आप-भाजपात अटीतटीची लढत
देशभरातील तमाम जनतेचे लक्ष वेधलेल्या दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी ७ रोजी निवडणूक होत असून प्रचाराची रणधुमाळी काल संध्याकाळी संपली. आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत अपेक्षित असून भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तर आपने पक्षाचे सव्हेसर्वा केजरीवाल यांच्या कल्पकतेवर बहुमत प्राप्त करण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे.काल अखेरच्या दिवशी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी रोड शो, प्रचार सभा गाजवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचंड प्रचारसभा घेतली. केजरीवाल यांनी स्वत: निवडणूक लढवत असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघात प्रचंड रोड शोद्वारे प्रचार केला, तर कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी सुलतानपूर माजरा मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. काल शेवटच्या दिवशी सर्व ७० मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ७० सभा घेण्यात आल्या. जाहीर प्रचार संपल्यानंतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.
गेली १६ वर्षे नवी दिल्लीचे सिंहासन भाजपला हुलकावणी देत असल्याने भाजपाने प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या टीमच्या प्रमुख किरण बेदी यांना पक्षात प्रवेश देऊन मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून धडाक्यात प्रचार केला आहे. ज्येष्ठ नेत्यांची फौज प्रचारकार्यात उतरवून भाजपने दिल्ली काबीज करण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही.
आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करीत मोदींचा करिष्मा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आपने घरोघर संपर्क तसेच रोड शोंच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावून बहुमतासाठी जंग जंग पछाडले आहे.
मतदानपूर्व चाचण्यांमध्ये आप वरचढ असल्याचे चित्र आहे. आपने अंतर्गत सर्व्हेनुसार बहुमत जिंकण्याचा दावा केला आहे. टाइम्स नाऊने पाच प्रमुख सर्व्हेच्या अभ्यासाद्वारे आपला ३४ तर भाजपला ३२ आणि कॉंग्रेसला ४ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

