एक्झिटपोलची ‘आप’ला पसंती
देशाच्या राजधानीत नव्या सरकारच्या निवडीसाठीची मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. काल विधानसभेच्या ७० जागांसाठी ६७.०८ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह एकूण ६७३ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले. दरम्यान, एक्झिटपोलने आपचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आपची सत्ता येण्याचे संकेत आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी सर्व शक्ती पणाला लावलेल्या भाजपला एक्झिटपोलनुसार सत्तेपासून दूर राहावे लागल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी तो मोठा धक्का ठरणार आहे. १० रोजी मतमोजणी होणार असून दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी मालवीय नगर परिसरात मतदान केले. केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे अजय माकन, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक्झिट पोलचे अंदाज निकालात प्रत्यक्ष उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दिल्लीतील जनतेचे आभार मानत त्यांनी जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करणार्यांना जनतेचे झिडकारल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मतदानोत्तर एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार कौल भाजपच्या विरोधात असल्याने भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार करण बेदी यांनी जय-पराजयाची जबाबदारी आपली असेल अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे नेते अजय माकन यांनी आपला कुठल्याही परिस्थितीत पक्ष पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. प्रचारादरम्यान आम आदमी पक्ष आणि भाजपांमध्ये थेट स्पर्धा दिसून आली होती. राजधानी दिल्ली एका वर्षात दुसर्यांदा मतदानाला सामोरे गेली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आपला ३१, भाजपला २८ तर कॉंग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या.

