फिक्सिंगच्या पैशांतून गोव्यात खरेदी!
स्पॉट फिक्सिंगसाठी बुकींकडून मिळालेल्या पैशांतून श्रीशांत, अंकित चौहान आणि अजित चांडिला यांनी गोव्यातही मौजमजा केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली असून गोवा आणि हैदराबादेतही पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. गोव्यात त्यांनी काही खरेदीही केल्याचे दिल्ली पोलिसांना समजले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या एका पथकाने चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मेयप्पन याच्या घरी जाऊन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी मेयप्पन हे घरी नव्हते. त्यामुळे पोलीस पथकाला परतावे लागले. मेयप्पन हे बीसीसीआयचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांचे जावई आहेत.
मुंबई पोलिसांनी श्रीशांतच्या हॉटेलमधील खोलीतून जप्त केलेल्या आयपॅड, लॅपटॉप, डायर्या आणि रोख रकमेसंदर्भातील तपशील मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. १७ मे रोजी होणार असलेला सामना ‘फिक्स’ करण्याचा चंडिला याचा बेत होता, परंतु त्या आधीच त्याला अटक झाल्याने तो उधळला गेला असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दीपक नावाच्या बुकीने चंडिलाला १५ लाख रुपये गेल्या एप्रिलमध्ये त्यासाठी आगाऊ दिले होते. बेटिंग प्रकरणात पोलिसांना हवे असलेले जयपूरमधील दोन जवाहिरे देशाबाहेर पळून गेल्याचा संशय आहे.