाल्ले तरी अपचन होते. आहाराचे पचन झाले नाही तर अपचन होते. मग तहान लागलेली नसताना पाणी प्यायले किंवा अति प्रमाणात प्यायले तर पाणी पचणार का? अपचन नाही का होणार? हो तर… पाण्याचे सुद्धा पचन व्हावे लागते. मुखावाटे पाणी पोटात घेतले व मूत्रावाटे पाणी बाहेर टाकले… असे होत नसते. पाण्याचे अपचन झाले तर वात-पित्त-कफ तिन्ही दूषित होऊन विविध व्याधी उत्पन्न करतात. म्हणजेच पाणी पिण्याचे नियम न पाळता पाणी प्यायल्यास शंभराहून अधिक आजार उत्पन्न होतात… असे आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे.
शुद्ध पाणी कोणते?…
आयुर्वेदशास्त्रामध्ये पाणी व त्याच्या उपयोगाबाबतचे संपूर्ण विवेचन दिलेले आहे. आकाश व पृथ्वी असे पाण्याचे दोन स्रोत आहेत. आकाशातून चार वेगवेगळ्या मार्गांनी पाणी आपल्यापर्यंत येते. पाऊस, दव, वितळणारे बर्फ व गारा. ही त्याची चार रूपे आहेत. जमिनीतून मिळणारे पाणी नद्या, विहिरी, तलाव, झरे अशा अनेक रूपांमध्ये दिसते. प्रत्येक प्रकारच्या पाण्यामध्ये उपचाराचे वेगवेगळे गुणधर्म आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातल्या पावसाचे (पावसाळ्यानंतरच्या) पाणी शुद्ध आणि आरोग्यासाठी उत्तम असते. वर्षाच्या अन्य काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यात क्षार किंवा अन्य अशुद्धी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ते शुद्ध मानले जात नाही.
वेगाने वाहणार्‍या नदीचे पाणी आरोग्याला चांगले आणि पचायला सोपे असते.
आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहे समजून घेणे. शुद्ध पाणी म्हणजे नेमके काय? – आयुर्वेद शास्त्रामध्ये सूर्य, चंद्र, अथवा वार्‍याच्या संपर्कात न आलेले, साठवलेले तसेच अकाली आणि भर पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचे पाणी अशुद्ध मानले जाते. ते पिण्यासाठी वापरू नये. आपण मात्र हवाबंद (एअर टाइट) बाटलीतले पाणी म्हणजेच शुद्ध पाणी मानतो. ज्या पाण्याचा हवेशी, सूर्याशी संपर्क नाही ते पाणीसुद्धा कसे म्हणावे? पाणी स्वच्छ दिसले म्हणजे शुद्ध नव्हे. ते पाणी पचायलाही हवे. म्हणून विकतचे पाणी पिऊन आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा फुकटचे पाणी गाळून, उकळून, प्युरीफायरमध्ये स्वच्छ, शुद्ध करून पिण्यासाठी कुठेही वापरता येते. सहा महिन्यांपूर्वीचे बाटलीत भरून ठेवलेले पाणी शुद्ध आणि घरात मात्र एक दिवस साठवलेले पाणी शिळं? ह्यावरही विचार व्हायला हवा.

वातावरणात धुलीकण, कार्बनचे सूक्ष्म कण, कार्बन मोनॉक्साइड किंवा तत्सम प्रदूषके नेहमीच असतात. बर्‍याच कालावधीनंतर पाऊस पडतो तेव्हा ते सारे पहिल्या पावसाबरोबर खाली येते. या आशुद्धी धुतल्या गेल्यानंतरच्या पावसाचे पाणी शुद्ध समजले जाते.
– अशुद्ध पाणी उकळून किंवा सूर्याच्या उष्णतेत तापवून शुद्ध करून घेता येते.
– सोने, चांदी, लोखंड किंवा स्फटिक तापवून सात वेळा पाण्यात बुडविण्यानेही पाणी शुद्ध होते.
– उकळून अर्धे, चतुर्थांश किंवा अष्टमांश केलेले पाणी पचण्यास अधिकाधिक सोपे व जीवनदायी होते.
– पाण्यात माती किंवा अन्य काही अशुद्धी असतील तर कमळाची मुळे, मोती, स्फटिक किंवा तुरटीच्या खड्याचा वापर करून या अशुद्धी तळाशी स्थिर करून मग साध्या स्वच्छ फडक्यातून पाणी गाळून घेता येऊ शकते. अशा विविध प्रकारांनी शुद्ध केलेले पाणी प्यावे.

पाणी कोणत्या वेळी प्यावे?…
पाणी कधी प्यावे, कोणत्या वेळी प्यावे याबाबत जनसमुदायात बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे बरेच लोक सारखे पाणी पित असतात. आता तर दोन-तीन लीटर दिवसातून पाणी संपवायचे टार्गेट आहे. त्यामुळे ऑफिसला जाताना, कामाला जाताना, घरातसुद्धा दोन लीटर पाणी बाटलीत भरून नेण्याची म्हणा किंवा ठेवण्याची पद्धतच रूढ झाली आहे.

पाणी कधी प्यावे – याचे उत्तर अगदी सोपे आहे. तहान लागल्यावर पाणी प्यावे व किती प्यावे – तहान भागेपर्यंत! त्याला असे नेमके मोजमाप नाही. प्रत्येकाची जेवढी तहान असेल तेवढे पाणी प्यावे.
सद्य कालात जे रूग्ण आहेत किंवा जे रूग्ण होणार आहेत त्यांच्या पाणी पिण्याच्या बाबतीत घडणार्‍या चुका….

१) सकाळी उठल्याबरोबर एक लीटर पाणी पितात. त्यांच्या मते सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने मलप्रवृत्ती (संडास) साफ होते. गोष्ट साधी पण विचार करण्यासारखी आहे- पाण्याने लघवी होईल की संडास? सकाळी मलप्रवृत्ती होण्यासाठी चहा-पाण्याची गरज नसते. ती आपली सवय असते. उठल्याबरोबर मलप्रवृत्ती होण्यासाठी रात्रीचे जेवलेले व्यवस्थित पचण्याची गरज असते. सकाळी लघवीला जर पाणी प्यायल्याशिवाय होते तर संडासला का नाही?
तसेच रात्रीच्या जेवणापासून सकाळी उठेपर्यंत साधारण ८ ते १० तासांचा काळ लोटलेला असतो. रात्रीचे खाल्लेले पचलेले असते व भूक लागलेली असते. म्हणजे जाठराग्नी दीप्त झालेला असतो. अशावेळी जर आपण सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायले तर अग्नी शांत नाही का होणार? म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये सकाळी च्यवनप्राशाचे सेवन किंवा पंचामृतसेवन सांगितले आहे, जेणेकरून जाठराग्नी अधिक दीप्त होईल व सकाळी भूक लागेल. म्हणजे सकाळचा नाश्ता किंवा जेवण व्यवस्थितपणे सेवन होईल.

२) काही लोक दिवसभर अजिबात पाणी पीत नाही. तहान लागलेली आहे याचीसुद्धा जाणीव होत नाही. मात्र जेवणाच्यावेळी तांब्या भरून गटागट पाणी पितात. काही जेवण्याच्या आधी पितात तर काही जेवताना पितात. आयुर्वेद शास्त्रामध्ये मात्र जेवणाआधी किंवा जेवताना अतिरिक्त, अति प्रमाणात पाणी पिणे निषिद्ध मानले आहे. कारण भूक लागली असता जाठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. तसेच घेतलेला आहार पचायला साधारण दीड ते दोन तास लागतात. प्रकृतीपरत्वे कमी-अधिक वेळ लागतो. अशा अवस्थेत जर आपण भरपूर पाणी प्यायलात तर अग्नी विझेल. अग्नी विझला म्हणजे अन्नावर पचनाची क्रिया होणार नाही. अपचनामुळे शुद्ध रस तयार होत नाही. म्हणजे शरीरात ‘आम’ तयार होतो व इथूनच विविध आजारांची सुरुवात होते. अजीर्णापासून अम्लपित्त, पाण्डू, कावीळ ते हृदयरोगापर्यंत आजार जाऊन पोहचतात.

जेवणापूर्वी व जेवताना अति प्रमाणात पाणी पिऊ नये. तसेच अजिबात पाणी न पिणेही चुकीचे आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये जेवताना घोट घोट पाणी पिणे हे अमृततुल्य मानले आहे. उदा. तांदूळ नुसता अग्नीवर ठेवला तर त्याचा भात कसा होणार? भात शिजायला जशी योग्य पाण्याच्या प्रमाणाची गरज असते तशीच खाल्लेले अन्न पचायला थोड्या प्रमाणात पाण्याची गरज असतेच. म्हणून उत्तम आहार पचनासाठी पोटभर म्हणजे तडीस लागेपर्यंत जेऊ नये असे सांगितले आहे. घन आहाराच्या एक चतुर्थांश पाणी व थोडा अवकाश- पोकळी ठेवावी. म्हणजे पचन सुलभतेने होते. जेवताना थोडे थोडे, घोट-घोट पाणी प्यावे. उदा. चपाती खाल्ल्यावर दोन-तीन घोट प्यावे. भात-वरण जेवताना परत दोन-तीन घोट, जेवताना मध्ये – मध्ये थोडे- थोडे पाणी प्यावे.

३) काही जणांना जेवण झाल्यावर लगेच तांब्याभर पाणी पिण्याची सवय असते. आता तर आजार एवढे वाढलेत की जेवल्यानंतर घेण्याच्या गोळ्या एवढ्या असतात की त्यांच्याबरोबर तांब्याभर पाणी लागते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मात्र जेवणानंतर लगेच फार पाणी पिण्याने स्थौल्य व आमाशयात कफनिर्मिती होते, असे सांगितले आहे. त्याही पलीकडे जाऊन आयुर्वेद शास्त्रामध्ये जेवण संपल्यावर पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम विषाप्रमाणे किंवा त्या पाण्याचे विष होते… असे स्पष्ट सांगितले आहे. कारण जेवण जेवल्यावर साधारण दीड ते दोन तास पचनक्रिया चालू असते. पचनक्रियेसाठी जाठराग्नी पेटलेला असणे गरजेचे असते. अशा वेळी पाणी प्यायले- भले ते उष्ण असो वा थंड, त्याने अग्नी शांत होतो व आमोत्पत्ती होऊन हा आमरस सर्वत्र शरीरभर संचार करतो व विविध आजार निर्माण होतात. रसधातूच दूषित तयार झाल्याने उत्तरोत्तर धातू म्हणजे रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र याची प्राकृत उत्पत्ती कशी होईल? जाठराग्नीचे कार्य बिघडते त्याचप्रमाणे जाठराग्नीला सहाय्यभूत असलेला वायूही दूषित होतो व हा दूषित वायू आजाराला कॅन्सरपर्यंत नेतो म्हणूनच जेवल्यावर लगेच पाणी प्यायल्यास विषासारखे परिणाम होतात… असे म्हटले आहे.

म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये जेवणानंतर साधारण एका तासाने भरपूर पाणी किंवा शरीराला जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिण्यास सांगितले आहे. तसेच सकाळी जेवल्यानंतर फळांचा रस पिता येतो. दुपारी जेवल्यानंतर ताक पिता येते व रात्री जेवल्यानंतर दूध पिता येते.

४) रात्री झोपतानाही पाणी पिण्याची बर्‍याच जणांना सवय असते. काही तर पिण्यासाठी पाणी घेऊनच झोपतात. आयुर्वेद शास्त्रात सूर्यास्तानंतर पाणी कमी पिण्यास सांगितले आहे. सूर्यास्तानंतर सूर्य नसल्याने पचनक्रिया स्वभावतः मंदावते. त्यामुळे पाण्याचे पचन व्हायलाही अडचण येते. मग लघवीसाठी सारखे रात्री उठावे लागते. म्हणून गर्भिणीने, प्रोस्टेटचा त्रास असलेल्या रुग्णांनी, किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी तर कटाक्षाने संध्याकाळी ६ वा.नंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे, रात्री तहान लागत असल्यास घसा भिजण्याइतपत एखादा घोट पाणी प्यावे किंवा आवळा सुपारी, मोरावळा, खडीसाखर किंवा लेमनची गोळी चघळावी. रात्री पाणी जास्त पिले तर पाणी पचायला अवघड जाते. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त भार येतो व त्यातून किडनीचे अनेक रोग उत्पन्न होतात. म्हणजेच पाणी कमी पिल्याने जेवढे आजार होत नाही त्यापेक्षा जास्त आजार हे पाणी जास्त प्यायल्याने होतात.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे थोडक्यात…..
भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम्‌|
अन्ते करोति स्थूलत्वं उर्ध्वमामाशयात् कफम्‌॥
मध्ये मध्यगतां साम्यं धातूनां जरणं सुखम्‌|
…. जेवणापूर्वी (अति) पाणी पिण्याने अग्निमांद्य येऊन कृशत्व येते. जेवणानंतर (लगेच) फार पाणी पिण्याने स्थौल्य व आमाशयात कफनिर्मिती होते. म्हणून भोजनानंतर फार पाणी पिणे हे विषवत् मानले गेले आहे. जेवताना अगदी थोडे पाणी प्यायल्यास शरीर बांधेसूद होऊन धातूसाम्य व आरोग्य राखले जाते.
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्‌|
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् ॥
– जेवणाचे अजीर्ण झाले असता पाणी पिण्याने पाण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
– अन्न पचल्यावर पाणी सेवन केल्यास शक्ती मिळते.
– जेवण जेवताना थोडे थोडे पाणी प्यायल्यास अमृताप्रमाणे उपयोग होतो.
– जेवण संपल्यावर लगेच पाणी प्यायल्यास विषप्रद परिणाम दिसतात.
थोडक्यात… जेवणापूर्वी पाणी पिऊ नये. जेवताना अगदी थोडे… साधारण अर्धा ग्लास पाणी प्यावे व भोजन झाल्यावर एका तासानंतर अधिक पाणी प्यावे. अम्लपित्ताचा, गॅसचा त्रास असलेल्या रुग्णांनी हा नियम कटाक्षाने पाळावा. तसेच स्वस्थ मनुष्याने स्वास्थ्य रक्षणार्थ हा नियम पाळावा.
पाण्याचेही पाचन होते का?…
शरीराला पाणीही पचवायचे असते. थंड पाणी पचण्यासाठी ६ ते ८ तासांचा कालावधी लागतो तर कोमट पाणी तासा- दीड तासात पचते. उकळलेले पाणी सर्वांत उत्तम. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, एखादा रोग झालेला आहे अशा सर्वांनी नेहमी उकळलेले पाणी प्यावे. थंड पाणी प्यायचे असल्यास उकळलेले पाणी मातीच्या माठात ओतून नैसर्गिकरीत्या थंड करावे व प्यावे. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे पाणी उकळले म्हणजे त्यात औषधी गुणधर्म येतात. म्हणून वर्षा ऋतुमध्ये पाण्याचा काढा करून म्हणजे पाणी काढ्याप्रमाणे उकळून पिण्यास सांगितले आहे.

* वात-पित्त-कफ अशा वेगवेगळ्या दोषांवर उपचार करण्यासाठी पाण्यावर विविध द्रव्यांचा संस्कार केला जातो.

* पाच ते दहा मिनिटे उकळलेल्या दोन लीटर पाण्यात चिमुटभर चंदनाचे चूर्ण, काही पुदिन्याची पाने आणि बडी शेपेचे काही दाणे टाकल्यास त्या पाण्याने वाताचे संतुलन होते.

* उकळत्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, बडी शेपेचे दाणे टाकल्यास पित्ताचे शमन होते.

* तसेच उकळळेल्या पाण्यात तुळशीची चार-पाच पाने, छोटा आल्याचा तुकडा, २-४ लवंग घातल्यास कफाचे संतुलन होते.
भूक लागल्यावर जेवावे व तहान लागल्यावर पाणी प्यावे हा आरोग्याचा नियम आहे. नियम मोडला म्हणजे आजाराला आमंत्रण. तेव्हा प्रत्येकाने आपण किती प्यावे हे अनुभवाने निश्‍चित करावे.

पाणी नेहमी घोट-घोट, गरम दूध पिताना जसे पितो तसे व बसूनच प्यावे. घोट-घोट पाणी प्यायल्याने लाळेतील क्षार पोटातील अम्लामध्ये मिसळते व पाण्यामुळे पोटात न्युट्रल धर्म येतो व ऍसिडिटी होत नाही. तेच घटाघट पाणी प्यायल्याने लाळेसकट पाणी पोटात जात नाही म्हणून व्याधी उत्पन्न होतात.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

उत्तम आरोग्यासाठी योगासने

डॉ. मनाली म. पवार ‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी,...

व्हिटिलिगो किंवा कोड

डॉ. अनुपमा कुडचडकरपणजी कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे...

इफ्‌स अँड बट्‌स! बायोस्कोप

प्रा. रमेश सप्रे ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी...

जीवनाची दिशा बदलू या

योगसाधना - ५०९अंतरंग योग - ९४ डॉ. सीताकांत घाणेकर ‘‘मी मेल्यावर माझ्या शवपेटीला दोन बाजूला...

॥ बायोस्कोप ॥लिव्ह अँड् लेट् लिव्ह

प्रा. रमेश सप्रे सुसंस्कृत समाजाचं स्वप्न आहे- ‘वसुधैव कुटुंबकम्’. यात एक तिळ जरी मिळाला तरी तो सात जणांनी...